मृणाल तुळपुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौकातल्या किराणा सामानाच्या दुकानामागे एक खोली होती. दुकानदार त्या खोलीत गहू, तांदूळ डाळी अशा धान्यांनी भरलेली पोती व इतर वाणसामान ठेवत असे. त्या खोलीत धान्य व खाण्याचे पदार्थ आहेत याचा उंदरांना पत्ता लागल्यावर त्यांचा तिथे खाण्यासाठी वावर सुरू झाला. त्या खोलीत उंदीर येऊन तिथलं धान्य खात आहेत हे दुकानदाराच्या लक्षात आलं. त्यानं त्या खोलीत उंदरांना पकडण्यासाठी सापळा ठेवला व अन्य काही उपाय केले. पण उंदरांनी त्यातल्या कोणत्याच उपायांना दाद दिली नाही.

मग शेवटचा उपाय म्हणून दुकानदारानं एक मांजर आणलं. ते मांजर रोज एक-दोन उंदरांची शिकार करू लागलं. धान्याच्या खोलीतले उंदीर कमी झालेत असं दुकानदाराच्या लक्षात आलं; पण इकडे उंदीर मात्र चांगलेच घाबरून गेले. रोज त्यांच्यापैकी कोणा ना कोणाला मांजर खात होतं. यासाठी काही तरी करायला हवं म्हणून सगळे उंदीर बागेतील झाडाखाली एकत्र जमले. काय करावं याबद्दल चर्चा करताना त्यातल्या एका उंदराला एक युक्ती सुचली व तो म्हणाला, ‘‘आपण त्या मांजराच्या गळय़ात घंटा बांधू या, म्हणजे ते चालायला लागलं की घंटा वाजेल व घंटेच्या आवाजानं मांजर आलेलं आपल्याला कळेल.’’

सर्वाना ते पटलं, पण आता प्रश्न होता की घंटा आणायची कशी व ती मांजराच्या गळय़ात बांधायची कशी. त्यावर राजा नावाचा उंदीर म्हणाला, ‘‘आम्हाला एक रिबीन आणि चांगली वाजणारी घंटा आणून द्या म्हणजे मी व छोटू जाऊन ती मांजराच्या गळय़ात बांधून येतो.’’ हे ऐकून दोन उंदीर पळत पळत शेजारच्या दुकानात गेले आणि त्यांनी तिथून लाल रंगाची रिबीन आणि एक घंटा पळवून आणली. उंदरांनी ती दातानं कुरतडून त्या रिबिनीचा त्यांना हवा तेवढा तुकडा तोडला व त्याच्या मधोमध घंटा बांधली.

थोडय़ा वेळानं उंदरांना ते मांजर धान्याच्या खोलीकडे जाताना दिसलं तेव्हा राजानं छोटूला रिबिनीत बांधलेली घंटा घेऊन त्याच्या मागे यायला सांगितलं. ती दोघं मांजराच्या जवळ गेल्यावर मांजर म्हणालं, ‘‘वा वा! आज माझी शिकार माझ्याकडे आपणहून चालत आली आहे.’’
त्यावर राजा उंदीर म्हणाला, ‘‘अरे आम्ही तुझ्याकडे एका कामासाठी आलो आहोत, ते झालं की तू आम्हाला खुशाल खाऊन टाक. तू दिसायला किती सुंदर आहेस. तुझे निळे डोळे, अंगावरचे पिवळे-पांढरे पट्टे आणि तुझी गुबगुबीत शेपटी यामुळे तर तू फारच गोंडस दिसतेस. आम्ही आज तुझ्या गळय़ात बांधायला ही लाल रिबीन आणि घंटा आणली आहे. ती तुझ्या गळय़ात शोभून दिसेल.’’

आपल्या रूपाचं कौतुक ऐकून मांजर खूश झालं आणि उंदरांना म्हणालं, ‘‘बांधा लवकर ती रिबीन आणि घंटा. ती बांधून झाल्यावर मी लगेचच तुम्हाला खाऊन टाकीन.’’ ते ऐकल्यावर राजानं छोटूच्या मदतीनं मांजराच्या गळय़ात घंटा बांधलेली रिबीन घालून तिची अगदी घट्ट गाठ बांधली आणि मांजराला म्हणला, ‘‘अरे, तुझ्या गळय़ातल्या या रिबीन आणि घंटेमुळे तू आता आणखीच सुंदर दिसायला लागली आहेस. त्या खिडकीच्या काचेत बघ म्हणजे तू किती छान दिसतेयस ते तुला कळेल.’’

आपली स्तुती ऐकून मांजर मनातून अगदी आनंदून गेलं. त्यानं खिडकीकडे जाऊन काचेत आपलं रूप बघितलं आणि खुशीत म्याव म्याव केलं. गळय़ातल्या घंटेचा आवाज ऐकून तर ते फारच खूश झालं. इकडे मांजर खिडकीकडे गेल्यावर राजा व छोटूनं तिथून धूम ठोकली होती.आता आयती शिकार मिळणार म्हणून मांजर उलटं वळलं तर तिथे त्याला कोणीच दिसलं नाही. ते रागारागानं उंदरांना शोधायला धान्याच्या खोलीत गेलं तर तिथे एकही उंदीर नव्हता. मांजर उंदरांना शोधत इकडेतिकडे फिरत होतं, त्या वेळी गळय़ातली घंटा वाजत होती आणि सगळे उंदीर त्यांची युक्ती सफल झाली म्हणून हसत होते. त्यानंतर मांजर धान्याच्या खोलीकडे आलं की त्याच्या गळय़ातल्या घंटेचा आवाज यायचा व उंदीर तो आवाज ऐकून दूर पळून जायचे. गळय़ात घंटा बांधल्यापासून मांजराला शिकार मिळाली नाही. उपाशी राहिल्यामुळे ते चिडचिड करू लागलं. पण इकडे उंदीर मात्र अतिशय खूश झाले. आता मांजर त्यांच्यापैकी कोणालाच खाऊ शकणार नव्हतं, कारण गळय़ातील घंटेच्या आवाजामुळे मांजर आलेलं त्यांना कळणार होतं. घंटेच्या आवाजामुळे त्यांचा जीव वाचला होता.
mrinaltul@hotmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifal story in marathi for kids funny story for kids amy
Show comments