-अंकिता कार्ले
एका गावात राहुल नावाचा एक लहान मुलगा राहत होता. त्याच्या घरी तो, आई-बाबा, आजी- आजोबा सगळे एकत्र राहत. त्याची ना त्याच्या आजी बरोबर खास मैत्री होती बरं का! ती त्याला छान छान गोष्टी सांगत असे, बालगीतं ऐकवत असे आणि ते ऐकण्यात आपला राहुल खूप रममाण होत असे.
एके दिवशी त्याच्या आजीने त्याला एक नवीन गोष्ट सांगितली. ती गोष्ट होती एका हत्तीची. राहुलला ती गोष्ट इतकी आवडली की तो आजीला सारखी तीच गोष्ट सांगायला सांगत असे. जेव्हा राहुल गुड बॉयसारखा सकाळी दूध पीत असे ना, तेव्हा त्याला अशा छान छान गोष्टी ऐकायला आवडायचं. हळूहळू काय झालं माहिती आहे का? आपल्या राहुलला ती गोष्ट पाठ झाली, ऐकून ऐकून!
हेही वाचा…बालमैफल : वृक्षवल्ली आम्हां सोयरे
एकदा काय झालं, रोजच्यासारखं राहुल दूध पिण्यासाठी डायनिंग टेबलवर बसला होता. आजी अगदी गोष्ट सांगायच्या तयारीत होती, पण गंमत अशी झाली की आज आजीने गोष्ट सांगायच्या ऐवजी राहुलनेच ती गोष्ट म्हणून दाखवली- तीही न चुकता! भारी ना? मग काय, आई-बाबा, आजी-आजोबा सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की राहुलला गोष्टी ऐकायला, सांगायला, वाचायला आता खूप आवडू लागलं आहे. त्यांनी त्याला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी खूप पुस्तकं आणली. कधी ते त्याला गोष्टी सांगत तर कधी तो त्यांना गोष्ट सांगत असे. राहुलला हे सारं खूप आवडू लागलं. तो त्यात रमू लागला. मोबाइलवर वेळ घालवण्यापेक्षा आपला राहुल छान छान पुस्तकं वाचू लागला. हळूहळू त्याला जंगलातील सगळ्या प्राण्यांची ओळख झाली. सिंह, हत्ती, वाघ, ससा, हरीण हे सगळे त्याला गोष्टींमधून भेटू लागले. त्याला छोटू हत्तीची गोष्ट ठाऊक झाली, शेरू नावाच्या बाल सिंहाची गोष्ट ठाऊक झाली, भित्रा ससा काय करतो ती गोष्ट आवडू लागली. किती छान ना!
हेही वाचा…चित्रास कारण की : फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे
आपली आजी आपल्याला किती छान गोष्टी सांगत असते, हो की नाही? तर माझ्या बालदोस्तांनो, आपणही आता राहुलसारखं गोष्टी, कविता, गाणी, पुस्तकं यांत रमुया… चालेल ना!
karleankitaavi@gmail.com