-डॉ. मीरा कुलकर्णी

रोहनची शाळा परवापासून सुरू होणार होती. आज त्याचे बाबा सगळी नवी पुस्तकं घेऊन आले. पळत जाऊन त्याने बाबांच्या हातातला गठ्ठा घेतला आणि पुस्तकं उघडून पाहायला सुरुवात केली. इतक्यात त्याची ताई तिथे आली. तिने एक एक पुस्तक उघडून त्याचा वास घ्यायला सुरुवात केली. ‘‘अहाहा!’’ ताई म्हणाली. ‘‘रोहन, तूपण घेऊन बघ वास. नव्या पुस्तकांना एक खास वास असतो.’’ रोहननेही पुस्तकाच्या पानांमध्ये शिरून वास घेतला. आवडला त्याला. समोरच बसलेल्या बाबांना तो म्हणाला, ‘‘बाबा, किती मज्जा आहे ना! नवीन पुस्तकं, त्यांचे वेगळे आकार, रंगीत चित्रं, गुळगुळीत कागद आणि आज तर मला त्यांचा खास वासपण समजला.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘बघ रोहन, तू डोळ्यांनी आकार, रंग पाहिलेत. हाताने स्पर्श करून पाने कशी आहेत ते कळलं….’’
‘‘आणि नाकाने वास घेतला.’’ रोहनने बाबांचे वाक्य पूर्ण केलं.
‘‘हो, पण फक्त नाकाने नाही तर नाक आणि मेंदूच्या साहाय्याने आपल्याला वास कळतात.’’ बाबा म्हणाले.

हेही वाचा…बालमैफल : पुस्तकात रमलेल्या राहुलची गोष्ट!

‘‘पण बाबा, वास खूप प्रकारचे असतात. ते आपल्याला कसे समजतात?’’

‘‘कुठल्याही वस्तूतून तिच्या वासाचे लहान मोठे कण कमी अधिक प्रमाणात हवेत पसरत असतात. ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. आपल्या दोन्ही नाकपुड्यांच्या वरच्या भागात, छोट्याश्या जागेत काही मिलियन विशेष पेशी असतात. त्यांना ऑलफॅक्टरी (वासाशी संबंधित) न्यूरॉन्स म्हणतात. या सर्व पेशी मेंदूच्या विशिष्ट भागाशी जोडलेल्या असतात. आपण श्वास घेऊन हवा आत घेतली की त्यातले वासाचे कण या पेशींना चिकटतात. पेशींना त्या कणांची ओळख पटली की कणाच्या आकार आणि प्रकाराप्रमाणे त्या विद्युत संदेश मेंदूतल्या विशिष्ट भागाकडे पाठवतात. प्रत्येक पेशी एकाच प्रकाराच्या वासाचे संदेश पाठवते. मेंदू वासातले वेगळेपण ओळखतो आणि मग तो आपल्याला सांगतो की, आलेला हा वास पिझ्झाचा आहे की गुलाबाच्या फुलांचा. हे वासाचे संदेश मेंदूमध्ये आणखीन दोन ठिकाणी जातात. एक म्हणजे,
मेंदूचा कपाळामागचा भाग. हा भाग आपल्याला आलेल्या वासाबद्दल अधिक माहिती देतो. म्हणजे जर तिथे पोहोचणारा वास पिझ्झाचा असेल तर हा भाग आपल्याला सांगतो की तो कोणत्या प्रकारचा पिझ्झा आहे. काही संदेश मेंदूच्या अशा भागात जातात की जिथे आपल्या भावनांचे आणि आठवणींचे फोल्डर आहे. त्यामुळे एक गंमत होते. आपण एखाद्या लिंक वर क्लिक केलं तर जसा व्हिडीओ सुरू होतो ना तसं आता एखादा वास आला तर त्याच्याशी संबंधित आठवण जागी होते. मला ना रोहन, भुईमुगाच्या शेंगा भाजल्याचा वास आला की माझे आजोळ आठवते.आजी मला शेंगा भाजून द्यायची.’’

‘‘काही वास आपल्याला आनंद देतात जसे की फुलांचे वास. काही वास धोक्याची सूचना देतात. जसे- धुराचा वास सांगतो की काहीतरी जळतं आहे. खराब झालेल्या अन्नाचा वास सांगतो, ही गोष्ट तुम्ही खाऊ नका. पार्कमध्ये गेल्यावर तिथल्या ओल्या गवताच्या वासाने आपल्याला निवांत वाटतं. एखादा वास आपण वारंवार घेतला तर त्याची तीव्रता कमी जाणवते. आपण दवाखान्यात गेल्यावर तिथले वास आपल्याला सहन होत नाहीत, पण तिथल्या डॉक्टर, नर्सेसना मात्र काम करताना त्या वासाचा त्रास जाणवत नाही.

हेही वाचा…सुखाचे हॅशटॅग: पूर्णपणे मन ओता..

आपल्याला जर वास येणंच कमी झालं किंवा आलेच नाहीत तर आपल्या जेवणातली अर्धी मजाच निघून जाईल. पदार्थ खायच्या आधी आपल्याला त्याचा वास येतो. वासाने तोंडात आणि पोटात पाचक रस तयार व्हायला लागतात. रस्त्याने जाताना वडापावचा वास आला तर तोंडाला पाणी सुटतं ना? असं म्हणतात, ऐंशी टक्के चव म्हणजे त्या गोष्टीचा वासच असतो. खूप सर्दी झाली, करोनासारखा आजार झाला, नाकाला काही दुखापत झाली तर वास येणं कमी होतं आणि तेव्हा जेवणही बेचव लागतं. भूक कमी होते. तुला ऐकून आश्चर्य वाटेल, माणसाला चार हजार प्रकारचे वास सहज ओळखू येऊ शकतात. मग आहे की नाही नाक महत्त्वाचं.’’

‘‘पण बाबा, आई तर नेहमी म्हणत असते की मोठ्यांच्या बोलण्यात नाक खुपसू नकोस म्हणून.’’
‘‘अरे, ते मोठे लोक काही महत्त्वाचं बोलत असतात तेव्हाचं झालं. पण एरवी नाक खुपसून नाही तर नाकाने श्वास घेऊन जे वास आपल्याला जाणवतात त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. कारण वास आपल्याला धोक्याची सूचना देऊ शकतात, आनंदासारख्या भावना निर्माण करतात आणि जुन्या आठवणीही जागवतात.’’

हेही वाचा…चित्रास कारण की : फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे

रोहन, तुला माहीत आहे का, वासाला गंध असाही शब्द आहे.’’

‘‘हो बाबा,आम्हाला विरुद्धार्थी शब्दांच्या यादीत सुगंध आणि दुर्गंध हे शब्द आहेत.’’

‘‘मग मला सांग, आपण इतका वेळ या गंधाबद्दल बोलतो आहोत. या सगळ्या बोलण्याला काय नाव देता येईल.’’ इतक्यात ताई पुढे येत म्हणाली, ‘‘गंधभरल्या गोष्टी.’’

सगळ्यांना ते नाव आवडलं आणि तुम्हाला?

drmeerakulkarni@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifal story of kid rohan where he discovers the fascinating world of smells and how the nose works psg