-डॉ. नंदा संतोष हरम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आटपाट नगर होतं. त्यात सगळे पर्यावरणप्रेमी लोक राहत होते. ‘सुशोभीकरण’ हा शब्द त्यांनी दूर ठेवला होता. निसर्गाच्या सान्निध्यात ते आनंदानं जगत होते. नगराच्या वेशीबाहेर एक छानसं तळं होतं. तळ्याच्या आजूबाजूला छान हिरवळ होती. जवळ बाग होती. एका भागात ज्येष्ठ नागरिकांना बसता यावं म्हणून बाकाची व्यवस्था होती. पुढे थोडी पायवाट, दुतर्फा झाडं, मग छोटंसं रान, नंतर टेकडी. टेकडीवर एक महादेवाचं देऊळ होतं. टेकडीच्या पुढे मात्र एक जंगल होतं.

सकाळ – संध्याकाळ नगरातील सर्व मंडळी इथे फिरायला, व्यायामाला, गप्पा मारायला येत असत. तळ्यामुळे, झाडांमुळं छोटे-मोठे पक्षी, प्राणी यांचंही वास्तव्य होतं. सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट कानाला अगदी गोड वाटायचा. समस्त नगरवासीयांना या जागेचं आकर्षण आणि अभिमानही वाटायचा.

हेही वाचा…बालमैफल : नीट कान देऊन ऐक!

अशाच एका रम्य संध्याकाळी कासवदादा आपल्या कूर्म गतीने तळ्याकडे चालले होते. मनातल्या मनात शीळ घालत ते चालले होते. एवढ्यात त्याला मुलींचा खळखळून हसण्याचा आवाज कानी आला. एरवी तर कासव त्या मुलींशी खेळत असतं, पण आज त्याचा खेळण्याचा मूड नव्हता. त्या मुली काय बोलतात, काय करतात? हे जाणून घ्यायचं होतं. त्यानं आपलं डोकं आणि पाय कवचात घेतलं आणि एखाद्या खडकासारखा एके ठिकाणी थांबलं. सोना आणि मोनाच्या लक्षातही आलं नाही. त्या थोड्या अंतरावर हिरवळीत बसून गप्पा मारत होत्या. मग त्यांनी मोबाइल काढला. त्यात काय काय त्या बघून हसत होत्या. कासवाचं कुतूहल चाळवलं गेलं.

एवढ्यात दुरून आणखी काही मुलींचा घोळका आला. त्या हाका मारू लागल्या, ‘‘ए सोना, ए मोना… इकडे या. चला खेळूया आपण!’’ सोना, मोना गडबडीत उठल्या, पण सोनाचा मोबाइल हिरवळीतच राहिला. त्या निघून गेल्या. कासवानं हळूच डोकं बाहेर काढून पाहिलं. त्यानं बराच वेळ वाट पाहिली. तिथे कोणीच आलं नाही. अंधारही हळूहळू वाढू लागला. कासव त्या मोबाइलपाशी गेलं. त्यानं हळूच तो आपल्या कवचात लपवला आणि तिथून निघून गेला.

हेही वाचा…बालमैफल : मांजरीचं प्रेम..

कासवदादाला त्या मोबाइलचं काय करायचं, कसा वापरायचा कळत नव्हतं. पण म्हणतात ना, ‘इच्छा तिथे मार्ग?’ दुसऱ्या दिवशी बागेत ज्येष्ठ नागरिक जमा झाले होते. त्यांना एक युवक मोबाइल कसा वापरायचा हे शिकवत होता. कासवही एका बाकाखाली बसून धडे गिरवू लागला. जवळ – जवळ ७-८ दिवस हे प्रशिक्षण चालू होतं. कासवदादानं आणखी काही दिवस मोबाइल वापरायचा सराव केला. तो आता तरबेज झाला. त्याला काहीतरी सुचत होतं. ती गोष्ट करण्याकरिता तो उत्सुक झाला होता. आणि… ती वेळ आली!

तो आपल्या विचारात रानात जात असताना नेहमीप्रमाणे ससुल्या धापा टाकत तिथं आला. ‘‘हॅलो, कासवदादा! कसा आहेस?’’ कासव शांतपणे म्हणालं, ‘‘मस्त?’’ खरं म्हणजे त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ससुल्या म्हणाला, उद्या लावायची का शर्यत? कासव नाटकीपणे हताश होऊन म्हणालं, ‘‘पण शेवटी हेच सिद्ध होणार ना की मी मंद गतीनं चालतो.’’

हेही वाचा…बालमैफल : पतंगांचे ते दिवस..

ससुल्या म्हणाला, ‘‘असं नाही रे… शेवट बदलूपण शकतो ना.’’ झालं, ठरलं, उद्या ससुल्या आणि कासवाची शर्यत ठरली. कासवानं सुरुवात आणि शेवट, दोन्ही ठिकाणांची नावं नीट विचारून घेतली. सुरुवात गार्डनर्स हाऊस (माळ्याचं घर) आणि शेवट फॉरेस्ट एन्ट्री पॉइंट (जंगलाची सुरुवात)! ससुल्यानं थट्टाही केली, ‘‘काय कासवदादा इंग्लिश शिकतोस की काय?’’ कासव मनात म्हणालं कळेल उद्या!

दुसऱ्या दिवशी शर्यतीला सुरुवात झाली. कासव त्याच्या कूर्म गतीनं चालू लागलं. ससुल्या उड्या मारत पळू लागला. तो सारखा वळून वळून बघत होता. त्याला कासव दिसेना. तो मनात म्हणाला, ‘‘एकविसावं शतक लागलं म्हणून कासवाचा वेग थोडा वाढणार आहे!’’ पण त्यानं मनाशी निश्चय केला. आपण पूर्वी केलेली चूक करायची नाही. वाटेत भरपूर खाल्लं तरी झोपायचं नाही. शेवट गाठू आणि तिथेच झोपू. असं मनाशी म्हणत – म्हणत सशानं शेवट गाठला… आणि तो बघतच राहिला…

कासवदादा तिथे मस्त बसून प्रोटिन शेक पीत होता. सशाला मोठ्ठं कोडं पडलं. वाटेत तर कासव कुठे दिसलंच नाही. त्यानं स्वत:ला एक चिमटाही काढून पाहिला. खात्री पटली, पाहतो ते सत्यच आहे! मनातून तो अगदी निराश झाला, पण त्यानं कासवाचं हसून अभिनंदन केलं. त्याला म्हणाला, ‘‘काय देऊ बक्षीस?’’ कासव म्हणालं, ‘‘विचारतोच आहेस तर दे भरपूर खाऊ!’’ ससा लगेच तयार झाला. त्याला जाणून घ्यायचं होतं, कासव इतक्या लवकर इथे पोहोचलं कसं? त्यानं न राहवून विचारलंच ते!

हेही वाचा…बालमैफल : आनंद तेवढा भरून घेऊ!

कासव म्हणालं, ‘‘मी तुला सगळं खरं सांगतो. शर्यत ठरली तेव्हा कोणत्या मार्गानं यायचं, हे ठरलं नव्हतं. बरोबर?’’

ससुल्या म्हणाला, ‘‘हो, पण हा एकच तर मार्ग आहे.’’

कासवदादा म्हणाला, ‘‘नाही ससुल्या. हे बघ, हा मोबाइल. यातील जीपीएसनं मला सर्वात लहान मार्ग (शॉर्टेस्ट रुट) दाखवला. त्यामुळे मी तुझ्या आधी इतक्या लवकर येऊ शकलो. जीपीएस झिंदाबाद!’’ ससुल्या ‘आ’ वासून बघतच राहिला. त्याला हे सारं प्रकरण माहीतच नव्हतं. कासवदादानं अथपासून इतिपर्यंत सगळी गोष्ट सांगितली. कासव ससुल्याला म्हणालं, ‘‘मला मोबाइल शिकायला मजा आली. माझी इच्छा पूर्ण झाली. पण आता तो मोबाइल मी तळ्याजवळ नेऊन ठेवणार आहे. सोनाला तो मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे…’’

हेही वाचा…बालमैफल: हरवलेलं घर

‘‘हो मित्रा! बरोबर आहे तुझं! मी पण येईन तुझ्याबरोबर.’’

nandaharam2012@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifal story of modern tortoise and rabbit race turtle smartly use mobile and gps to win race psg