आजीने हसत हसत रोहनच्या हातात मोबाइल दिला, त्यावर रोहनने प्रश्नांकित चेहऱ्याने आजीकडे पाहिले. ‘‘घे तर खरं फोन,’’ म्हणत आजी जरा जोरातच हसली. रोहनने नंबर पाहिला तर अनोळखी नंबर होता. कोणाचा फोन असेल अशा विचारात पडत फोन उचलला तर पलीकडे किशोर होता. तो आश्चर्याने म्हणत होता, ‘‘कसला भारी अंदाज आहे रे तुझ्या आजीचा, अनोळखी नंबरवरून फोन केला तरी अचूक ओळखलं तिने माझाच फोन असणार असं.’’ त्यावर रोहन म्हणाला, ‘‘अरे आजीचा अंदाज भारी असतोच आणि ती अंदाजांचं महत्त्वही वेगळ्याच अंदाजात सांगते.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘अरे, या सुट्टीत आजीने मला अंदाज बांधायला शिकवलंय. कोणतंही घड्याळ न पाहता वेळ सांगणे, वस्तूची लांबी, रुंदी, वजन वगैरेंचा अंदाज बांधणे, तापमानाचा अंदाज बांधणे. आईला बाजारातून यायला किती वेळ लागला, ताई फोनवर बोलताना किती पावले चालली यांचेही अंदाज बांधतो आम्ही.
हेही वाचा…बालमैफल : एक व्रात्य मुलगा
पुस्तकाची पानं किती असतील, बाबांनी भाजी किती रुपयांची आणली असेल… खूप असतात अंदाज. आजी म्हणते, यातूनच पुढेपुढे भविष्यातील परिस्थिती, माणसांचं वागणं यांचेही अंदाज बरोबर बांधता येतात. बाहेरून येणाऱ्या माणसांच्या मूडस्चाही अंदाज बांधत असतो आम्ही.
हेही वाचा…चित्रास कारण की… : पळते डोंगर काढू या…
‘‘ज्यांना अंदाजाचा पाढा बरोबर जमतो त्यांना आयुष्याचं गणित सहज सुटतं.’’ रोहन बोलत होता आणि किशोरला कोणताही अंदाज न बांधता सगळं समजत होतं.
joshimeghana.23 @gmail. com