– रणजित धर्मापुरीकर
विद्याधर अंगणात खेळत होता. आजोबा आलेले पाहून तो त्यांच्याकडे पळाला आणि त्यांच्या हातातलं पुस्तक घेऊन तो ते पाहू लागला. आजोबांनी यावेळी ग्रंथालयातून एक जाडजूड पुस्तक आणलं होतं. पुस्तक पाहून तो म्हणाला, ‘‘वा आबा, शिवाजी महाराजांचं चरित्र. मीपण वाचणार.’’
‘‘अरे, हे पुस्तक मोठ्यांसाठी आहे, यातली भाषा तुला समजायची नाही. तुझ्यासाठी आपण शिवबांचं एक वेगळं पुस्तक आणू.’’ आबांनी त्याला समजावलं.
‘‘काय हो आबा, मी वाचतो नं हे पुस्तक. मलासुद्धा आवडतं शिवाजी महाराजांविषयी वाचायला. हे पुस्तक तुमच्या ग्रंथालयातून आणलं का?’’
‘‘हो बेटा.’’
‘‘आबा, मलाही घेऊन चला ना एके दिवशी तुमच्या ग्रंथालयात. तुम्हाला ते रोज एक एक पुस्तक कसं देतात हो. आमच्या शाळेत तर तिथेच वाचा आणि तिथेच पुस्तक ठेवा असं सांगतात. मग तुम्हाला कसं काय घरी देतात.’’ विद्याधर जरा खट्टू होऊनच म्हणाला.
‘‘बेटा, तुझं शाळेतलं ग्रंथालय आहे आणि मी जे पुस्तक आणतो ते सार्वजनिक ग्रंथालय. उद्या तुला मी माझ्या ग्रंथालयात घेऊन जातो.’’
दुसऱ्या दिवशी दोघेही ग्रंथालय पाहायला गेले. ग्रंथालयाच्या पायऱ्या चढत आजोबा सांगू लागले, ‘‘आपण आतमध्ये जाऊ, पण मोठ्यानं बोलायचं नाही बरं का! ग्रंथालयाच्या नियमांचं पालन करायचं.’’
‘‘का हो आजोबा?’’
‘‘आपण ग्रंथालयात जाऊ तेव्हा तुला कळेल.’’ दोघांनीही ग्रंथालयात प्रवेश केला. प्रवेशद्वारावर एक रजिस्टर ठेवलं होतं. आजोबांनी त्या रजिस्टरमध्ये आपलं नाव लिहिलं. लगेच विद्याधरनं विचारलं, ‘‘आबा, तुम्ही तिथे नाव का लिहिलं?’’
आजोबा म्हणाले, ‘‘ग्रंथालयात जे लोक येतात त्यांना इथे आपलं नाव लिहावं लागतं, म्हणजे इथे आज किती लोक आले हे त्यांना समजतं.’’
विद्याधर म्हणाला, ‘‘हो का? मग माझं नाव का लिहिलं नाही.’’
‘‘हो की, मी विसरलोच.’’ आजोबांनी त्यालाही रजिस्टरमध्ये नाव लिहायला सांगितलं. विद्याधरनं ऐटीत त्याचं नाव रजिस्टरमध्ये लिहिलं. सही करताना त्याचं लक्ष आजोबांच्या सहीकडे गेलं. मग त्यानंही आपली सही केली. दोघंही पुढे निघाले. आजोबांनी पिशवीतून पुस्तक काढलं आणि ती पिशवी एका काउंटरवर दिली. विद्याधरचा प्रश्न तयारच होता, ‘‘आबा, पिशवी काउंटरवर का दिली हो?
‘‘अरे, आपली कोणतीही गोष्ट आतमध्ये न्यायला परवानगी नसते, ती येथे ठेवावी लागते.’’ दोघांनीही ग्रंथ दालनात प्रवेश केला. मोठ्या हॉलमधील रॅकमध्ये पुस्तकांचा मोठा संग्रह पाहून विद्याधरच्या तोंडातून ‘वॉव!’ असा उद्गार निघाला. ‘‘आजोबा, कालच आम्हाला सरांनी अलीबाबाच्या गुहेची गोष्ट सांगितली, तसंच काही तरी वाटतंय.’’
आजोबा म्हणाले, ‘‘हो का! पण ही तशी गुहा नाही बरं का! ही आहे ज्ञान, मनोरंजन आणि विद्येची गुहा. इथे प्रत्येक वाचकांना या रॅकमधील पुस्तकं इथे बसून वाचता येतात आणि घरीसुद्धा नेता येतात.’’
‘‘कित्ती छान हो आबा! एवढ्या मोठ्या पुस्तकातून मला पाहिजे ते पुस्तक कसं शोधायचं हो? ’’
‘‘तुझी शंका बरोबर आहे. मला सांग, काल आई -बाबा, तू हॉटेलमध्ये जेवायला गेला होता नं?’’
‘‘हो, पण त्याचं काय इथे?’’ विद्याधरनं आबांकडे पाहात विचारलं.
‘‘मला सांग बाबानं सुरुवातीला वेटरकडे काय मागितलं?’’
‘‘सूप.’’ विद्याधर चटकन् म्हणाला. त्यावर आबा म्हणाले, ‘‘नाही, नीट आठव.’’ विद्याधर विचारात पडला की, आबा तर आले नव्हते, मग ते कसे नाही म्हणाले. विद्याधर म्हणाला, ‘‘मग तुम्हीच सांगा बरं?’’
‘‘अरे, त्यांनी वेटरला मेनू कार्ड आणायला सांगितले ना?’’
‘‘हो खरंच, मग ते पाहूनच बाबांनी सूप मागवलं आणि नंतर जेवणाची ऑर्डर दिली ना! तसंच मेनू कार्ड इथेही असतं, पण त्याचं नाव असतं कॅटलॉग. त्या तिथे कोपऱ्यात लाकडी ड्रॉव्हर दिसतात ना तेच या ग्रंथालयाचं मेनू कार्ड. चल आपण तिकडे जाऊ.’’ आबा आणि विद्याधर कॅटलॉगजवळ गेले.
‘‘आता सांग, तुला कोणतं पुस्तक वाचायचं आहे?’’ आबांनी विद्याधरला विचारलं.
‘‘पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेलं शिवचरित्र.’’ कारण कालच त्याचा मित्र क्षितीजच्या बाबांनी त्याला ते पुस्तक विकत आणून दिलं होतं. आबा कॅटलॉगमध्ये ते पुस्तक शोधू लागले. विद्याधरही फार बारकाईनं ते पाहू लागला. त्यानं विचारलं, ‘‘आबा हे कसं शोधायचं हो?’’
आबा म्हणाले, ‘‘तू एखादा शब्द शब्दकोशात म्हणजे डिक्शनरीमध्ये कसा शोधतोस तसंच या कॅटलॉगची रचना असते. ‘शिवचरित्र’ हे पुस्तकाचं शीर्षक तुला चटकन आठवलं म्हणून आपण त्यानुसार शोधलं. काही वाचकांना पुस्तकाचं शीर्षक आठवत नाही, ते लेखकांच्या नावाप्रमाणे शोधतात. मग ते साहित्य प्रकारानुसार शोधतात किंवा विषयावर उदा. कथा, कविता, कादंबरी, इतिहास, भूगोल इ. आता आपण याच पुस्तकाच्या लेखकानुसार शोधू.
‘‘पण आबा, आपण सरळच त्यांना हे पुस्तक मागितलं आणि द्यायला सांगितलं तर?’’ विद्याधरनं प्रश्न केला.
‘‘तू पाहिलंस नं इथे किती पुस्तकं आहेत? एवढी पुस्तकं कशी बरं लक्षात राहतील, म्हणून हा कॅटलॉग तयार करतात. म्हणजे या ग्रंथालयातील सगळ्या पुस्तकांची नोंद यात असते.’’
आबांनी ‘शिवचरित्र’ हे पुस्तक ग्रंथालयात आहे असं कॅटलॉग पाहून सांगितल्याबरोबर विद्याधर खूश झाला आणि पळतच ग्रंथपाल बसले होते तेथे गेला. त्यांच्याकडे ते पुस्तक मागू लागला. आजोबा घाईघाईनं त्याच्या मागे आले आणि विद्याधरला म्हणाले, ‘‘अरे थांब, ही चिठ्ठी त्यांना दाखव मग ते पुस्तक काढून देतील.’’ विद्याधरनं ती चिठ्ठी पाहिली. आबांनी त्यावर काहीतरी आकडे लिहिले होते. विद्याधरनं लगेच प्रश्न केला, ‘‘हे काय लिहिलंय हो आबा.’’
ग्रंथपाल दोघांचा संवाद तोडत मध्येच म्हणाले, ‘‘ थांबा, मी सांगतो. इकडे ये बेटा,’’ असं म्हणून त्याला आत बोलावलं. आबांच्या हातून ती चिठ्ठी घेऊन ते त्याच्यासोबत आत चिठ्ठीवर पाहात एक एक रॅक सोडून पुढे जाऊ लागले. विद्याधर ग्रंथपालांसोबत पुढे पुढे जाऊ लागला. इतक्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकं पाहून हरखून जात होता. शेवटी एका रॅकजवळ थांबून त्यांनी ते पुस्तक बाहेर काढलं आणि विद्याधरच्या हातात दिलं. क्षितिजकडे जसं पुस्तक होतं तसंच ते होतं. विद्याधर खूश होत ते पुस्तक घेऊन पळतच आबांकडे आला. तो आबांना म्हणाला,’ ‘‘आबा, तुम्ही त्या चिठ्ठीवर काय लिहून दिलं होतं हो? ते ग्रंथपाल काका सरळ या पुस्तकाजवळच गेले.’’
आबा म्हणाले, ‘‘आपण जो कॅटलॉग पाहिला होता ना तिथे आपल्याला समजलं हे पुस्तक आहे, पण एवढ्या पुस्तकात ते कुठे ठेवलं आहे ते कसं ओळखायचं? तर आपण जो पुस्तकांचा मेनू कार्ड म्हणजे कॅटलॉग पाहिला ना तिथं हे पुस्तक आहे हे कळल्यावर तू पळत आला. पण त्याच ठिकाणी या पुस्तकाचा पत्ता दिला होता. तू काल विचारलं होतंस ना शिवबाच्या पुस्तकावर एक चिठ्ठी चिटकवली होती ते काय आहे म्हणून. तर तो पुस्तकाचा ग्रंथालयातला पत्ता असतो. तो आपल्याला कॅटलॉगमध्ये पाहून ग्रंथपालाकडे द्यावा लागतो, म्हणजे त्यांना आपल्याला हवं असलेलं पुस्तक चटकन सापडतं.’’
‘‘वॉव! भारीचकी.’’ आबांनी विद्याधरकडून ते पुस्तक घेऊन पुस्तक देवाण-घेवाण विभागाला त्या पुस्तकाची नोंद त्यांच्या नावावर करून द्यायला सांगितली आणि ते निघून गेले.
विद्याधर म्हणाला,‘‘आबा थांबा की हो, मला अजून ग्रंथालय दाखवा नं.’’ मग आबांनी त्याला वर्तमानपत्र कक्षात नेलं. हा बोर्ड पाहा. या बोर्डवर या ग्रंथालयात रोज येणाऱ्या वर्तमानपत्रांची नावं लिहिली आहेत. या विभागात फक्त वर्तमानपत्रंच नाहीत तर मासिकंसुद्धा येतात. आणि हा संदर्भ विभाग. या विभागातील पुस्तकंइथेच बसून वाचायची असतात, घरी नेता येत नाहीत.’’ दोघांनीही त्या विभागात प्रवेश केला. ती पुस्तकं पाहून विद्याधर म्हणाला, ‘‘आबा, ही पुस्तकं किती जाडजूड आहेत हो!’’ आबा म्हणाले, ‘‘हो कारण ही संदर्भग्रंथ आहेत. या ग्रंथात गोष्टी नसतात, तर माहिती असते. समजा, तुला एखाद्या देशाची माहिती हवी असेल किंवा एखाद्या क्रीडा प्रकाराची माहिती हवी असेल किंवा खगोलशास्त्र, विज्ञान जगतातल्या कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल ती या पुस्तकामध्ये सापडते. तुला निबंध लिहायचा असेल किंवा कोणा मोठ्या व्यक्तीवर भाषण करावयाचं असेल, वादविवाद स्पर्धेसाठी तयारी करावयाची असेल तर या विभागातील पुस्तकं फार उपयोगी ठरतात.
संदर्भ विभागून दोघं बाहेर पडले तर विद्याधरचं लक्ष अजून एका विभागाकडे गेलं. ‘‘आबा तिकडे बघा नं, एकदम नवीकोरी पुस्तकं दिसत आहेत.’’
‘‘इथे नव्या पुस्तकांच्या रजिस्टरमध्ये नोंदी केल्या जातात. आपण आल्या आल्या कॅटलॉग पहिला ना, त्यात नव्या आलेल्या पुस्तकांची माहिती अद्यायावत करतात. नव्या पुस्तकांच्या वर या ग्रंथालयाचा स्टॅंप मारतात. जसे तू नव्या वर्गात गेल्यावर नव्या पुस्तकांवर, वह्यांवर तुझे नाव टाकतोस तसंच या ग्रंथालयात आलेल्या पुस्तकांवर स्टॅंप मारल्यानं ही पुस्तकं याच ग्रंथालयाची आहेत हे समजतं. एवढंच नाही तर ग्रंथालयात या पुस्तकाला कुठे ठेवायचे हे याच विभागात ठरवतात. म्हणजेच पुस्तकाचा ग्रंथालयातील पत्ता! जसा तुला ‘शिवचरित्र’ हे पुस्तक शोधताना ग्रंथपालकाकांनी कसं बरोबर त्या पुस्तकाच्या जागेवर नेलं होत.’’
ते दोघे काउंटरवरून पिशवी घेऊन जाताना तिथे ठेवलेल्या बुक ट्रीकडे विद्याधरचे लक्ष गेले. त्यावर ठेवलेली पुस्तके पाहून तो म्हणाला, ‘‘आबा, ही पुस्तकं इथे का बरं ठेवली आहेत?’’
‘‘अरे, ही नवीन पुस्तकं आहेत. वाचकांना ते समजावं म्हणून इथे लावून ठेवतात. त्याच्या बाजूला ती लाकडी पेटी दिसते नं, त्याला सूचना पेटी म्हणतात. म्हणजे तुला या ग्रंथालयाला काही सूचना करावीशी वाटली किंवा तुला एखादं पुस्तक वाचायचं आहे आणि ते या ग्रंथालयात नसेल तर तू त्या पुस्तकाचे तपशील एका कागदावर लिहून त्या पेटीत टाकू शकतोस.’’ आबा म्हणाले.
घरी आल्यावर विद्याधरनं आई- बाबांना ग्रंथालयात काय पाहिलं ते सगळं सांगितलं आणि आता मी रोज आबांसोबत ग्रंथालयात जाणार हे जाहीर करून टाकलं.