बालमित्रांनो, सण-समारंभाच्या प्रसंगी नटणे-थटणे सर्वानाच आवडते. सौंदर्य खुलवण्यासाठी उत्तम पोशाख आणि दागदागिने यांची खरेदी या प्रसंगांसाठी मोठय़ा प्रमाणावर होते. आजचे कोडे हे अलंकारांशी संबंधित आहे. सोबत तुम्हाला दागिन्यांची नावे दिलेली आहेत. त्यांचे शरोभूषणे, कर्णभूषणे, नासिकाभूषणे, कंठभूषणे, बाहुभूषणे, कटीभूषणे, पद्मभूषणे असे सात गट आहेत. तुम्हाला दागिन्यांचे या विविध गटांत वर्गीकरण करता येते का पाहा बरं!
दागिन्यांची नावे :
बोर, भांगसर, बिजवरा, कुडय़ा, झुबे, भोकरे, छल्ला, नथ, मोरणी, बिंदी, ठुशी, लफ्फा, एकदाणी, तन्मणी, पिछोडी, बुगडी, चिंचपेटी, तोडे, गोठ, अंगठी, सिक्का, चमकी, वाकी, बाजुबंद, मेखला, कमरपट्टा, जोडवी, पैंजण, बिलवर, भिकबाळी, मासोळी, तोरडय़ा, वाळे, विरोल्या, लोलक.

उत्तरे :
शिरोभूषणे – बिंदी, बोर, भांगसर, बिजवरा
कर्णभूषणे – कुडय़ा, भिकबाळी, बुगडी, झुबे, भोकरे
नासिकाभूषणे – नथ, चमकी, लोलक, मोरणी
कंठभूषणे – ठुशी, चिंचपेटी, लफ्फा, एकदाणी, तन्मणी
बाहुभूषणे – बिलवर , पिछोडी, तोडे, गोठ, अंगठी, सिक्का, वाकी, बाजुबंद
कटीभूषणे – मेखला, छल्ला, कमरपट्टा
पद्मभूषणे – मासोळी, पैंजण, तोरडय़ा, वाळे, विरोल्या, जोडवी.

Story img Loader