सौंदर्यवती, चतुर, साध्वी, रुपमती अशी अहिल्या गौतमांची पत्नी. गौतमऋषी व अहिल्या यांचा संसार अत्यंत सुखाने चालला होता. धर्मपत्नी अहिल्या संसारात मग्न होती. पती हाच परमेश्वर मानून ही पतिव्रता अहिल्या अहोरात्र पतीची सेवा करीत असे. पण एकदा देवांचा राजा इंद्राची नजर अहिल्येवर पडली. तिच्या सौंदर्याने तो भारून गेला. तिला भेटण्यास आतूर झाला. पण छे, ते त्याला काही साध्य होत नव्हते. त्याने अनेक प्रयत्न करून पाहिले, पण एकही प्रयत्न यशस्वी होईना.  शेवटी त्याने कपट नीतीचा आधार घ्यायचे ठरवले. त्याप्रमाणे गौतमऋषी आश्रमात नसताना कपटाने गौतमऋषींचे रूप घेऊन इंद्र अहिल्येच्या झोपडीत गेला. साधीभोळी अहिल्या त्यालाच गौतमऋषी समजली. तिने इंद्राची सेवा केली. इंद्रदेव परत जाण्यास निघाला; इतक्यात, अहिल्यापती गौतमऋषी आश्रमात परतले. त्यांनी इंद्राला ओळखले.  सर्व प्रकार त्यांच्या क्षणार्धात लक्षात आला. ते प्रचंड क्रोधीत झाले आणि इंद्राला शाप देते झाले.
हळूहळू अहिल्येच्याही सर्व प्रकार लक्षात आला. स्वत:ची चूक जाणून ती कावरीबावरी झाली. गौतममुनी तिच्यावरही चिडून शाप देत म्हणाले,‘तू जन्मभर शिळा (दगड)  होऊन पडशील.’ हे ऐकून माता अहिल्या थिजून गेली. हरतऱ्हेने तिने पतीला आर्जवले, पण छे! ऋषी गौतम बधले नाहीत. अहिल्येनेही प्रयत्न सोडले नाहीत. तिने अनेकदा  त्यांची मनधरणी केली. शेवटी एकदाचा गौतममुनींना पाझर फुटला. त्यानी उ:शाप दिला की, ‘श्रीविष्णू रामप्रभूच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतील, त्यांच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल.’
बघताबघता अहिल्या शिळा होऊन पडली. अनेक तपे उलटली, उनपावसाचा मारा साहत शिळारूपी अहिल्या मनोमन श्रीरामाची वाट पाहत होती. शेवटी एकदाचा तो सुदिन उगवला. राम-लक्ष्मण मिथिलेला निघाले असता महर्षि विश्वामित्रांच्या सांगण्यानुसार श्रीरामाने शिळेला अंगठय़ाने स्पर्श केला आणि शिळेतून अहिल्या प्रकट झाली. तिचा उद्धार झाला.
तेव्हापासून जेव्हा एखाद्या अजाणतेपणी गुन्हा घडलेल्या व्यक्तीला खूप श्रमानंतर शिक्षेपासून सुटका मिळते; तेव्हा ‘अहिल्येसारखा उद्धार होणे’ असे म्हटले जाते.

Story img Loader