– ऐश्वर्य पाटेकर
गावाकडून चांदोबाचा मला मॅसेज आला
अरे किती दिवस झाले भेटायला नाही आला
कामात कुठे अडकलास करतोस तरी काय
तुझी कुठली मला काही खबरबातच नाय
उसंत नव्हती थोडी तरी लागलीच त्याला दिलं उत्तर
‘‘काय सांगू दोस्ता, दिवसाची कामे मला आहेत बहात्तर’’
चांदोबा म्हणाला, ‘‘एवढंच ना! मिळवना त्यात एक, होऊन जाऊदे त्र्याहत्तर
मात्र भेटायला ये काही करून तत्पर’’
काय सांगू त्याला आता माझी काय अवस्था
त्याच्यापर्यंत जात नाही माझा कुठलाच रस्ता
गप राहावे नं चांदोबाने, पण तो बोललाच,
‘‘विसरला की काय मला बोल माझ्या दोस्ता
भेटायला ये मात्र नक्की आपल्या दोस्तीचा वास्ता’’
मोडवेना मन त्याचं माझा नाइलाज झाला
क्लासमधूनच त्यास व्हिडीओ कॉल केला
चांदोबा झाला आवाक ‘आ’ वासून पाहत राहिला
‘‘चांदोबा, पाहतोयस का नुसता; तुला का वाघ दिसला?’’
चांदोबा म्हणाला,
‘‘कुठल्या जगात राहतो काही कळतच नाही
घरदार अंगण-ओटा असं काही दिसतच नाही’’
त्यास म्हणालो,
‘‘घरदार काय पुसतो अंगणाला पर्याय पॅसेज
तुझ्या नाही जेवढ्या चांदण्या तेवढं मिळवायचंय पॅकेज
रात्रंदिवस राबतो आहे, इकडून तिकडे धावतो आहे
स्पर्धाच मोठी, ब्रेड-बटर नाही, अभ्यासाला गिळतो आहे
नदीबिदीत डुंबायला माझ्याकडे नाही वेळ
सूरपारंब्या, विटू-दांडू हेही विसरलो आता खेळ
जग फार बदललं काहीच राहिलं नाही जुनं
अॅडजस्ट करावंच लागेल बाजूला ठेवून उणंदुणं
दिवस कुठे उगवतो आणि रात्र कधी होते
जेव्हा पाहावं तेव्हा वेळ दप्तराच्या बोकांडी बसते
दप्तराला मन थोडंच तेही धरतं माझा गळा
हातापायात दोर करकचून धरून आहे माझी शाळा
हसलो कधी आठवत नाही, रडलो कधी आठवत नाही
अभ्यासाशिवाय दुसरं स्वप्नही पडत नाही’’
माझी केवढी कीव आली फार त्यास वाईट वाटले
कळवळून आले जणू भावुक होऊन मला म्हटले,
‘‘काय हे, एवढुशा पाठीवर केवढं मोठ ते दप्तर
अरेरे पृथ्वीच्या पाठीवर जसा असतो डोंगर
एवढ्याशा वयातच होऊन जाशील म्हातारा
काहीतरी असेलच की याच्यावरचा उतारा?’’
‘‘ऐकना मग चांदोबा माझं तूच ओझं कमी कर
आकाशाच्या पाटीवर लिहून ठेव सगळं दप्तर!’’
चांदोबाला भरून आलं त्याचे डोळे ओले झाले
आवंढा गिळत त्याचे शब्द कसेबसे ओठी आले
‘‘रडवशील का आता मला असं कधी होतं काय
दूध तापल्याशिवाय येत असते का त्यावर साय?
कवितेत ठीक आहे, प्रत्यक्षात असं नसतं
ज्याचं त्याचं ओझं बरका ज्याला-त्याला उचलायचं असतं
बिकट आली वेळ खरी, तुझा तूच मार्ग काढ
परिस्थितीने तोडलं नातं पुन्हा तूच शिवून काढ
पाहवेना हाल तुझे माझाच घाबरा झाला जीव
व्हिडिओ कॉल कट कर खूपच आली तुझी कीव.’’
खूप दिवस वाट पाहिली चांदोबाचा मेसेज नाही
मीच धाडले इतके मेसेज एकालाही रिप्लाय नाही
निंबोणीच्या झाडावर का काळीज काढून ठेवलंस?
माणसाइतकंच का तुही मन बथ्थड करून टाकलंस?
सहज पाहिलं आकाशाकडे आणि दिसलं माझं दप्तर
माफ कर चांदोबा मला हेच तर हवं होतं उत्तर
चांदोबाचं दप्तर आता हलका करील माझा भार
निसर्गाचं पाठ्यपुस्तक चैतन्याचं उघडील दार
oviaishpate@gmail. com