निकोलला पॉपकॉर्न (मक्याच्या लाह्या) खूप आवडत; त्यामुळे तिच्या आईने कपाटात मक्याच्या दाण्यांची पिशवीच आणून ठेवली होती. त्या पिशवीतला एक मक्याचा दाणा खूपच खोडकर होता. त्याला लाही व्हायचे नव्हते. त्यामुळे पिशवीत बसून तो खूप विचार करायचा. शेवटी त्याने त्या पिशवीतून पळून जायचे ठरवले; पण इतर मक्याच्या दाण्यांना ते काही पटले नाही. एकेदिवशी निकोलच्या आईने लाह्या करण्यासाठी कपाटातून पिशवी बाहेर काढली आणि कट्टय़ावरच्या बशीत त्यातले मक्याचे दाणे काढले. ती कढई आणि चमचा आणायला गेली. तेवढय़ात तिचे लक्ष नाही असे बघून खोडकर मक्याच्या दाण्याने पटकन उडी मारली आणि तो खुर्चीत जाऊन पडला. आता पुढे काय करावे असा विचार करत असतानाच निकोल स्वयंपाकघरात आली आणि त्या खुर्चीत बसली. बसल्यावर तिला काहीतरी टोचले म्हणून ती जोरात ओरडली. आईने येऊन बघितले तर खुर्चीत मक्याचा एक दाणा होता. तिने त्याला उचलले आणि हवेत उंच उडवले, तर तो जाऊन पडला निकोलच्या बुटात. निकोल पॉपकॉर्न खाऊन झाल्यावर बूट घालून बाहेर खेळायला जायला निघाली, पण दोन पावले चालल्यावर तिला बुटात काहीतरी टोचायला लागले. ती बूट काढून बघते तर त्यात तोच मक्याचा दाणा दिसला. तिने चिडून तो मक्याचा दाणा लांबवर फेकून दिला, तो जाऊन पडला तिच्या पलंगावर.
खेळून दमलेली निकोल रात्री पलंगावर झोपायला गेली; पण तिच्या पाठीला सारखे काहीतरी टोचायला लागले. त्यामुळे तिला झोप आली नाही. उठून बघितले तर परत तोच मक्याचा दाणा तिच्या अंथरूणावर दिसला. तिने रागाने त्या मक्याच्या दाण्याला खाली ढकलून दिले आणि गाढ झोपून गेली.
सकाळी उठली तर तिचा पाय खाली ढकललेल्या मक्याच्या दाण्यावर पडला. तिच्या नाजूक पायांना तो दाणा टचकन टोचला आाणि ती वेदनेने विव्हळली. आता मात्र ती त्या मक्याच्या दाण्यावर चांगलीच रागावली. तिने त्याला हातात उचलून घेतले आणि विचारले, ‘‘तू मला का सारखा त्रास देत आहेस?’’
त्यावर खोडकर मक्याचा दाणा म्हणला, ‘‘अगं निकोल, तुला त्रास द्यायचा माझा अजिबात हेतू नाही .मला फक्त तुझी मदत हवी आहे. मला पॉपकॉर्न बनायचे नाहीये. मला झाड व्हायचे आहे. त्यासाठी तू तुझ्या बागेत एका कुंडीत मला पेर. थोडय़ा दिवसांनी त्या कुंडीत मक्याचे झाड येईल. त्याला छोटी छोटी कणसे लागतील आणि मग त्यात दाणे तयार होतील.’’
निकोलला खोडकर मक्याच्या बोलण्याचे खूप हसू आले. त्याचे बोलणे ऐकून तिचा राग गेला. नंतर ती बागेत गेली आणि तिथली एक कुंडी घेऊन त्यात तो मक्याचा दाणा पेरला. ती नियमितपणे त्याला खतपाणी घालायची. काही दिवसांनी त्यातून इवलेसे रोप उगवले. निकोलची आणि मक्याच्या रोपाची चांगलीच दोस्ती झाली. एके दिवशी त्या झाडाला छोटेसे कणीस लागले. खोडकर मक्याच्या दाण्याची इछा पूर्ण झाली होती. त्यामुळे निकोललाही खूप आनंद झाला.
(डॅनिश कथेवर आधारित)
पॉपकॉर्न
निकोलला पॉपकॉर्न (मक्याच्या लाह्या) खूप आवडत; त्यामुळे तिच्या आईने कपाटात मक्याच्या दाण्यांची पिशवीच आणून ठेवली होती. त्या पिशवीतला एक मक्याचा दाणा खूपच खोडकर होता. त्याला लाही व्हायचे नव्हते.
आणखी वाचा
First published on: 15-10-2012 at 12:51 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifil mrunal tulpule danish story popcorn