वैभवीने घरात येताच अंग धाडकन समोरच्या सोफ्यावर आदळलं. आवाजानेच समोर जपमाळ ओढत बसलेल्या आजीने डोळे उघडले आणि स्वयंपाकघरात काम करत बसलेली आई धावत धावत हॉलमध्ये आली.
‘‘आज्जी, आमच्या शाळेत की नाही सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमांची तयारी चालू आहे. सर कित्ती रिहर्सल करून घेतात आमच्याकडून. सारखं आपलं तेच ते. काय तर म्हणे सव्वीस जानेवारी! बघ ना आत्ताच शाळेत ट्रॅडिशनल डे झाला, नंतर गॅदिरग झालं. आता कशाला पाहिजेय सव्वीस जानेवारी?’’ वैभवी बोलतच सुटली होती. एकूण काय, ती सु..ट..ली होती. काय बोलावं याचं भान नव्हतं तिला. त्यामुळे आजीच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या भावांकडे तिचं लक्ष नव्हतं. आजीचा चेहरा वाक्यावाक्याला बदलत होता. माळ ओढायचं विसरलीच होती ती. आई जरी तिथे नसली तरी किचनमध्ये काम करता करता आजीची काय परिस्थिती झाली असेल याची तिला जाणीव होत होती. शेवटी आईलाच वैभवीची मुक्ताफळं ऐकवेनात. ती न राहवून बाहेर आली नि म्हणाली, ‘‘अगं, काय बोलतेयस तू? काही भान आहे का तुला? २६ जानेवारी या दिवसाचं महत्त्व तुला माहीत आहे का? हा दिवस आहे म्हणून तुला हे बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालंय. या दिवशी आपला भारत एक सार्वभौम, समाजवादी, प्रजासत्ताक म्हणून जाहीर झाला. त्यामुळेच सर्व भारतीयांना अनेक हक्क आणि कर्तव्यं मिळाली. जसं की आपली मतं मांडण्याचा हा हक्क तुला मिळालाय म्हणून त्या हक्कांचा गरवापर करू नकोस.’’ आपलं काही चुकलं अशी जाणीव होऊन वैभवी गप्प बसली. आजी जपमाळ ओढू लागली. आई पुन्हा आपल्या कामाकडे वळली.
आता वैभवीच्या हातात रिमोट आला. चॅनेल्स सìफग सुरू झालं. मध्येच एखादी सीरियल, डान्स शो, नॅशनल जिओग्राफी असं काही ना काही बघणं सुरू झालं. एका चॅनेलवर क्रिकेटची लाईव्ह मॅच दाखवत होते. त्यात भारताची घसरण चालू होती. ते पाहून वैभवीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. ‘‘काहीच अर्थ नाही आपल्या खेळाडूंमध्ये. अज्जिबात चांगले खेळत नाहीत ते. काहीच खेळता येत नाही त्यांना.’’ पुटपुटतच तिने दुसरं चॅनेल लावलं. त्या चॅनेलवर इतर काही वैयक्तिक खेळ सुरू होते. परदेशी खेळाडूंचं उत्तम प्रदर्शन पडद्यावर झळकत होतं. त्यांचं कौशल्य मनमोहक होतं. तरीही वैभवी आजीला म्हणाली, ‘‘आजी, अगं या खेळांमध्येही किती फ्रॉड चालतो माहीत आहे का? आमच्या वर्गातली हर्षां सांगत होती, की खूप पसे घेतात म्हणे तिथे नंबर काढण्यासाठी. किती वशिला लागतो माहीत आहे का. वशिल्याशिवाय काही नाहीए बरं सगळ्या खेळांमध्ये.’’
आता मात्र आजीने हातातली माळ खाली ठेवलीच. ‘‘काय गं सगळ्या बाबतीत वाईटच बरं दिसतं ग तुला? चांगलं काहीतरी बघत जा की! चांगलं काय बघायचं आजी? आज सगळीकडे असंच असतं. माझे मित्रमत्रिणीही असंच सांगतात. ओळख, वशिला हवाच म्हणतात सगळीकडे.’’
आजी उठून वैभवीच्या शेजारी येऊन बसली. ‘‘असं नसतं बाळा. तुझ्या मित्र-मैत्रिणींना असा किती अनुभव आहे? कोणीतरी सांगतं म्हणूनच ऐकतात ना ते? आणि पाहणं आणि ऐकणं यात चार बोटांचं अंतर असतं. आता असं कर हं, क्रिकेट पाहताना आपले खेळाडू देशासाठी किती आत्मीयतेने खेळतात असा विचार करून पाहा बरं. आणि हे खेळाडू बघ. किती लवचीक आहेत ते. त्यांनी त्यासाठी किती सराव केला असेल याची जाणीव तरी आहे का तुला? आणि तुझ्यात आहे का त्या सरावासाठी लागणारं बळ, सातत्य, चिकाटी? एवढासा २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचा सराव केलास तर त्याचा एवढा बाऊ करतेयस, तर असा अखंड, अतोनात सराव करणं आपल्याला आधी जमेल का पाहावं आणि मग बोलावं. उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये.’’ आजीचं हे सुरू असतानाच आईही बाहेर येऊन बसली होती.
‘‘यांना सवयच आहे तशी. परवाच मी तिच्यावर जाम चिडले होते. परवा ही, मनाली, रिया, दर्शन आणि अरुंधती सगळे मिळून महात्मा गांधीजी कसे चूक वगरे मतं मांडत होती. वैभवी, तुम्हाला किती ग माहिती आहे गांधीजींच्या कार्याची? किती वाचलंयस तू त्यांच्याविषयी? किती अभ्यास केलायस? तूच कशाला, तुझ्या मित्र-मैत्रिणींना किती माहीत आहे ग?
‘‘अगं ममा, पण आम्हीच काही चुकलो नाही हं. अगं, तो रियाचा दादा, मिनूची ताई आणि खूप सारे मोठेही असं बोलतात ना मध्ये मध्ये. आम्ही कितीदा तरी ऐकलंय. मग आम्ही बोललो तर मात्र आम्हाला एवढा ओरडा का?’’ वैभवीचा रडका सूर सुरू झाला.
‘‘अगं, ओरडा नाही. आणि तू म्हणतेस ते बरोबर आहे. असते अनेकांना अशी सवय. सर्व बाजूंचा विचार न करता करून टाकतात एकदम टिप्पणी. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी एवढं केलं, पण त्याचा विचारच करत नाहीत. तुम्हाला त्याची जाणीव नाही असं नाही म्हणणार मी; पण तुमचा विचार मात्र चुकीचा आहे हे माझ्या लक्षात आलंय. आता बघ ना, स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ज्या लोकांनी आपल्या जनतेत चांगले विचार रुजवले, योग्य आचरणाचा पायंडा घालून दिला, ते कसे चूक होते ते तुम्ही सहजगत्या बोलता. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी त्यांनी किती नवनवे विचार मांडले, नवनव्या योजना राबवल्या. पण तो उल्लेख मात्र तुम्ही करतच नाही. लालबहादूर शास्त्रींनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारा देत किती सुंदर विचार मांडला होता, पण त्यांच्या जयंतीव्यतिरिक्तच्या दिवशी माहीत तरी असतो का तो! गांधीजींचं वागणं हे अख्ख्या जगासाठी एक आदर्शवत् असं पुस्तकच आहे. पण तुम्ही मात्र गांधीजींच्या अनेक आचारविचारांवर टीका करण्याचा एकही चान्स सहसा सोडत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं कार्य किती अनमोल आहे. पण त्यांच्यावरही बिनदिक्कत मतप्रदर्शन करता की. तुम्हा मुलांमध्ये स्वा. सावरकर, भगतसिंह, आगरकर, टिळक यांच्यासारख्या अनेकांच्या बाबतीतला विचारही त्यांची फारशी जाणीव ठेवणारा का नसतो, हा प्रश्न मला खूप त्रास देतो बघ. हे सारेजण आधी केले, मग सांगितले या पंथातले. कृती करताना किती हालअपेष्टांना सामोरे गेलेत ते तुला माहीत आहे का वैभवी? तुला नि तुझ्या मित्रमत्रिणींनाही? आधी त्यांचे आचार-विचार जाणून घ्या, त्यांचा योग्य तो अभ्यास करा आणि मग बिनदिक्कत टिप्पणी करा, कोण नाही म्हणतंय?’’ आई आणि आजीच्या या बोलण्याने वैभवीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. त्यांचं म्हणणं तिला पटत होतं.
‘‘आजी, या सव्वीस जानेवारीला तू सांगशील का ग आपल्या बििल्डगमधल्या आम्हा सर्व मुलांना ही सारी माहिती? मी सांगते सगळ्यांना आत्ताच तसं.’’ आजीचा होकार येण्यापूर्वीच वैभवीने बििल्डगमधल्या मुलांना आजीच्या या स्पेशल कार्यक्रमाची वर्दी देण्यासाठी धूम ठोकली. आई व आजीच्या विचारांनी तिच्या मनाला ‘सावधान’ अशी ऑर्डर दिली होती. ते उमजून आई व आजी एकमेकींकडे पाहत गालातल्या गालात हसल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा