‘‘आजी काय करते आहेस? मी पण येते ना तुझ्या मदतीला.’’ दसरा जवळ आला म्हणून मी जरा माळा आवरायला घेतला होता. साहजिकच वरचा पसारा खाली येत होता. तो वाढवणं हे तर रतीचं आवडीचं काम. त्यामुळे तिची लुडबूड चालू झाली.
‘‘मी छोटं हलकं-हलकं सामान वरून तुझ्या हातात देते. ते खाली ठेव, पण संभाळून हं, कुठे धडपडू नकोस,’’ मी रतीला गुंतवून टाकलं. पाण्याच्या टाकीनेच माळ्याचा बराचसा भाग अडल्यामुळे तसं खूप अवजड सामान नव्हतंच. ‘‘आजी, एवढंच सामान आहे माळ्यावरती.’’ आजीला खूप मदत करण्याची नामी संधी हुकली आणि आता लवकर अभ्यासाला बसावं लागेल या विचारानं रतीला बहुदा वाईट वाटलं असावं.
सामानात काय काय आहे हे नजरेखालून घालावं, असा विचार करीत मी खाली बसून सगळ्या पिशव्या, खोके तपासू लागले. ‘‘आजी मलाही दाखव नं त्यात काय आहे?’’ असं म्हणत रतीची उसकपासक चालू झाली. वस्तू पटकन पिशवीत जाईना.
‘‘आजी हे काय आहे?’’
‘‘अगं ती पाटी आहे तुझ्या आईची शाळेत जातानाची’’
‘‘आजी थांब. आणखीनसुद्धा एक छोटीशी पाटी दिसते आहे आत.’’
‘‘अगं, एक दगडी डबल पाटी आणि एक मणी लावलेली पत्र्याची सिंगल पाटी, अशा दोन पाटय़ा असतील बघ.’’
रती पाटय़ांच्या प्रेमात पडली. ‘‘आजी, बाईंचा भिंतीवर लावायचा फळा तसा हा मुलांचा मांडीवर घ्यायचा फळाच वाटतो, नाही का गं?’’ पाटी पुन्हा माळ्यावर जाणं मला कठीणच वाटू लागलं.
‘‘आजी, आम्हाला का नाही आणली पाटी?’’
‘‘आता शाळेत पाटी लागतच नाहीत वेडाबाई. तुम्ही वह्याच वापरता ना! पूर्वी चौथीपर्यंत पाटी वापरावीच लागायची. दसऱ्याला शाळेत पाटीपूजन असायचं. किंबहुना दसऱ्याला पाटीपूजन करून शाळेत नाव घातलं जायचं, दसऱ्याच्या आदल्या दिवशी सगळी बालगोपाळ मंडळी कोळसा घेऊन पाटी घासण्यात गर्क असायची.’’
‘‘कोळसा कसा असतो गं?’’ तिला घरात कोळसा पाहिलेला आठवेना.
‘‘कोळसा काळाकुट्ट असतो. बंबात घालायला लागायचा आम्हाला. त्याने पाटी घासली की ती काळी, गुळगुळीत होते. पाटी घासताना सगळ्यांच्या हाता-पायावर, तोंडावरसुद्धा काळे फरफाटे उमटायचे. मजा यायची.’’
इतक्यात विराज झोपेतून उठून आत आला. पाटय़ांची खेचाखेच रंगली, पण शहाण्या रतीने माघार घेत विराजला पाटय़ा देऊन टाकल्या.
‘‘घासलेल्या पाटीचं काय करतात गं आजी,’’ रतीला राहवेना. ‘‘एक’ आकडय़ाची सरस्वती असते ना ती घरातलं कोणीतरी काढून द्यायचं पाटीवर, एखाद्याची चित्रकला चांगली असेल तर सरस्वतीचं चित्र काढलं जाई.’’
‘‘पण सरस्वती काढायची कशाने? बाईंच्या खडूने का? विराजचं पाटीवरच्या मण्यांशी खेळून झालं होतं. आता मनातून खडूच हवा होता.
‘‘अरे, दुधी रंगाच्या पाटीवरच्या पेन्सिली मिळायच्या. त्याच्या जवळजवळ अध्र्या भागाला रंगीत चांदी गुंडाळलेली असायची. भुसा भरलेल्या खोक्यात पेन्सिली खोचून ठेवलेल्या असायच्या. सरस्वती काढली की ती पुसली जाऊ नये, आतल्या बाजूला राहावी, अशी काळजी घेऊन डबल पाटी दुमडली जायची. सिंगल पाटी असली की छान पुठ्ठा घेऊन ती झाकून ठेवली जायची.’’
‘‘आणि मग पूजेची तयारी काय केली जायची?’’ रती
‘‘अगं, दोन छोटेसे चौकोनी कागद घेऊन हळद आणि कुंकू अशा पुडय़ा केल्या जायच्या. बागेतली दोन-चार फुलं उदबत्ती, अक्षता, पुडय़ा एका कापडी पिशवीत घेतल्या जायच्या. दसऱ्याच्या दिवशी नवीन कपडे घालून शाळेत जायला मुलं खूश असायची. शाळेत बाई पाटीवरच्या सरस्वतीला हळद-कुंकू, फूल वाहायला सांगायच्या. उदबत्ती लावली जायची. ‘नमस्ते शारदे देवी’ किंवा ‘याकुंदे’ ही प्रार्थना बाई म्हणायला सांगायच्या. सर्वाना साखर-फुटाणे वाटले जायचे. फुलं पडू नयेत म्हणून दोन हातांवर आडवी पाटी धरली जायची. गालात साखर-फुटाणे ठेवून मंडळी आनंदात घरी परतायची. अशा रीतीने पाटीवर सरस्वती पूजन करून शिक्षणाचा श्री गणेशा व्हायचा.’’
‘‘आजी, सरस्वतीचे वाहन हंसच आहे ना गं’’ इतक्या वेळ गप्प बसून ऐकणाऱ्या विराजला एकदम आठवलं.
‘‘हो तर.. आणि ते सारासार विवेक, नेमका- योग्य विचार याचे प्रतीक आहे. हंसावर बसलेल्या भगवती सरस्वतीच्या चार भुजा चार दिशांचे प्रतीक असून, तिच्या सर्वव्यापकत्वाचे लक्षण आहे. सरस्वतीच्या एका हातातील ग्रंथ हे ज्ञानप्राप्तीचे साधन आहे. दुसऱ्या हातातील माळ हे चित्त एकाग्र करून अभ्यास करण्यास सुचविले आहे. तिसऱ्या हातात धरलेली वीणा ही संगीताची, कलेची द्योतक आहे. तर चौथ्या हातातले कमळ हे निर्मळ सौंदर्याचे, शुचितेचे प्रतीक आहे. उत्पत्ती, स्थिती व लय हा जगाचा नियम ते उमलणे, विकसणे व मिटणे या अवस्थांतून व्यक्त करते.’’
‘‘आजी, आम्ही करू का गं पाटी पूजन घरच्या घरी,’’ रतीने विचारताच ‘करतो ना गं, करतो ना गं, प्लीज’ म्हणत विराजही उडय़ा मारू लागला.
‘‘असं करा, मी तुम्हाला आकडय़ांची सरस्वती काढून देते. तुम्ही दोघांनी ती बघून दुसऱ्या कागदावर काढा आणि देवासमोर ठेवून तिची पूजा करा, पण नुसतं एवढंच करून चालणार नाही. दसऱ्याच्या सुमुहुर्तावर पुस्तक उघडून थोडा अभ्यास करणे, नियमित अभ्यास करण्याचा संकल्प करणे हीच सरस्वतीची खरी पूजा. मग ती प्रसन्न होऊन ‘यशस्वी भव’ असा आशीर्वाद नक्कीच देईल. हा पसारा आवरायला आधी मला मदत करा आणि मग सरस्वती काढा. शुभस्य शीघ्रम.’
आजीला मदत करायचं विसरून दोघंही उडय़ा मारीत कोरा कागद शोधायला धावले. आजी कौतुकाने पाहत राहिली.
    
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा