मुक्ता चैतन्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सìफगच्या वाचक मित्रमैत्रिणींनो, आजचा हा शेवटचा लेख आहे. खरं तर वर्ष कसं संपलं ते समजलंच नाही, इतकी मज्जा तुम्हा मित्रमत्रिणींसाठी लिहिताना आणि त्यावरच्या भरघोस प्रतिक्रिया वाचताना आली. इंटरनेट हे भूलभुलया आहे, जादूची दुनिया आहे तसाच माहितीचा खजिना आहे. इथे शिरल्यावर कुठला मार्ग घ्यायचा आणि काय शोधायचं, बघायचं, ऐकायचं हे ठरवता आलंच पाहिजे. ते तुम्हाला ठरवता यावं, या आभासी आणि अनोळखी दुनियेत फिरताना धोके काय असू शकतात ते तुम्हाला समजावेत, यासाठी ही लेखमाला होती.

शेवट करताना एकदा काही महत्त्वाच्या मुद्दय़ांची उजळणी केली पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही आता बऱ्यापकी माध्यमसाक्षर झाला आहात. इंटरनेट, गुगल, सोशल मीडिया या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत, पण त्याचा चांगला वापर आणि धोके टाळण्यासाठी काय केलं पाहिजे याचीही माहिती तुमच्याजवळ आहेच.

आता थोडं त्यापुढे जाऊ या.

टिन आणि प्री-टीन वयातल्या मुलांची स्क्रीनशी प्रचंड दोस्ती असते. येता-जाता तुम्हाला आई-बाबांचा मोबाइल हवा असतो. तुमचा दिवसभरातला एकूण स्क्रीनटाइम प्रचंड असतो. या सगळ्या स्क्रीन्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रचंड माहिती पोहोचत असते. ही माहिती कुणीही फिल्टर करत नाही. अशा वेळी आपण काय बघायचंय, काय टाळायचं आहे याचे निर्णय तुमचे तुम्हालाच घ्यायचे आहेत. तुम्ही आता मोठे होत आहात. हळूहळू अनेक गोष्टींचे निर्णय तुमचे तुम्हालाच घ्यायचे आहेत. शिवाय तुम्हालाही आता आई-बाबांनी लहान मुलांसारखं वागवलेलं आवडत नाही ना, मग जर तुम्हाला मोठ्ठं व्हायचं असेल तर जबाबदारीने निर्णय घेण्याची सवयही केलीच पाहिजे.

मग आता सुरुवात करा स्वत:चा स्क्रीनटाइम कमी करण्यापासून. आधी आठवडाभर रोज तुम्ही टीव्ही, मोबाइल आदी गोष्टी किती तास वापरता याच्या नोंदी करा. समजा, तुम्ही दिवसातून चार तास वापरत असाल, तर पुढल्या आठवडय़ात तीन तास वापरा. मग दोन. आणि मग एक. एक तासापेक्षा जास्त वेळ या गोष्टींना कशाला द्यायचा? त्यापेक्षा इतर खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्या करून बघा.

आता स्वत:ला काही नियम घालून घेता येतायेत का बघा. दरवेळी आई-बाबांनीच कशाला आपल्यासाठी नियम तयार करायचे? कधी तरी आपणही स्वत:साठी हे करूच शकतो.

तर स्वत:साठीच नियम!

समजा, तुम्हाला आई-बाबांनी फोन घेऊन दिला, तरी त्यावर तुम्ही कधीही पासवर्ड टाकू नका. टाकलात तरी तो आई-बाबांपासून लपवू नका. आई-बाबांनी तुमचा फोन बघितला, तपासाला तरी त्यात काहीही वावगं नसतं. या सगळ्या आभासी जगाविषयी त्यांना तुमच्यापेक्षा जास्त माहीत आहे. तुम्ही कसल्या धोक्यात नाही ना, हे बघण्यासाठी ते फोन चेक करतात. तुमच्यावर त्यांचा विश्वास असतोच.

फोन कधीही शाळेत, क्लासला घेऊन जाऊ नका. रात्री उशिरा कुणाही मित्रमत्रिणीला फोन करू नका. खूपच घाईचे, महत्त्वाचे काम असेल तर आई-बाबांपकी कुणाच्या तरी कानावर घालून मग फोन करा. किंवा त्यांच्या फोनवरून मित्रमत्रिणींच्या आई-बाबांना फोन करा. परस्पर करू नका.

फोनवरून कुणाचेही फोटो काढू नका. स्वत:चे फोटो कुणाही अनोळखी व्यक्तीला कधीही पाठवू नका. चारचौघांत असताना फोनमध्ये डोकं घालून बसू नका. माणसांशी बोलण्यात जी मजा आहे ती चॅटिंगमध्ये नाही, हा एका दोस्ताचा सल्ला आहे.

स्वत:च्या किंवा इतर कुणाच्याही शरीराचे, विशेषत: खासगी अवयवांचे फोटो काढून ते कधीही कुणालाही पाठवू नका. हे खूप धोकादायक आहे. तुम्ही चुकूनही असं काही करणार नाही हे मनाशी पक्कं ठरवा.

जेवताना फोन बाजूला ठेवा. आपण काय खातोय, त्याची चव, रंग, वास आपल्या मेंदूपर्यंत पोहोचलीच पाहिजे. निर्जीवपणे जेवण्यात काय मजा आहे सांगा? डिजिटल मीडिया जंक फूडसारखा आहे. जंक फूड खाऊ नका असे कुणीच म्हणत नाही, पण ते किती खायचे आणि किती वेळा खायचे याचा विचार आवश्यक आहे. सकस आणि परिपूर्ण अन्न न खाता सतत जर आपण जंक फूड खात राहिलो तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर, मनावर होणारच आहेत. तीच गोष्ट डिजिटल मीडियालाही लागू होते. जंक फूडचा अतिरेक झाला की वजन वाढतं, पोट बिघडतं, आणखीनही अनेक समस्या निर्माण होतात. तसंच तुमचा स्क्रीनटाइम जितका जास्त तितकी तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते. चिडचिड होऊ शकते. आई-बाबांनी मोबाइल काढून घेतला कीराग येऊ शकतो.

झोपेची समस्या उद्भवू शकते. इतरांचे सुंदर फोटो बघून स्वत:विषयी राग येऊ शकतो, पण इतरांचे सुंदर फोटो ही निरनिराळ्या फोटो करेक्शन अ‍ॅप्सची कमाल असते हे विसरू नका.

फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आऊटसारखं काही तरी वाटू शकतं. म्हणजे सतत मित्रमत्रिणी ऑनलाइन काय करतायेत, ते आपल्याला समजलंच पाहिजे अशी तीव्र भावना. जर आपल्याला अपडेट्स मिळाले नाहीत तर आपल्याला मिसिंग आऊट वाटायला लागतं. हे सगळं चांगलं नाहीये. असं काहीही वाटायला लागलं तर लगेच आई-बाबांशी बोला. त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवू नका.

ऑनलाइन वापरताना कुणी तुमच्याशी गरवर्तन केलं, कुणी त्रास दिला, कुणी तुमची किंवा आई-बाबांची खासगी माहिती मागितली, बँकेचे डिटेल्स मागितले तर समोरच्या व्यक्तीला काहीही न पुरवता आधी आई-बाबांना सांगा. सायबर पोलीस आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी असतात. ते अशा वेळी आपल्याला मदत करतात. त्यामुळे गप्प राहून त्रास सहन करू नका. आणि हो, तुम्ही स्वत:साठी जो काही स्क्रीनटाइम ठरवाल त्यात छान छान व्हिडीओज् बघा, भाषा शिका, स्वयंपाकाच्या रेसिपीज् बघा, बागकाम करा, स्वत:च्या हाताने वस्तू बनवा, अरिवद गुप्तांच्या साइटवर नक्की जा, तिथे दिलेली वैज्ञानिक खेळणी बनवून बघा. शॉर्ट फिल्म्स बघा. गेमिंग, चॅटिंग आणि सोशल मीडियावर फोटो टाकण्यापलीकडे इंटरनेटच्या आभासी जगात खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत. त्याविषयी वर्षभर आपण चर्चा केलीच आहे. त्या बघा. पॉडकास्ट ऐका. स्वत:चा ब्लॉग लिहा. खूप सर करा आणि मजाही करा.

मला खात्री आहे की तुम्ही जागतेपणाने इंटरनेटवर वावराल. तुमचे मित्रमत्रिणी चुकत असतील तर त्यांना वेळीच सावध कराल. समजावून सांगाल. करणार ना इतकं? ठरवणार ना स्वत:साठी स्क्रीनटाइम?

ऑल द बेस्ट आणि नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा!

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

(समाप्त)

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Become a medium literate