स्वाती केतकर- पंडित swati.pandit@expressindia.com

सुट्टीचा काळ म्हणजे धमाल काळ. वर्षभर ज्याची वाट आतुरतेने पाहिली जाते अशी उन्हाळी सुट्टी आल्यावर मात्र मग ‘अतिपरिचयात अवज्ञा’ अशासारखं होतं. पहिले थोडे उत्साहाचे दिवस गेले की मुलांचे प्रश्न सुरू होतात. ‘काय करू आई? मला कंटाळा आलाय रे बाबा, तू माझ्याशी कधी खेळणार?’ या प्रश्नांवर एक सोपं उत्तर आहे- पुस्तकं. हल्ली निरनिराळ्या भाषांमध्ये, विविध वयोगटांसाठी उत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत. अशा काही पुस्तकांची ओळख.. 

भटकंतीच्या गोष्टी..

‘माझी सुट्टी- गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि ओडिशा’ हा चार पुस्तकांचा संच. मुलांच्या नजरेतलं जग कायम वेगळंच असतं. ते शोधायला हवं, ते पाहण्याचा प्रयत्न करायला हवा असं नेहमी म्हटलं जातं. लेखिका गार्गी सहस्रबुद्धे यांनी नेमकं हेच केलंय. आपल्या छोटय़ा कबीरसोबत सुट्टी घालवताना दिसलेला गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि ओडिशा त्यांनी कबीरच्याच भाषेत मांडलाय. अगदी कबीरचा चष्मा घालूनच आपण या सगळ्या प्रदेशांकडे बघतो. गोव्याची वेगळी भाषा, राजस्थानमध्ये उंटावरून सेल्फी काढणारा माणूस आणि या सगळ्या ठिकाणांच्या ‘थाऊजंड मिलियन सिक्स्टी फोर गोष्टीं’नी रंगलेली ही पुस्तकं मुलांना नक्की आवडतील अशी आहेत. समीप शेवडे यांची चित्रं आणि पुस्तकाची मांडणीसुद्धा छान आहे.

‘माझी सुट्टी- गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि ओडिशा’- गार्गी सहस्रबुद्धे,

ज्योत्स्ना प्रकाशन, मूल्य- १५० रु. प्रत्येकी. 

मोरांचे अनोखे गाव

‘इथे इथे बस रे मोरा’पासून ते ‘नाच रे मोरा’पर्यंत लहानपणापासून ओळखीचा झालेला मोर सगळ्या मुलांचा लाडका. मग ते मूल शहरातलं असो किंवा गावाकडचं. वहीत मोरपीस ठेवणं हा तर एक अलवार अनुभव. मोरांच्या एका अनोख्या गावाची गोष्ट सांगितली आहे ‘मोर डुंगरी’ या पुस्तकात. मोरांचं माणसांशी मिसळून जाणं आणि जंगलाचं माणसाच्या आयुष्यातून वजा होणं व त्याचा अवघ्या भवतालावर होणारा परिणाम मोजक्या शब्दांत आणि सुरेख चित्रांतून यात व्यक्त केलेला आहे. या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे यातली अत्यंत देखणी चित्रं. उत्तम कागद आणि उठावदार रंगसंगतीच्या माध्यमातून हे पुस्तक अगदी खुलून आलं आहे. लेखन आणि चित्रं या दोन्ही माध्यमांतून पुस्तक जिवंत करणाऱ्या सुनीता यांच्याविषयी आणि कलेची परंपरा जपणाऱ्या त्यांच्या गावाविषयी अधिक माहिती द्यायला हवी होती असं वाटतं. पुस्तकातली माहिती फार त्रोटक आहे. अर्थात इंटरनेटच्या जमान्यात ती सहज मिळू शकेल, पण गावाकडच्या मुलांना कदाचित त्यासाठी शाळेची वाट पाहायला लागेल. त्यामुळे ती जर दिली असती तर बरं झालं असतं असं राहून राहून वाटतं.

‘मोर डुंगरी’-  सुनीता,

अनुवाद- रमी हर्डीकर- सखदेव,

ज्योत्स्ना प्रकाशन, मूल्य- १०० रुपये

कमाल-धमाल गोष्टी

मुलांना चमत्कारांच्या गोष्टी विशेष आवडतात. त्यामुळे आज इंटरनेट वगैरेंच्या जगातही जादूच्या प्रयोगांना बच्चे कंपनीची गर्दी असते. तर अशाच गमतीजमतीच्या आणि माफक प्रमाणात जादूच्या गोष्टी या ‘कमाल धमाल गोष्टी’च्या संचात वाचायला मिळतील. मैत्री सगळ्यांशीच असायला हवी हे खरं, पण नव्याने मैत्री करणं काही सोपं नसतं. कधी कधी त्यात थोडीशी असूयाही जाणवते. याचीच एक छान सकारात्मक गोष्ट सांगितली आहे ‘चमत्कारिक केक’ या कथेत. तर माणूस आणि प्राणी-पक्ष्यांनी एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वांची अदलाबदल केली तर काय गंमत होईल याविषयी ‘अदला-बदली’ या कथेत वाचायला मिळतं. 

या संचातलं दुसरं पुस्तक म्हणजे ‘जग्गू-बग्गू आणि दोन गोष्टी’! यातली पहिलीच कथा फार मजेशीर आहे. तिचं नाव आहे ‘छापा-काटा’! आपण नेहमी माणसं आणि प्राण्यांच्या मैत्रीच्या किंवा भांडणाच्या गोष्टी ऐकतो. त्यातल्या माणसाचीच बाजू आपल्याला माहिती असते. पण प्राण्यांना काय वाटतं, ते कधीच कळत नाही. या गोष्टीत नेमकं तेच सांगितलं आहे.. तेही अगदी वेगळ्या पद्धतीने. दुसऱ्या गोष्टीत कुत्र्याच्या पिल्लाची काळजी घेणारी सारण्या आणि तिच्या राणीपदाची कथा सांगितली आहे. तर शीर्षककथा असलेली जग्गू-बग्गूची गोष्ट जंगलातल्या पक्ष्यांच्या मैत्रीची आणि हेवेदाव्यांची आहे.

तिसरं पुस्तक आहे ‘पिंकू आणि चिंकी आणि दोन गोष्टी’! पिंकू आणि चिंकी उंदीर, त्यांचं अडचणीत सापडणं आणि मग त्यातून बाहेर पडणं याची ही छानशी गोष्ट आहे. सोनिया आणि तानिया या दोन अभिनेत्रींची गोष्टसुद्धा वेगळी आहे. बऱ्याचदा लहान मुलांच्या गोष्टींत गोड गोड भावना येतात. आणि एखादा व्हिलन असतो तोही फार क्यूटपणे व्हिलनगिरी वगैरे करत असतो. नाही तर थेट राक्षस. पण या दोन्हीच्या मध्ये अनेक भावभावना असतात. त्यातलीच साधारण हल्लीच्या ५वी ते ८ वीच्या आसपासच्या मुलांमध्ये दिसणारी भावना म्हणजे थोडीशी असूया. अमुक मित्राचं ते चांगलं आहे, माझं का नाही, किंवा आम्ही दोघी छान दिसतो, गातो किंवा अभ्यासात छान आहोत, पण तिला एक गुण कसा जास्त मिळाला, अशी तुलना करणं. तर या सगळ्याची थोडीशी ओळख सोनिया आणि तानियामधली मैत्री आणि भांडणाची गोष्ट सांगणाऱ्या या कथेतून होते. तिसरी कथा आहे ‘चित्राची चित्रकला’! वर्गात सगळे सारखेच असले तरी एखादं मूल वेगळं असतं. त्याचे विचार वेगळे असतात. पण म्हणून ते मूल चुकीचं ठरत नाही. हीच बाब ‘चित्राची चित्रकला’ या गोष्टीतून समजून येते.

कमाल- धमाल गोष्टी १, २ आणि ३’- गीतांजली भोसले, रोहन प्रकाशन, मूल्य- प्रत्येकी ७० रुपये.

Story img Loader