माय स्पेस
रमा माळी balmaifal.lok@gmail.com
माझ्या घरात आम्ही पाच जण राहतो. तीन माणसं- आई, बाबा, मी आणि दोन पक्षी. या दोन पक्ष्यांचं नाव आहे चिकू आणि पिकू. मला माहीत आहे- फनी नावं आहेत, पण तेसुद्धा तसेच फनी आहेत. चिकू-पिकूला आम्ही दोन वर्षांपूर्वी घरी आणलं. मी सुरुवातीला त्यांना खूप घाबरायचे. ते हातावर बसले की मी किंचाळायचे. पण थोडय़ाच दिवसांत माझी त्यांच्याशी गट्टी जमली. आता ते माझ्या खांद्यावरही बसतात. कधीतरी डोक्यावर बसून गोलगोल फिरतात. जशी माझी त्यांच्याशी ओळख होत गेली तसं माझ्या लक्षात आलं की, ते फक्त धान्यच नाही तर वेगवेगळ्या गोष्टीही खातात. जसं की, त्यांना पारले-जी खूप आवडतं. माझ्या आजीने बनवलेले शंकरपाळेही आवडतात. शंकरपाळे दिले कीतुरूतुरू येतात आणि फस्त करतात. हे पक्षी कॉकीटीएक्स प्रकारचे आहेत.
माझ्या चिकू-पिकूला खेळायला खूप आवडतं. छोटय़ा खेळण्यांशी ते मस्त खेळतात. ती खेळणी चोचीत पकडून इकडे-तिकडे नेतात. एकमेकांच्या चोचीतली खेळणी पळवतात. ते बघताना खूप गंमत वाटते.
तुम्हाला माहित्ये का, त्यांना त्यांचं नावही उच्चरता येतं. वेगवेगळ्या आवाजामध्ये ते आम्हाला हाका मारतात. एकमेकांशी बोलतात. सुरुवातीला त्यांच्या आवाजाचे अर्थ समजायचे नाहीत, पण आता कुठला आवाज म्हणजे त्यांना काय म्हणायचंय हे कळू लागलं आहे. वेगवेगळ्या गमतीशीर आवाजात ते गातातही. ते ऐकल्यावर मला खूप छान वाटतं. त्यांना त्यांच्या पक्षीघरातून बाहेर काढलं की ते घरभर उडतात. त्यांच्या ठरावीक आवडत्या जागांवर जाऊन बसतात. गातात. मग दुपारी-रात्री पक्षीघरावर पांघरूण घातलं की त्यांना ऊब मिळते आणि ते झोपतात. त्यांना झोपायलाही खूप आवडतं. कितीतरी वेळा ते माझ्या मांडीवरच झोपतात.
त्यांना एकटं ठेवलेलं आवडत नाही. समजा, आम्ही त्यांना हॉलमध्ये एकटं सोडून दुसऱ्या खोलीत गेलो की त्यांना आवडत नाही. त्यांना सगळ्यांमध्ये राहायला आवडतं. अशा वेळी मग ते आम्हाला शोधत दुसऱ्या खोल्यांमध्ये येतात. जर आम्ही थोडय़ा वेळासाठी कुठे बाहेर गेलो आणि त्यांना सांगितलं की ‘आहात तिथेच बसा’ तर ते आम्ही परत येईपर्यंत तिथेच बसून राहतात. आम्ही जेव्हा पुण्याबाहेर जातो तेव्हा त्यांना पक्ष्यांच्या डे-केअरमध्ये ठेवतो. आम्ही घरी आल्यावर ते खूप खूश होतात. त्यांना आनंद होतो. मग ते त्यांच्या आवडत्या जागांवर जाऊन बसतात. घरभर एकदा फिरून येतात. त्यांना पाणी खूप आवडतं. पण त्यांच्या अंगावर आपण जर पाणी शिंपडलं तर ते त्यांच्या पंखांखाली लपतात. अशा वेळी त्यांना पाणी आवडत नाही. चिकू-पिकू स्वच्छ पक्षी आहेत. ते चोचीने स्वत:च्या शरीराची साफसफाई करतात. ते एकमेकांशी खूप भांडतात, तरीही ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्यांना आम्ही घरी आणल्यानंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की, ते सारखे त्यांच्या डोक्यावरचे तुरे वरखाली करतात. ते असं का करतात, हा प्रश्न मला पडला. मग मी इंटरनेटवर सर्च केलं. मला कळलं की, डोक्यावरचा तुरा सर्वात खाली म्हणजे ते चिडलेले असतात. सर्वात वर म्हणजे घाबरलेले किंवा एक्साइटेड असतात. आणि मध्यम म्हणजे खूश असतात. चिकू-पिकू नेहमीच खूश असतात. आणि हो, त्यांना बोट दाखवलेलं मात्र अजिबात आवडत नाही हं. त्यांच्या समोर बोट दाखवलं की ते चिडतात आणि चोच मारतात. चिकू-पिकू नेहमी माझ्या सोबतीला असतात.
इ. ६वी, अभिनव विद्यालय,
इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, पुणे