जगात सुमारे २०४ जातीची घुबडे सापडतात. यापकी सुमारे ३८ जाती भारतात सापडतात. जगातील सर्वात मोठे घुबड हे ‘ब्लाकिश्तोन मत्स्य’ घुबड आहे. तर सर्वात लहान ‘एल्फ’ घुबड आहे. ‘गव्हाणी’ घुबड हे जगातील सर्वात सामान्य घुबड आहे आणि हे जगात सर्वत्र सापडते. सहाराचा अति शुष्क प्रदेश, दक्षिण गोलार्धातील अति दूर बेटे आणि अंटाíक्टक सोडून घुबडांचे वास्तव्य जगातील सर्व उपखंडात आहे.
घुबड म्हटले की अनेकांच्या मनात भीती उभी राहते. याचे कारण त्याच्याशी निगडित असणाऱ्या अंधश्रद्धा. हा पक्षी निशाचर असल्यामुळे आणि माणसाच्या चेहऱ्याशी याचे साधम्र्य असल्यामुळे याच्या भोवती गूढ वलय निर्माण झाले आहे. भारताच्या बऱ्याचशा भागात घुबडास अशुभ मानतात. पण पूर्वेतर भारतात आणि खास करून पश्चिम बंगालमध्ये यास लक्ष्मीचे वाहन समजतात. हे कीटक आणि उंदीर खाऊन मानवाची सेवा करतात, हे यामागचे कारण आहे.
वनिपगळा हे भारतातील एक दुर्मीळ घुबड आहे. हे प्रदेशनिष्ठ (Endemic) असून हे जगात फक्तमध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगांमधील पानगळीच्या विरळ जंगलात सापडते. १८७२ साली पक्षीशास्त्रज्ञ ए. ओ. ह्य़ूम यांनी या िपगळ्याचे नामकरण शास्त्रज्ञ एफ. आर. ब्लेविट यांच्या सन्मानार्थ हेटेरोग्लौक्स ब्लेविटी (Heteroglaux blewitti) असे केले. १८७२ ते १८८४ या कालखंडात याचे ७ नमुने गोळा करण्यात आले. या नंतर घुबडांची ही जात नामशेष समजली जायची. कारण १८८४ नंतर या प्रकारची घुबडं कोणाच्याही पाहण्यात आली नाहीत. तब्बल ११३ वर्षांनी (१९९७ साली) हा पक्षी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्य़ातील तोरणमाळच्या जंगलात आढळला. यामागचे प्रमुख कारण कदाचित याचे सामान्य पिंगळ्याशी असणारे साधम्र्य, तसेच दिनचर स्वभाव (शेकडा ९०% घुबडाच्या जाती निशाचर असतात) असावा.
हा पिंगळा आपलं घरटं झाडाच्या ढोलीत करतो आणि वर्षांनुवष्रे तीच ढोली पुन: पुन्हा वापरतो. आताच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, या ढोल्या एका जोडीने सुमारे दोन दशकं वापरलेल्या आहेत. नर आणि मादी पिंगळा एकमेकांशी फार इमानदार असतात. विणीच्या हंगामात मादी जेव्हा अंडी उबवते तेव्हा नर मादीला अन्न पुरवण्याचे काम करतो. पिल्ले झाल्यावर दोघे मिळून पिल्लांना सांभाळतात. हा िपगळा सुमारे २० जातीचे प्राणी खातो. त्यात ९ जातींचे उंदीर, ३ जातींच्या चिचुंद्रय़ा, ३ प्रकारचे सरपटणारे प्राणी, ३ प्रकारचे पक्षी आणि सागाच्या सालीतील टोळ यांचा समावेश आहे.  
हा पिंगळा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जंगलाला लागणारे वणवे, अतिक्रमण, अवैध जंगलतोड यामुळे याचं नष्ट होणारं अधिवास हेच आहे. पण या पिंगळ्याचे महत्त्व नर्मदेच्या खोऱ्यात राहणाऱ्या माणसांसाठी अनन्यसाधारण आहे. याचा खास संबंध आहे सागाच्या झाडांशी. सागाच्या साली खाणारे टोळ हा याच्या अन्नातील प्रमुख घटक आहे. त्यामुळे सागाच्या जंगलांची निगा राखण्यात याचा प्रमुख वाटा आहे. सागाची जंगले अबाधित राहिली तर नर्मदा नदीच्या खोऱ्यातील पाण्याचा साठा सुरक्षित राहील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही जंगले कार्बनची मोठी कोठारे आहेत; हवामान बदलासारख्या मोठय़ा आपत्तीला रोखण्यासाठी या जंगलांचे महत्त्व मोठे आहे. शास्त्रज्ञ असे सांगतात, की जर हवामान बदलाची आपत्ती भारतावर आली, तर नर्मदेच्या खोऱ्यातील शेती भारताला अन्न पुरवू शकते. म्हणूनच वन पिंगळा भारतीयांच्या अस्तित्वासाठी अतिशय महत्त्वाचा पक्षी आहे. त्याच्या अस्तित्वावर आपले भविष्य अवलंबून असल्यामुळे त्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा