आपल्या वैविध्यपूर्ण परंपरेने नटलेल्या सांस्कृतिक अशा भारत देशात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यत, गावात, खेडय़ात, वाडीत आणि घरातसुद्धा चित्रकला फुलवली जाते. कधी परकीय आक्रमणामुळे, तर कधी राजेमहाराजांकडून धार्मिक रीतीरिवाजामुळे चित्रकला या मातीत रुजली व बहरली. या सर्व काळातील सर्व प्रकारांतील चित्रांत जंगल, प्राणी, पक्षीजीवन नांदत आहे. जसं इसापनीती ते रुडयार्ड किपलिंग यांच्या कथेत असतात तस्संच! अशा विविध चित्रप्रकारांमधून दिसणारे प्राणी व पक्ष्यांविषयी मुलांना माहिती  देणारं सदर..

मागच्याच्या मागच्या रविवारी आपण मधुबनी चित्रातील जलचर पाहिले. साधारण मागच्याच्या मागच्या काळापासून सुरू झालेली आणि आजही चालू असलेले प्राणीजगत पाहू. त्या राज्याच्या बाजूच्या दोन राज्यांतील एका समान चित्रात आपल्याला विविध पाळीव प्राणी आणि पक्षी दिसतात. ते राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र आणि आपल्या डोक्यावरचे गुजरात! या दोन्ही राज्यांतील समान कला प्रकाराचे नाव आत्तापर्यंत तुम्ही ओळखले असेलच! बरोब्बर.. वारली!

आपल्या ठाणे या मोठय़ा जिल्ह्यतील सध्या नव्याने तयार झालेल्या पालघर जिल्ह्यतील जव्हारच्या आसपास आणि गुजरातेतील वलसाड भागातील खेडय़ांतील स्थानिक आजही वारली चित्रांची परंपरा टिकवून आहेत. इथेही मधुबनीप्रमाणे घराच्या भिंतीवर चित्रे काढली जातात. आणि आता व्यवसाय म्हणून कशावरही चित्रे काढली जातात.

कुडाबांबूच्या झोपडय़ांना अगोदरच शेणाने लिपले जाते. त्या मस्त हिरव्या-चॉकलेटी भिंतीला पाहून कोणालाही चित्र काढण्याचा मोह होईलच! या भिंतीवर तांदळाच्या पेस्टने आणि बांबूच्या बारीक काडीने चित्रे काढली जातात आणि निसर्गात राहणाऱ्या माणसांनी चित्रे काढल्यामुळे प्राणी-पक्षी खूप असणार हे आलेच. परंतु शेती शिकलेल्या माणसांची ही संस्कृती असल्याने त्या चित्रात गोल डोक्याची, काडय़ासारख्या हातापायांची अन् त्रिकोणी धडाबुडाची माणसे दिसतील. आणि या भोवती झाडे-झुडपे, छोटे मोठे पक्षी, पाळीव प्राणी तर कधीमधी वाघ वगैरे दिसतो.

मधुबनी किंवा गुहा चित्रांसारखे प्राण्याचे मोठ्ठे चित्र असा काही प्रकार या लोकांनी काढला नसला तरीही भौमितिक आकारासारखे किमान आकार प्राणी-पक्षी कसे काढतात, हे आपल्याला शिकण्यासारखे आहे.

या चित्रातील मोर पाहा. खरा पिसारा रंगीत असला तरी या चित्रात मात्र अजिबात रंग नाहीत. पण असे वाटते की यांनी पिसाचा एकुणेक केस चितारला आहे. त्याच्या डोक्यावरील तुराही वेगळा. कधी पक्ष्यांना डोळे असतात तर कधी नसतात, पण त्यांच्या रेखाटनाच्या वेगळ्या बारीक पद्धतीमुळे अमुक हा मोरच आहे, असे जगाच्या पाठीवरील कोणीही ओळखू शकते.

वारली या आदिवासी जमातीला जगासमोर आणले ते चित्रकार भास्कर कुलकर्णी यांनी. जिव्या सोम्या मशे हा वारली चित्रकार खूप चांगली चित्रे जन्माला घालतो म्हणून जगभर प्रसिद्ध झाला. नेटवर या दोघा चित्रकारांची माहिती मिळेल. आणि आपल्यासाठी आजचे फनवर्क-त्रिकोण, चौकोन, अर्ध किंवा पूर्णवर्तुळ, रेषा यांच्या साहाय्याने एक पक्षी काळ्या पेनाने चितारायचा. त्यात रंग भरायचे नाहीत. गरुड, मोर, पेंग्विन, घुबड, जटायू असे काहीही न काढता पार्टी ए जन्नत, तंदुरे खास मलिकाए स्वाद-रविवार स्पेशल- ‘कोंबडी’चे चित्र काढायचे आहे; पण वरील आकार वापरूनच!

आणि मला त्याचा फोटो खालील ई-मेलवर बुधवार पर्यंत पाठवायचा आहे.

तुमच्या चिकन टिक्का तंदुरीची वाट बघतोय!

श्रीनिवास आगवणे Shreeniwas@chitrapatang.in

Story img Loader