फारूक एस. काझी
‘‘आबा, आता सुट्टीच्या दिशी मी तुझ्यासंगं येणार शेरडामागं.’’ गोदा लाडात येऊन बोलली. आबा म्हणजे गोदाचा आजोबा. आबा खूप छान छान गोष्टी सांगायचा. पावसाच्या, आकाशाच्या, मातीच्या. कुठून शोधून आणायचा कुणास ठाऊक. गोदाला गोष्ट ऐकायला आवडायचं. म्हणून ती चिमट लावून आबासोबत शेरडामागे जायची.
आबानं होकारार्थी मान हलवली. आबा कमी बोलायचा. आपलं काम बरं आणि आपण बरं. गोदावर मात्र त्याचा लय जीव. गोदावरी. त्यानंच तर ठेवलं तिचं नाव. गोदाच्या जन्माआधी तो नाशिकला गेलेला. गोदामायच्या पात्रात आंघोळ करून आलेला. गोदावरीचं पात्र बघून हरकलेला. मग नात झाली. तिचं नाव ठेवलं गोदावरी. शेरडामागं गेल्यावर येताना कधी बोरं, कधी पेरू, आंबा, चिंचा, कवठ, तर कधी कैऱ्या. मधाचं पोळं तर ठरलेलं. गोदासाठी आबा सगळं घेऊन यायचा.
‘‘ममे, आबाचा बड्डे कधी येतो गं?’’ गोदानं वहीत काही तरी लिहीत लिहीत विचारलं. गोदाची आई विचारात पडली. ‘‘कुणान ठाव.. मलाबी नाय ठाव. जुन्या मानसांचा बड्डे नसतो गं. बड्डे तुमा पोराटोरांचा,’’ असं म्हणून आई गालातल्या गालात हसली. गोदा हसली नाही. विचारात पडली. का बरं आबाचा बड्डे नसेल? आपण करू या का त्याचा बड्डे?
‘‘ममे, आपण करूया आबाचा बड्डे.’’ ‘‘येडी का खुळी? असं कुटं असतंय का?’’ आई लाजत लाजत बोलली.
‘‘ममे, आगं, आपल्या आबासाठी एवढं करू या की.’’
‘‘बग बया तूच.’’ आई असं म्हणताच गोदा विचारात पडली.
‘‘ममे, आबाची जन्मतारीख किती हाय गं?’’
‘‘मला नाय ठाव; पण तुझं पपा म्हणत हुतं आबा आता सत्तर वर्साचा हुणार, येत्या दिवाळीला.’’
गोदा पुन्हा विचारात पडली. बड्डे करायचा तर तारीख पाहिजे. नाही मिळाली तर कोणता दिवस धरायचा. दिवसभर डोक्यात तेच विचार घोळत होते. उद्या शाळेत सरांना विचारू या असं ठरवून ती झोपी गेली; पण डोक्यातून आबाचा बड्डे काही केल्या जाईना. सकाळी शाळेत पोचताच गोदानं सरांना गाठलं.
‘‘सर.. सर..’’
‘‘काय झालं गोदावरी? एवढी कसली गडबड?’’ सरांनी तिच्या गडबडीवर हसत विचारलं.
‘‘सर, जुन्या माणसांची जन्मतारीख कशी काय शोधायची वं?’’
‘‘हम्म.. ते जर शाळेत आले असतील तर शाळेत मिळेल; पण जर समजा, शाळेत आले नसतील तर आधार कार्डवर असते की जन्मतारीख. घरी बघ बरं.’’ सरांच्या बोलण्यानं गोदाचा उत्साह आणखीनच वाढला. तिनं घरी जाताच आबाचं आधार कार्ड शोधायला सुरुवात केली. कपाटातलं सगळं सामान विस्कटून झाल्यावर तिला एकदाचं आबाचं आधारकार्ड सापडलं. आणि हे काय? त्यावर तारीख कुठंय? फक्त वर्षच- १९५०. आता तारीख कुठून आणायची? गोदा विचारात पडली.
काय करावं? काय करावं? असाच विचार दिवसभर जागेपणी आणि झोपेतही सुरूच होता. सकाळी शाळेत गेल्यावर सरांना विचारू या असा विचार करून ती शांत झोपी गेली.
‘‘सर, आमचा आबा शाळेत आलेला. १९५० साली जलमला. त्याची जन्मतारीख बघून सांगा की.’’ शाळेत पाय ठेवल्या ठेवल्या गोदा सरांकडे धावली. सरांनी हसून तिच्याकडं पाहिलं.
‘‘गोदावरी, मला एक गोष्ट समजली नाही. तुला अचानक कशी काय आबांच्या बड्डेची आठवण झाली?’’
‘‘सर, आबा आमच्यासाठी लय राबतो बगा. समद्यांची काळजी करतो. आजवर म्या लहान हुते. कायबी कळत नव्हतं; पण आता कळतंय. बड्डे केला की सगळय़ांना आनंद हुतो. आबा तर लय गॉड हाय माजा. लय खूश हुईल बगा.’’ अवघ्या दहा वर्षांची गोदा, पण किती जाणतेपणानं बोलत होती. सरांना तिचं भारी कौतुक वाटलं. आबाच्या आनंदासाठी एक लहान जीव धडपडत होता. त्यांनी तिला जन्मतारीख शोधून, एका कागदावर लिहून दिली. गोदा वाऱ्यावरच तरंगत घराकडे गेली.
‘‘ममे, आबाची तारीक घावली. आता आपुन आबाचा बड्डे करायचा. आबाला बाजरीची भाकर आन् मिठातलं मटान लय आवडतं. ममे, तू करशील का त्यादिशी?’’ गोदाच्या डोळय़ात वेगळीच चमक दिसत होती. ‘‘व्हय. बा वनी हाय आबा मला. करीन की खुशीनं. पपाला केक आणायला सांगू. धूमधडाक्यात करू बड्डे.’’
‘‘पन, यातलं आबाला कायबी सांगायचं न्हाय. आपलं शिक्रेट. प्रामीस कर.’’
आई हसली. महिनाभर अवकाश होता बड्डेला; पण गोदाचा उत्साह काही कमी होत नव्हता. आबासाठी नवीन कपडे शिवले. नवीन चप्पल.
‘‘गोदे, आबाला काय देणार गं बड्डेला?’’ आईनं विचारताच गोदा हसली.
‘‘आताच नाय सांगनार. बड्डे दिशीच डायरेक्ट.’’
बघता बघता बड्डेचा दिवस आला. सकाळी आईनं आबाला पाटावर बसवून टिळा लावला, ओवाळलं. ‘‘हॅपी बड्डे आबा!’’ असं म्हणून गोदा गळय़ातच पडली. आबाच्या डोळय़ात टचकन् पाणीच आलं.
हात थरथरला. सगळे आबाच्या पाया पडले. आबा अजूनही शांतच होता. डोळय़ात पाणी तसंच होतं.
‘‘आबा, आज शेरडं राहू द्या. आज घरीच बस.’’ पप्पा बोलले. ‘‘न्हाय रं बाबा. शेरडांशी आन् रानाशी जल्माची गाठ हाय. अशी चुकवून न्हाय चालायची. म्या जातो. गोदा, चल बाये. जावया आपून.’’ दोघंही रानाच्या दिशेनं निघून गेले.
‘‘आबा, म्या तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय.’’
‘‘आगं, कशाला ही सोंगं काडली? म्या म्हातार मानुस. अर्दी लाकडं मसनात गेली.’’
‘‘आबा, पुन्यांदी आसलं बोलायचं न्हाय. तू किती करतूस आमच्यासाटी. आमी केलं तर सोंगं व्हय?’’ गोदा खोटं खोटं रागावली.
‘‘आगं, तसं नव्हं. पन आता म्हातारपनी कशाला ह्ये, म्हनून बोललो. आता राग सोड.’’
गोदा हसली. ‘‘ह्ये बग, तुजं गिफ्ट!’’ गोदानं पिशवीतून बॉक्स काढून आबाच्या हातात दिलं. आबानं उघडून बघितलं. पाण्याची बाटली. रंगीत. आबाच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
‘‘ग्वॉड हाय ना?’’ गोदानं हसत डोळे मिचकावत विचारलं.
‘‘व्हय, व्हय..’’
‘‘आता रोज ह्यतच पानी आनायचं आनी प्यायचं. कळलं ना?’’ गोदानं आबाला जणू दमच भरला. आबा हसला. ‘‘व्हय गं बाये. तू दिलंय मंजी मी वापरनारच की.’’ असं म्हणत आबानं गोदाच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला.
गोदा आबाच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी झाली. ‘‘माजं उरल्यालं आयुक्क्ष हिलाच दे रं देवा. लय गुनाची हाय माझी बाय!’’ आबाच्या डोळय़ात पाणी भरू लागलं होतं आणि गोदा रात्रीच्या बड्डे पार्टीचं स्वप्न पाहत गाढ झोपी गेलेली.farukskazi82@gmail.com