फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. वैशाली नावाचे राज्य होते. त्या राज्यात वीरभद्र नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला तीन मुलगे होते. राज्यातील प्रजा सुखी व समाधानी होती. कारण राजा स्वत: प्रजेकडे लक्ष देत असे. प्रजेतील कोणीही दु:खी असू नये यासाठी तो प्रयत्न करीत असे. ‘प्रजा सुखी तर राजा सुखी,’ असे राजा नेहमी म्हणत असे. प्रजेतील लोक राजाला देवाप्रमाणे मानत.
एकदा राजा वीरभद्र खूप आजारी पडला. प्रजेला हे समजताच लोक राजवाडय़ाकडे धाव घेऊ लागले. राजाची विचारपूस करू लागले. राजाला लवकर बरे वाटावे म्हणून देवाजवळ प्रार्थना करू लागले.
प्रधानाने राजवैद्याला बोलावले. राजवैद्याने राजाला तपासले असता राजाला गंभीर आजाराने ग्रासले आहे, हे त्याच्या लक्षात आले. राजवैद्याने प्रधानाला बोलावून  राजाच्या आजाराबद्दल सांगितले. प्रधानजी खूप दु:खी झाले. त्यांचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. हे पाहताच राजाच्या तीनही मुलांनी प्रधानजींना ‘काय झाले?’ असे विचारले. प्रधानाने तीनही मुलांना राजाच्या आजाराविषयी सांगितले. तेही खूप दु:खी झाले. त्यांनी राजवैद्याला विचारले,‘‘राजाचा हा आजार बरा होण्यासाठी काय उपाय करावे लागतील?’’
राजवैद्याने सांगितले,  ‘‘यावर एकच उपाय आहे. साता समुद्रापलीकडे एक बेट आहे. तेथे एक अमृतकुंड आहे. ते अमृत जर राजाला दिले, तर तो पूर्वीसारखा बरा होईल.’’
राजाचे तीनही पुत्र अमृतकुंडाकडे जाण्यास सज्ज झाले. तेव्हा मोठा राजपुत्र प्रताप म्हणाला, ‘‘मी एकटाच जाऊन अमृत घेऊन येईन, तुम्ही येथेच राहा.’’ दोन्ही राजपुत्रांनी मोठय़ा भावाचे म्हणणे ऐकले. राजपुत्र प्रताप अमृतकुंडाकडे जाण्यास निघाला. प्रधानाने त्याची जाण्याची सर्व तयारी केली. घोडय़ावर प्रवास करीत तो एका अरण्यात पोहोचला. चहुकडे झाडे. जवळच एक मोठी नदी वाहत होती. राजपुत्र खाली उतरला. त्याने एका मोठय़ा वृक्षाला घोडा बांधला आणि नदीवर जाऊन हात-पाय धुतले व न्याहारी करण्यासाठी झाडाखाली बसला. सोबत आणलेली शिदोरी उघडली व घास खाणार इतक्यात एक बुटका मनुष्य तेथे आला. त्याने राजपुत्राला विचारले,‘‘तू कोण आहेस? कोठून आलास? येथे कशासाठी आला आहेस?’’
त्याचे हे बोलणे ऐकून राजपुत्राला खूप राग आला. तो म्हणाला, ‘‘तुला काय करायचे आहे? तू मला विचारणारा कोण?’’ राजपुत्राचे उद्धट बोलणे ऐकून त्या बुटक्या मनुष्याने आपल्याजवळचे पाणी घेऊन मंत्र म्हणून त्याच्यावर शिंपडले. त्याबरोबर राजपुत्राचे शिळेमध्ये रूपांतर झाले.
इकडे राज्यात सर्व लोक राजपुत्राची वाट पाहत होते. परंतु दिवसांमागून दिवस गेले तरी राजपुत्राचा काही पत्ता नव्हता. म्हणून शेवटी दुसरा राजपुत्र परमवीर त्याच्या शोधात निघाला. तोही प्रवास करीत त्याच अरण्यात आला व त्याच्याबरोबरसुद्धा तशीच घटना घडली व त्यानेही त्या बुटक्या मनुष्यास उद्धटपणे उत्तर दिले. त्या बुटक्या मनुष्याने त्याचेही  शिळेत रूपांतर केले. दोन्ही राजपुत्र राज्यात न परतल्याने प्रधान व राज्यातील लोक चिंतित झाले. तेव्हा तिसरा राजपुत्र धर्मवीर म्हणाला, ‘‘मी जाऊन त्या दोघांना व अमृत घेऊन येतो.’’ पण धर्मवीर लहान असल्याने प्रधानजी त्याला पाठवायला तयार नव्हते; मात्र धर्मवीर राजपुत्राने हट्टच केला.
धर्मवीरही त्या अरण्यात येऊन पोहोचला. त्यालाही तो बुटका मनुष्य भेटला. त्याने त्याची विचारपूस केली. धर्मवीरने प्रथम हात जोडून त्याला नमस्कार केला व नम्रपणे म्हणाला, ‘‘मी वैशाली राज्याचा राजा वीरभद्र यांचा पुत्र धर्मवीर. माझे वडील खूप आजारी आहेत. राजवैद्यांनी मला त्यांच्यासाठी सातासमुद्रापलीकडील बेटावरून अमृत आणण्यासाठी पाठविले आहे. ते अमृत जर माझ्या वडिलांना पाजले तर ते त्या आजारातून पूर्णपणे बरे होतील.’’
त्या लहान राजपुत्राकडे बघून, त्याचे नम्रतापूर्वक बोलणे ऐकून त्या बुटक्या मनुष्यास त्याची दया आली. तो म्हणाला, ‘‘बाळ, त्या ठिकाणी जाणे फार अवघड आहे. तुला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी एक चटई व काठी देतो. त्या चटईवर बसून तुझ्या मनात तुला जे काय करायचे आहे त्याचा उच्चार केलास तर तुझे काम पूर्ण होईल.’’
राजपुत्र त्या चटईवर बसला व मनात अमृतकुंडाजवळ जाण्याची इच्छा प्रगट केली. तो आकाशात उडू लागला व काही वेळातच अमृतकुंड असलेल्या बेटावर येऊन पोहोचला. अत्यंत तेजस्वी अशा त्या बेटावर दाट झाडी होती व मध्यभागी बरोबर कुंड होता. त्याने त्या कुंडातून कलशात अमृत घेतले व परत चटईवर बसून बुटक्या मनुष्याचे आभार मानण्यासाठी अरण्यात आला. थोडय़ाच वेळात बुटका मनुष्य तेथे प्रगट झाला. राजपुत्राने नम्र अभिवादन करून त्यांना प्रवासाचे कथन केले व त्याचे आभार मानले. तरीसुद्धा राजपुत्र दु:खीच होता. बुटक्या माणसाने त्याला दु:खाचे कारण विचारले. तेव्हा राजपुत्र त्याला म्हणाला, ‘माझे दोन भाऊ याच कारणासाठी या दिशेने आले होते. परंतु ते काही राज्यात परतले नाहीत व त्यांना परत घेऊन येण्याचे सर्वाना आश्वासन देऊन मी आलो आहे. अजूनपर्यंत त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही.’’ तेव्हा बुटका मनुष्य म्हणाला, ‘‘ते दोघे तुझे भाऊ फार उद्धट व मग्रूर आहेत, म्हणून मी त्यांचे शिळेत रूपांतर केले.’’ त्याने त्या दोन शिळा त्याला दाखवल्या. तेव्हा धर्मवीराने आपल्या भावांच्यावतीने बुटक्या मनुष्याकडे माफी मागितली व त्यांना माफ करण्याची विनंती केली.
बुटक्या मनुष्यास त्याची दया आली व त्याने त्या शिळांचे पुन्हा राजपुत्रांत रूपांतर केले. त्यानंतर बुटक्या मनुष्याने धर्मवीर राजपुत्राला समजावून सांगितले, ‘‘तुझ्या भावांपासून तूसुद्धा सावधान राहा.’’ आणि ती जादूची चटई व काठी त्यालाच देऊन निघून गेला. त्यानंतर तिघेही राजपुत्र आपल्या राज्याकडे यायला निघाले. बराच प्रवास करून ते खूप थकले होते. ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. तेथे विश्रांतीसाठी पहुडले असता राजपुत्र धर्मवीराला गाढ झोप लागली. धर्मवीराला गाढ झोपलेला पाहून राजपुत्र प्रताप व परमवीर यांनी विचार केला, जर आपण एकत्र राज्यात गेलो तर राजपुत्र धर्मवीर सर्व गोष्ट सांगणार व अमृत आणण्याचे श्रेय सर्व त्याला जाणार. आपल्याला सर्वासमोर शरमेने मान खाली घालावी लागणार. ते  राजपुत्र धर्मवीराला तेथेच सोडून राज्याच्या दिशेने जाण्यास निघाले. थोडय़ा वेळाने धर्मवीरला जाग आली. त्याचे दोघेही भाऊ तिथे नव्हते व अमृत कलशही तेथे नव्हता. त्याने आपल्या भावांचा डाव ओळखला. तो लगेच आपल्याकडील जादूच्या चटईवर बसून त्यांच्या शोधात निघाला. वाटेत त्यांना गाठून त्यांच्याकडून अमृत कलश मिळवला.
राजपुत्र धर्मवीर त्यांना म्हणाला, ‘मी त्या बुटक्या मनुष्याकडे याचना करून तुम्हाला सोडविले व तुम्ही मला धोका देण्यास निघालात.’’ त्याचे बोलणे ऐकून दोन्ही राजपुत्रांना लाज वाटली. त्यांनी धर्मवीरची माफी मागितली की, ‘‘आम्ही यापुढे असे वागणार नाही. तू आम्हाला माफ कर.’’ धर्मवीरने त्यांना मोठय़ा मनाने माफ केले व ते तिघेही राजपुत्र राज्यात यायला निघाले.
तीनही राजपुत्र आणि अमृतकलश पाहून सर्वाना फार आनंद झाला. त्यांनी आणलेले अमृत मग राजाला दिले. राजाचा आजार बरा झाला. मग राजपुत्र प्रतापने झालेला सर्व प्रकार राजास सांगितला व अमृत आणण्याचे सर्व श्रेय राजपुत्र धर्मवीरचे असल्याचे मान्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा