श्रीनिवास बाळकृष्ण

‘‘काय कुत्र्या-मांजरासारखे भांडता रे!’’ असं पोटलीबाबाची आज्जी त्याला नेहमी म्हणायची. कदाचित ती तेव्हा ‘टॉम अँड जेरी’ पाहत नसावी. कारण मांजर कुत्र्याला घाबरते हे लहानपणापासून डोक्यात फिट्ट बसलेल्या पोटलीबाबाला काल एका पुस्तकात आजीनं सांगितलेलं सत्य आढळलं. 

पुस्तकाचं नाव आणि पुस्तक आहे तीन शब्दांचं. त्या तीन शब्दांची लेखिका आहे- प्रिया कुरियन!

‘भौ, म्याव आणि वाह’ हे तीन शब्द लिहून गोष्ट कशी सांगता येते? हे ‘भौ’ आणि ‘म्याव’ एकदाच वापरून कुत्रा/ कुत्री आणि बोका/ मांजर आपापसात काय बोलले हे सांगणं पोटलीबाबाच्या बाबालाही जमणार नाही रे.

 पण सुदैवाने प्रिया कुरियन याच चित्रपुस्तकाची इलस्ट्रेटर असल्याने ही कथा चित्रातून उलगडते.

साधारण ‘घटना’ अशी की.. एक छोटय़ा आकाराचा (टॉय डॉग) पाळीव धसमुसळा कुत्रा खेळता खेळता रंगाचा डबा सांडतो. तो खोडकर असल्याने डाराडूर झोपलेल्या मांजर/ बोक्याला उचकवतो. तोही चिडतो. मग एकमेकांची तुफान ओढाओढी, झोंबाझोंबी होते. त्यात रंगाचे आणखीन डबे वगैरे पडतात.

आता या ठिकाणी रंगाचे डबे का असतात? तर ते दोघे एका हौशी चित्रकर्तीच्या घरी पाळीव असतात. ती बिचारी कोऱ्या कॅनव्हाससमोर उभी राहून ‘काय चित्र काढायचं’ या मोठय़ा चिंतेत असते. नि ही बेभान भांडणारी रंगीत जोडी तिच्या कॅनव्हासवर आदळते.. लोळते!

मऊ मऊ रंगाचा ब्रश भरभर फिरवावा, तसे हे आठ पायांचे दोन केसाळ ब्रश कॅनव्हासवर फिरतात आणि मस्त रंगीत चित्र तयार होतं. चित्रकर्ती हे मॉडर्न आर्ट पाहून खूश होते. कदाचित इतके मोठे ब्रश नसल्याने ती स्वत:हून असं कधीच करू शकणार नव्हती. पण अचानक ते साकार झाल्याने ती आनंदली. काठीचे फटके मिळाले नाहीत म्हणून मांजर आणि कुत्राही खूश झाले!

संपली गोष्ट.

या गोड शेवटात मुलांना घेण्यासाठी काही संस्कार नाही की शिकवण नाही. (पण मोठय़ांना शिकता येऊ शकतं. काही अपघात, घटना या चांगल्यासाठी असतात. फक्त आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, वगैरे.)

तशी ही एक साधी घटना.

कुत्र्या-मांजराची आपसात अशी भांडणं पाहून लहानपणापासून आपलं जाम मनोरंजन झालंय. तसंच इथेही झालं. तुमचंही होईल.

याची चित्रं काढताना प्रियाने केवळ पेन्सिलचा वापर केलाय. त्यात शेिडग वगैरेही नाही. कार्टूनसारखी दिसणारी, वागणारी कॅरॅक्टर्स. ही कुठे आहेत, घर की बंगल्यात, वगैरे काहीही तपशील नाहीत. त्यामुळे आपण मुख्य घटनेकडेच पाहतो. मग रंग येतात. ते वाहतात. त्यात गडबडगुंडा होतो. तोही केवळ पेन्सिल आणि प्लेन रंग लावून (फासून) जमवलाय.

प्रियाला अ‍ॅनिमेशन येत असल्याने हे पुस्तक चलत्चित्र-कथेसारखं वाटू लागलं आहे.  प्राण्यांच्या सहज एकापुढे एक आलेल्या हालचाली पाहून असं वाटतं की, खरंच ते प्राणी हलत आहेत.

चलत्चित्र वाटण्यासाठी आणखी एक गोष्ट उपयोगी ठरते, ती म्हणजे प्रत्येक पानावर असलेले कॅरॅक्टर्स तसेच्या तसे काढणे. तू एक आकार जसाच्या तसा काढून पाहा जरा, मग कळेल. इथं तर कित्ती वेळा आणि तेही वेगवेगळ्या बाजूंनी सेम काढला आहे.

तुझ्या आजूबाजूला अशा चिक्कार घटना घडत असतील. त्यातली सर्वात भारी घटना निवड. त्यात चवीपुरता मसाला घाल. त्या पात्रांना साध्या पेन्सिलने रेखाट. गरज वाटल्यासच रंग दे. नाहीतर सर्व लक्ष रंगाकडे जाईल. मग एक झकास पुस्तक बनव.. आणि मला वाचायला पाठव.                                                       

shriba29@gmail.com

Story img Loader