शर्वरीचं दिवसभराचं शेडय़ुल एकदम भरगच्च आहे. सकाळी योगासनं, स्कॉलरशिपचा क्लास, अभ्यास, नाश्ता-जेवण आवरून शाळेत जायचं. शाळेतून आल्यावर १५ मिनिटांत खाऊ खाऊन तयार होऊन जिम्नॅस्टिकला जायचं ते रात्री नऊला घरी यायचं! सुट्टीच्या दिवशी थोडा अभ्यास, गाण्याचा क्लास, चित्रकलेचा क्लास या सगळ्यात खरं म्हणजे तिला घरात फारसा मोकळा वेळ मिळतच नाही. त्यामुळे ‘कंटाळा आलाय, आता काय करू’ असं तिच्या तोंडून कधी ऐकायलाच मिळत नाही. शर्वरीच्या दादरच्या आजीला- म्हणजे आईच्या आईला मात्र तिचं हे सतत कशात तरी ‘बिझी’ असणं फारसं पटत नाही. मुलांना त्यांचा त्यांच्यासाठी थोडातरी वेळ असायला हवा, थोडंतरी ‘रिलॅक्स’ होता यायला हवं असं तिचं म्हणणं! ते शर्वरीच्या आई-बाबांना पटतंही, पण सध्याच्या जमान्यात या बिझी असण्याला काही पर्याय नाही असं म्हणत ‘मागच्या पानावरून पुढे’ असं सुरूच राहतं. मात्र वेळात वेळ काढून ते शर्वरीला एखाद्या वीकएंडला दादरच्या आजीकडे राहायला पाठवतात. मग सकाळी आरामात उठायचं, आजीशी गप्पाटप्पा करत दूध-ब्रेकफास्ट करायचा, अंघोळ-बिंघोळ सावकाश बारा वाजता करायची अशी सगळी ऐश शर्वरी करून घेते!
या वेळी मात्र दुपारचं जेवण झाल्यावर तिला जरा कंटाळा आला. मग आजीने तिला कपाटाचा एक खण उघडून दिला. त्यात शर्वरीसाठी मोठा खजिनाच होता! गोष्टीची पुस्तकं, रंगीत शंख-शिंपले, रंगीबेरंगी मोती-मणी, सॅटिन रिबन्स, हेअरबँड्स, पत्ते, बाहुल्या, भातुकली, दिवाळीच्या अभ्यासाच्या सजवलेल्या वह्य, ग्रीटिंग कार्डस असं खूप काही त्या खणात होतं! ‘‘हा तुझ्या आईचा खण आहे, शाळेत असतानाचा.’’ आजीने सांगितलं तेव्हा शर्वरीला एकदम भारीच वाटलं! लाल हेअरबँड लावून शाळेत जाणाऱ्या आईचं सगळं विश्वंच त्या खणाच्या रूपाने शर्वरीपुढे उलगडलं गेलं. आजीने खणातून जपून एक प्लॅस्टिकची पिशवी काढली. त्यात एक छोटे छोटे खळगे असलेला प्लॅस्टिकचा बोर्ड होता आणि पत्र्याच्या डब्यात भरून ठेवलेल्या गोटय़ा होत्या. आजीने तो बोर्ड जवळच्याच कॉटवर ठेवला आणि डबा उघडून त्यातल्या गोटय़ा एकेक करून बोर्डवर मांडायला सुरुवात केली. शर्वरी शांतपणे आजीकडे बघत होती. आजीने बोर्डवरचा बरोबर मधला एक खळगा सोडून बाकीच्या सगळ्या खळग्यांमध्ये गोटय़ा मांडल्या. रिकाम्या खळग्याच्या बाजूची एक गोटी सोडून पलीकडची गोटी तिने उचलली आणि रिकाम्या खळग्यात ठेवली. ज्या गोटीच्या डोक्यावरून ती गोटी आली होती, ती गोटी आजीने उचलून बोर्डवरून बाहेर ठेवली. ‘‘अशाच उभ्या किंवा आडव्या रेषेत या गोटय़ा एक गोटी सोडून उचलून ठेवायच्या. शेवटी बोर्डवर एकच गोटी उरली पाहिजे.’’ आजीने खेळ कसा खेळायचा ते सांगितल्यावर शर्वरीने तो बोर्ड मांडीवर घेतला आणि खेळायला जमतंय का ते बघायला लागली. सुरुवातीला पटापट गोटय़ा बोर्डवरून बाहेर जायला लागल्या, पण नंतर जशा कमी गोटय़ा उरल्या तसा खेळ अवघड व्हायला लागला! ते बघून आजी म्हणाली, ‘‘शर्वरी, तुझी आई लहानपणी एक्स्पर्ट होती या खेळात. या खेळाचं नाव ब्रेनव्हिटा. म्हणजे आपल्या भारतात त्याला ब्रेनव्हिटा म्हणतात, पण यू. के. मध्ये मात्र त्याला सॉलिटेअर म्हटलं जातं.’’ शर्वरीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. ती म्हणाली, ‘‘पण आजी, सॉलिटेअर म्हणजे तर पत्ते ना?’’ आजीला हे अपेक्षितच होतं.आजीने सांगितलं, ‘‘यू. के.मध्ये पत्त्यांच्या खेळाला ‘पेशन्स’ म्हणतात आणि ब्रेनव्हिटाला सॉलिटेअर! हा खेळ तसा खूप जुना आहे. त्याचा संदर्भ चौदाव्या लुईच्या काळात सापडतो. १६८७ मध्ये तयार केलेल्या ‘सोबीझ’ (Soubise) च्या राजकन्येच्या प्रतिमेत तिच्या शेजारी सॉलिटेअर दिसतो. आम्ही मात्र आमची राजकन्या चौथीत असताना तिच्यासाठी ब्रेनव्हिटा आणला होता. तेव्हा ती अगदी मनापासून हा खेळ खेळायची. तेव्हाच्या मुलांना आणि आम्हा पालकांनासुद्धा घरात पुष्कळ वेळ असायचा! आता मात्र आमच्या राजकन्येला हा खेळ आठवत तरी असेल की नाही कोण जाणे!’’
आजीच्या डोळ्यांत पाणी तरळल्याचा भास शर्वरीला झाला. आता पुढच्या वेळी आजीकडे येताना आईलाही दोन दिवस राहायला घेऊन यायचं आणि तिचा एके काळचा आवडता ब्रेनव्हिटा तिला पुन्हा खेळायला लावायचा असा मनोमन निश्चय करून शर्वरी आजीला बिलगली..
अंजली कुलकर्णी-शेवडे  anjalicoolkarni@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा