‘मोठेपणी तुम्ही कोण होणार?’ हा सगळ्या मोठय़ांचा नेहमीचा बोअर प्रश्न! आमच्या मराठीच्या बाईंनी विचारलाच तो आम्हाला. मग आमची पोपटपंची सुरू झाली. डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापक, वकील, शिक्षक, शिक्षिका, कंडक्टर, पोलीस, पुढारी.. आम्ही तोंडाला येईल ते सांगत सुटलो.
‘बास! कोणाला लेखक, कवी व्हावंसं नाही वाटत?’ बाईंनी हळुवारपणे विचारलं.
‘लेखक, कवी ते होता येतं? ते मुळातूनच असावं लागतं ना?- आमच्या प्रश्नांच्या गोळ्या सुटलेल्या.’
‘प्रयत्न करून होता येतं’, बाई म्हणाल्या.
‘ए जिंक्या. आपल्या बाई कवी आहेत बरं का!’ मी हळू कुजबुजले, पण बाईंनी ते ऐकलंच.
‘स्त्रीला कवयित्री म्हणायचं बरं का! ..तर कोणाला कविता कराव्याशा वाटतात? म्हणजे कवी व्हायचंय?’.. बाईंनी विचारलं.
‘येस!’ आम्ही दहा जणांनी हात वर केले. ‘चला बाकीच्यांनी उठा. पलीकडल्या चित्रकलेच्या वर्गात जा.’ ‘बाप रे! आम्ही हात वर केलेले अडकलो. बाकीचे सुटले नि आनंदात वर्गाबाहेर पळाले. तिथे रेघोटय़ा ओढत बसणार. आम्हाला वाईट वाटलं, पण जाऊ दे म्हटलं.’
‘तुम्ही लहान बाळं होतात ना तेव्हापासून कविता ऐकताय ना. आठवतात का त्यातल्या काही?’
‘आम्ही बाळं असतानाच्या कविता नाही आठवत. पण बालवाडीतल्या आठवतात.’
‘बरोबर आहे तुमचं. माझ्या लक्षातच आलं नव्हतं.’ आपली चूक कबूल करत बाई म्हणाल्या.
‘असू दे बाई!’ असं म्हणून आम्ही बाईंना माफ केलं मनातल्या मनात!
‘बरं! सांगा बालवाडीतल्या कविता..’
‘ट्विंकल ट्विंकल.. ए. बी. सी. डी.’
‘इंग्रजी नको. मराठी सांगा.’
‘बदका बदका नाच रे’ किंवा ती ‘झुरळाची.’ आणि ती ‘बरं का गं आई..’ आम्ही कविता म्हणूनच दाखवल्या.
‘वा! छान! तर आपण सर्वानी अशा कविता करायच्या. परवा तुम्ही शाडूचे गणपती केलेत तेव्हा तुम्हाला हात, पाय, सोंड असे पार्ट्स मिळत होते ना?’- बाई.
‘तसे कवितेचे पार्ट्स देणार तुम्ही बाई?’
‘मी ‘क्ल्यू’ देणार.’
‘चालेल!’ आम्ही कागद-पेन घेऊन तयारच!
‘कशावर करू या कविता? विषय सांगता? तुम्हाला काय आवडतं? तुम्ही अजून लहान आहात तेव्हा बालगीतंच रचायची!’
‘बाई, मी सांगू विषय?’- जिया म्हणाली. तिने पट्टाच सुरू केला. बाहुली, पाऊस, शाळा, दप्तर, खेळ, आई, बाबा, आजी, मित्र-मैत्रिणी.’ घ्या! विषयच विषय मिळाले.
‘पाऊस या विषयावर करू या बाई कविता.’ चिंकीने हसऱ्या चेहऱ्यानं सांगितलं. ती स्वत:ला हुशार समजते.
ते बालगीत आहेच की, ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा.’- मी चिंकीला पराभूत केलं.
‘ते बालगीत आपण नमुन्यासाठी घेऊ या.’ बाईंनी तिची बाजू राखली.
‘बाई, सुट्टी हा विषय कसाय?’
‘हो! छान आहे विषय. मी पहिली ओळ सांगते. ‘ येगं येगं सुट्टी..’ पुढच्या ओळीसाठी मी ‘क्ल्यू’ देते. सुट्टीसारखेच आणखी शब्द गट्टी, बट्टी, कट्टी, बुट्टी, पट्टी, हत्ती, दोस्ती.’ बाईंनी आमचं काम सोपं केलं. सर्वानी थोडा विचार केला नि सुरू झाल्या सर्वाच्या ओळी-
‘बाई, माझी दुसरी ओळ- ‘येगं येगं सुट्टी, तुझी माझी गट्टी.’’
‘बाई माझीही- येगं येगं सुट्टी, तुझी माझी दोस्ती!’
‘माझी ओळ बाई- अभ्यासाशी कट्टी.’
‘बाई माझी.. ‘शाळेला सुट्टी.’
‘बाई माझ्या दोन ओळी.. ‘अभ्यासाचा हत्ती, त्याला मारा पट्टी.’’
‘वा! तुम्ही सर्वानी छानच रचल्यात ओळी. आता मी पुढच्या दोन ओळींसाठी शब्द म्हणजे ‘क्ल्यू’ देते.
‘बाईंनी दिला अभ्यास.. आम्ही झालो निराश.’
‘अभ्यास निराशे’च्या जोडीचे आणखी शब्द- शाब्बास, झकास, पास-नापास, ध्यास, टॉस, रास.
आता मुलांना हुरूपच आला. त्यांनी पुढच्या ओळी रचल्या-
‘सुट्टीत नको अभ्यास, आम्ही जिंकला टॉस’
‘खूप केला अभ्यास, आई म्हणाली झकास’
‘सुट्टीत नको ना अभ्यास, बाबा म्हणाले शाब्बास!’
‘नको म्हणता अभ्यास, मग व्हाल बरं नापास’
‘सुट्टीनंतर अभ्यास, निश्चित होऊ पास!’
‘अभ्यासाचा घ्या ध्यास, बाई आता बास!’
‘वा! पुढच्या ओळीही तुम्ही रचल्यात की छान! कळलं? कविता कशी होते? आता तुम्ही छोटे आहात म्हणून मी शब्द दिले, कल्पना दिली. मोठं झाल्यावर सगळं आपलं ‘मन’च देतं. भावना, कल्पना, रचना नि भाषेचं ज्ञान! यामुळे कविता सुचते नि तयार होते’ बाईनी सांगितलं. सोनिया कोपऱ्यात एकटीच बसलेली. ती एकदम उठली आणि म्हणाली, ‘बाई मी नवीनच कविता केलीय, वाचू?’
‘वाच की!’
‘झाडावरचं फूल, तिथे गेलं मूल’
‘फूल लागलं डोलायला, मूल लागलं हसायला!’
सोनियाच्या कवितेने सगळ्या मुलांच्या मनात कवितेची रंगीत फुलपाखरं भिरभिरायला लागली. घरी जाताना सर्वाच्याच मनात कवितांच्या ओळी तरळत होत्या.
कवितांची फुलपाखरं
‘मोठेपणी तुम्ही कोण होणार?’ हा सगळ्या मोठय़ांचा नेहमीचा बोअर प्रश्न! आमच्या मराठीच्या बाईंनी विचारलाच तो आम्हाला. मग आमची पोपटपंची सुरू झाली. डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापक, वकील, शिक्षक, शिक्षिका, कंडक्टर, पोलीस, पुढारी.. आम्ही तोंडाला येईल ते सांगत सुटलो.
आणखी वाचा
First published on: 25-11-2012 at 12:46 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Butterfly of songs