श्रीनिवास बाळकृष्णन
अमेरिकन कार्टुनिस्ट ऑटो मेस्मर आणि ऑस्ट्रेलियन निर्माता पॅट सुलीव्हन यांनी साधारण १९१९ साली एका सिनेमातून विनोदी कार्टून पात्र आणलं. ज्याचं नाव होतं ‘फेलिक्स’ (felix). रंगाने काळा आणि गोंडस असा!
त्यांच्या तिसऱ्या चित्रपटात या पात्राला ‘फेलिक्स’ हे नाव दिलं गेलं.
लॅटिन शब्द फेलीस (मांजर) आणि फेलिक्स (आनंदी) यावरून त्याचे नाव सुचले. तर हा आहे एक विनोदी काळा बोका!
मूकपट असल्याने बऱ्याचदा तो शेपटीने भावना व्यक्त करायचा. गंमत म्हणजे, बोका असूनही तुमच्यासारखाच तोही दोन पायांवर उभा राहायचा. काळानुसार फेलिक्सचं व्यक्तिमत्त्व, अवतार व स्वभावदेखील बदलत गेले. आधी मनाने दयाळू व गरजू लोकांना मदतशील असणारा फेलिक्स पुढे मस्तीखोर होतो, तर कधी कधी अगदी निष्पाप बालकासारखा!
फेलिक्स कार्टून फिल्म, कॉमिक स्ट्रीप आणि कॉमिक पुस्तकांतून मोठय़ा-छोटय़ांच्या भेटीला येत गेला.
आपल्याकडे कार्टूनवेडय़ा मुलांचे पालक घर डोक्यावर घेतात, पण तिथं मोठी माणसं या क्यूट फेलिक्सला डोक्यावर घेऊन होते. त्याची छबी घेऊन खेळणी, पोस्टकार्ड, सिरॅमिक्स प्रतिमा, बाहुल्या असे बरेच काही बाजारात आले. १९२३ साली पॉल व्हाइटमन या जॅझ आर्टस्टिने त्यावर गाणे लिहिले. मूक कार्टूनच्या जमान्यात चलती असणाऱ्या फेलिक्सची पुढे ध्वनी (संगीत) सह आलेल्या मिकी माऊसच्या आगमनानंतर क्रेझ कमी झाली. मग फेलिक्सही या शर्यतीत मागे राहू नये म्हणून त्याला आवाज देण्याचे अनेकांनी प्रयोग केले. अनेक वर्षे विविध स्टुडिओंद्वारे फेलिक्स लोकांसमोर येत गेला.
साधारण सत्तर वर्षांनंतरही या खटय़ाळ बोक्यावर एक व्हिडीओ गेम बाजारात आणला गेला. पुढे शेकडय़ाने नवे कार्टून पात्रे आली. पण त्याही गर्दीत हा टिकून राहिला. इतका जुना असूनही २००२ साली जगभरातील घेण्यात आलेल्या एका सव्र्हेत जगभरातील फेमस अशा पहिल्या ५० कार्टूनमध्ये फेलिक्सचा क्रमांक २८ वा होता.
chitrapatang@gmail.com