श्रीनिवास बाळकृष्णन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझी ताई, ताईची मत्रीण, तिची मावशी, मावशीची काकी, काकीची आजी, आजीची सासू, सासूची आई.. या साऱ्या जणी उंदराला घाबरतात, तरी बाप्पाच्या उंदराच्या मूर्तीला हात जोडतात.

तर या साऱ्या जणी म्हणजे सासूची आई, आजीची सासू, काकीची आजी, मावशीची काकी, मत्रिणीची मावशी, ताईची मत्रीण आणि खुद्द ताईलाही आणखी एक ‘मिकी’ नावाचा उंदीर फार म्हणजे फारच आवडतो. इतका, की तिने तिचा मोबाइल कव्हरदेखील मिकी माऊसचा घेतलाय.

तुम्हाला वाटेल, त्यात काय एव्हढं! आमच्याकडे मिकी माऊसची बॅग, बॉटल, टी-शर्ट, खेळणी, कानातले.. असे खूप काही आहे. पण छोटय़ा दोस्तांनो, हेच तर आश्चर्य आहे की, उंदीर साधारणत: दोन वर्ष जगतो, पण हा मिकी तो चांगला ९१ वर्षांचा आहे. म्हणजे सर्व कार्टूनचा सध्या जिवंत असलेला पणजोबाच की! आणि तो तितकाच लोकप्रियही आहे.

तुम्हाला माहिती असेलच, की या अति प्रसिद्ध अशा मिकी माऊसला अमेरिकेचा चित्रकार वॉल्ट डिस्ने याने युबी वेरक्स यांच्या साहाय्याने तयार केला. तिथलं डिस्ने लँडही त्याचेच! तो त्यांचा मॅस्कॉट आहे. तिथं सर्व ठिकाणी कुठल्या तरी डिझाइनमधून भेटत राहणारा कार्टूनसम्राट म्हणजे आपला ‘मिकी माऊस’!

हा उंदीर असला तरी याच्या चेहऱ्यावर केस नाहीत, तो सफेद उंदीर नसला तरी क्युट आहे. डोळे बोलके, हसतमुख चेहरा आपल्या भेटीला सतत येतो. त्याची मस्त ओपन चारचाकी आहे.

हातात ग्लोज, पिवळे बूट, लाल चड्डी नेहमी असतेच आणि घरी कपाट भरेल इतके कपडे आहेत.

तो उंदीर असून ‘प्लूटो’ नावाचा भोळसट कुत्रा पाळतो. आणि ‘गुफी’ नावाचा कपडे घालणारा कुत्रा मित्र आहे. तो उंदीर असला तरी डोनाल्ड नावाचा वेंधळा बदक त्याचा मित्र आहे.

एक गंमत सांगू का! त्याची ‘मिनी’ नावाची उंदरीण मैत्रीणसुद्धा आहे. असा याचा परिवार!

हा मिकी स्वभावाला प्रामाणिक व प्रसंगी उग्र व्हायचा! पण हळूहळू एक चांगला सभ्य गृहस्थ म्हणून त्याची ओळख बनविण्यात आली. मग त्याचं पात्र थोडं संवेदनशील व जिद्द ठेवणारा असेही केलं.

१९२८ मध्ये मिकीचा पहिला लघुचित्रपट होता ‘स्टीमबोट विली’! तो पहिला आवाज/म्युझिकसह लघु अनिमेशनपट होता. त्याचा पहिला आवाज खुद्द डिस्ने यांनीच दिला. त्यानंतर तो जवळपास १३० लघुपटांत होता. १९३० पासून तो कॉमिक स्ट्रीपमध्ये वाचकांच्या भेटीला यायला लागला. तेही सलग तब्बल ४५ वर्ष!

जगातील सर्व देशात पोहचलेला, ओळखला आणि आवडला जाणारा बहुधा हे एकमेव कार्टून पात्र आहे.

अनेक मानसन्मान, अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डस्सारखी मानाची पारितोषिके जिंकणारा असा हा मिकी १९७८ मध्ये हॉलीवूडचा ‘वॉक ऑफ फेम’वर तारा असणारा पहिला कार्टून पात्र ठरला.

chitrapatang@gmail.com