|| मेघश्री दळवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगातलं सर्वात उंच ठिकाण म्हटलं की आपण चटकन म्हणतो एव्हरेस्ट. पण जगातलं सर्वात खोल ठिकाण कोणतं हे सांगता येईल का? हे ठिकाण आहे पॅसिफिक महासागरात १०,९१६ मीटर खोल, म्हणजे एव्हरेस्टच्या ८,८४८ मीटर उंचीलाही मागे टाकील इतकं. आणि ते आहे चॅलेंजर डीप!

एव्हरेस्ट जसा हिमालय पर्वतांच्या रांगांमध्ये तसं हे चॅलेंजर डीप मरिआना ट्रेंच देणाऱ्या रांगांमध्ये. एव्हरेस्टवर आतापर्यंत कित्येकांनी यशस्वी चढाया केल्या आहेत, पण चॅलेंजर डीपमध्ये आजवर फक्त तीन जण पोहोचलेले आहेत. इतक्या खोलवर पाण्याचा दाब प्रचंड असल्याने सहसा पाणबुडे तिथे जात नाहीत. १९६० मध्ये डॉन वॉल्श आणि जॅक पिकार्ड हे महासागरांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आणि त्यानंतर २०१२ मध्ये हॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन तिथवर गेले आहेत.

अवकाशात कुठे एलियन्स सापडतात का, हे आपण शोधत असतो. पण मरिआना ट्रेंचमधले एकेक जीव एलियन्सपेक्षा वरचढ आहेत! पूर्ण अंधार, समुद्रसपाटीवर असतो त्याच्या हजारपट  दाब, गोठवणारं पाणी आणि त्यात तीनशे अंश सेल्शियस आग ओकणारे उष्ण आम्लाचे झोत अशा अजब वातावरणात दोनशेहून अधिक सजीव तिथे आढळतात हे एक आश्चर्यच म्हटलं पाहिजे.

दहा सेंमी आकाराचे महाकाय अमिबा, मोठमोठय़ा समुद्रकाकडय़ा, अगडबंब शिंपले, धारदार दातांचे अ‍ॅंगलर मासे, माणसाएवढे झालरवाले शार्क, माणसाच्या तिप्पट अजस्र गॉबलिन शार्क, दिसेल त्याला गिळून टाकणारे डम्बो ऑक्टोपस, कुऱ्हाडीसारखे दिसणारे हॅचेट मासे हे आहेतच. वर त्यांचे विचित्र डोळे! बॅरलआय माशांचे असतात पिंपासारखे, तर पूर्ण पारदर्शक टेलिस्कोप ऑक्टोपसचे पुढे आलेले दुर्बिणीसारखे. छोटे प्राणीही भयंकर तीव्र आम्ल स्रवणारे झोम्बी किडे आणि लालसर इवलाले बेन्थोकोडोन जेलीफिश. शिवाय इतर हजारो सूक्ष्मजीव. अक्षरश: कल्पनेच्या पलीकडे आहे हे जग! काही अशा चमत्कारिक प्राण्यांना शंभर वर्षांहूनही जास्त आयुष्य असतं, हेदेखील नवलाचं.

खरोखरच अद्भुत दुनिया आहे खोल खोल समुद्रात!

meghashri@gmail.com