फारूक एस. काझी
एका घनदाट जंगलातली ही गोष्ट. जंगल खूप खूप मोठ्ठं होतं. हो, गावाहून, शहराहून मोठ्ठं. त्या जंगलात खूप प्राणी राहत असत. लहान प्राणी. मोठे प्राणी. उंच प्राणी, बुटके प्राणी. आळशी प्राणी. चपळ प्राणी. कुणी काळ्या रंगाचे, तर कुणी हिरव्या. कुणी लाल, तर कुणी निळ्या रंगाचे प्राणी. खूप पक्षीही होते. लहान पक्षी. मोठे पक्षी. उडणारे पक्षी. न उडणारे पक्षी. गाणारे पक्षी. न गाणारे पक्षी..
अशा या जंगलात एक छोटंसं तळं होतं. दाट पिंपळाच्या झाडांनी वेढलेलं. त्यात चिंचेची झाडं होती. वडाचं झाड होतं. लिंब होता आणि गुलमोहरही! अशा या तळ्यात दोन मासे राहायचे. एकाचे नाव अत्तू.. दुसऱ्याचे नाव फत्तू.
दोघेही खूप छोटे होते. केवढे? तळहाताएवढे. पिवळा रंग. त्यावर काळ्या रंगाचे पट्टे. जणू वाघच. दोघे दिसायला खूप सुंदर होते. मागे परांची शेपटी. कल्ल्यांजवळ लांब पर- पंखासारखे. आणि त्यांचं विशेष काय होतं माहितीय? त्यांचं तोंड चोचीसारखं होतं. लालसर रंगाचं. सगळे त्यांना ‘बर्डीफिश’ म्हणायचे. दोघे दिवसभर तळ्यात मस्ती करायचे. तळ्यातला कोपरा न् कोपरा धुंडाळायचे. इतर माशांची खोडी काढायचे. त्या दोघांची अम्मी जाम वैतागायची. ती त्यांना गोष्टी सांगायची. माणसांच्या, गावांच्या, इतर प्राण्यांच्या.. ती सांगायची- सगळ्यांशी चांगलं वागा. एकमेकांना कधीही सोडून जाऊ नका. सतत सोबत राहा. अडचणीत एकमेकांना मदत करा. अत्तू-फत्तू सगळं कल्ले देऊन ऐकत. त्यांच्या गप्पांचा विषय असायचा- ‘‘माणसं कशी असतात बरं?’’
‘‘त्यांचं घर कसं असेल?’’
‘‘डोंगर म्हणजे काय?’’ अशा प्रश्नांनी त्यांची उत्सुकता वाढवली होती.
‘‘अत्तू, आता कंटाळा आलाय या तळ्याचा. आपणही बाहेर जाऊ या का फिरायला?’’ फत्तूने प्रश्न केला.
‘‘अरे, आपल्याला कसं जाता येईल? आपण पाण्याबाहेर नाही जगू शकत. अम्मीने सांगितलेलं विसरला का?’’ अत्तूने शांतपणे उत्तर दिलं. अत्तू कोणत्याही गोष्टीचा विचार करत असे. फत्तूचं समाधान झालं नाही.
‘‘अम्मी, आम्हाला या तळ्याबाहेर जायचं आहे. बाहेरचं जग पहायचं आहे. तू सांगितलेला डोंगर आणि गाव बघायचा आहे.’’
अम्मीला काय उत्तर द्यावं कळेना. तिने तळ्यातल्या ‘विशफिश’ला सगळा प्रकार सांगितला. ‘विशफिश’ म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारा मासा. चमकदार लाल-पिवळ्या रंगाचा. त्याला भुऱ्या रंगाची दाढीही होती.
‘‘हा हा हा.. तुझी मुलं खूप हुशार आहेत. आजवर अशी इच्छा घेऊन कुणीच आलं नाही माझ्याकडे. जा- तुझ्या मुलांना माझ्याकडे पाठवून दे.’’ अत्तू-फत्तूची अम्मी घरी आली. तिने दोघांना विशफिशकडे पाठवून दिलं.
‘‘हे पाहा, तुम्ही दोघंही डोंगर आणि गाव पाहून येऊ शकता.’’ विशफिश असं म्हणताच दोघंही हरखून गेले.
‘‘आता मज्जा येणार!’’ असं ओरडू लागले.
‘‘पण..’’ विशफिशचा गंभीर आवाज आला.
‘‘माझ्या काही अटी आहेत.’’
अटी म्हटल्यावर फत्तूने तोंड कसनुसं केलं. अत्तू मात्र कल्ले देऊन ऐकत होता. ‘‘तुमच्या गळ्यात हे छोटं वाळूचं घडय़ाळ बांधा. वरच्या गोलातली वाळू खालच्या गोलात येण्याआधी तुम्ही परत यायला हवं. नाहीतर तुम्ही तुमच्या मूळ रूपात याल आणि मासा झाल्यावर तुम्ही पाण्याबाहेर नाही जगू शकणार. समजलं?’’
दोघांनी माना हलवल्या. दोघांनी घडय़ाळ गळ्यात बांधलं. विशफिशने आपल्या हातातली काठी गोल फिरवली. आणि ‘छू’ असं म्हणताच अत्तू- फत्तू दोघंही पक्षी बनले.
दोघांच्या कल्ल्यांजवळचे पर आता पंख बनले. शेपटी लांब आणि जाड झाली. चोच अजून थोडी मोठी झाली. पिवळ्या रंगावरचे पट्टे लाल झाले. खूपच सुंदर दिसत होते दोघं. त्यांनी भरारी घेताना सूर्य नुकताच उगवत होता.
प्रसन्न सोनेरी प्रकाश. सगळं जंगल पाखरांच्या आवाजाने भरून गेलेलं. गार वारा पानांशी मस्ती करत होता. दोघे आकाशाला पाहत होते. पाण्यातून आकाश कसं पाणथळ दिसत होतं.
आता तसं नाही. किती विशाल.. किती निळंशार.. त्यांनी वरून जंगल पाहून घेतलं. कसलं भारी दिसत होतं!
हिरवाकंच! हिरवा समुद्रच जणू. त्यांना जंगल पार करता करता दुपार झाली. दोघंही थकले होते. घामाघूम झाले होते. त्यांनी एके ठिकाणी थांबायचं ठरवलं. ओढय़ाचं पाणी प्यायले. थोडी फळं खाल्ली. अत्तूचं लक्ष गळ्यातल्या घडय़ाळाकडे गेलं. पाव भाग वाळू खालच्या गोलात आली होती. ‘‘फत्तू.. आवर लवकर. आपल्याजवळ जास्त वेळ नाही. अजून डोंगर आणि गाव बघायचा आहे.’’
फत्तू कंटाळून झोपला होता. पण अत्तूने त्याला उठवून परत उडायला सुरुवात केली. आता समोर मोठा डोंगर दिसत होता. अम्मीने जसं वर्णन केलं होतं तसाच होता तो. दोघांनी डोंगरावर थोडा वेळ भटकण्यात घालवला. परत उडून ते गावात आले. त्यांनी माणसांना पहिल्यांदा पाहिलं. त्यांची घरं त्यांना खूप आवडली. तळ्यात आपण असंच घर बांधू असं त्यांनी ठरवलं. गावात एका झाडावर दोघं जाऊन बसले. तिथं खेळणाऱ्या मुलांनी त्यांना पाहिलं. फत्तू त्यांच्या जवळ असलेल्या झाडावर जायला निघाला. ‘‘फत्तू, नको जाऊस. धोका असू शकतो.’’
पण फत्तूने त्याचं म्हणणं ऐकलं नाही. तो मुलांच्या जवळ असलेल्या झाडावर जाऊन बसला. अत्तूलाही पाठोपाठ यावं लागलं. कारण अम्मीने बजावलं होतं- ‘‘एकमेकांना सोडून कुठं जायचं नाही!’’
इतके सुंदर पक्षी पाहून मुलांना खूप आनंद झाला. त्यातल्या काही मुलांनी हातात दगड घेतले आणि अत्तू-फत्तूकडे भिरकावले. दोघांनी ते चुकवले, पण घाबरून फत्तू खाली पडला. मुले धावतच तिथं येऊ लागली. फत्तू खूप थकला होता. त्याला उठता येईना.
‘‘फत्तू, उठ लवकर. ती मुलं जवळ येताहेत.’’ अत्तू ओरडला.
‘‘बोलणारे पक्षी?’’ असं म्हणत मुलं आणखी वेगाने पुढं येऊ लागली.
‘‘अम्मीने हे नाही सांगितलं, की सगळी माणसं वाईट असतात म्हणून.’’ अत्तूच्या मनात विचार आला.
अत्तूने खाली सूर मारला व आपल्या चोचीने मुलांवर हल्ला केला. मुलं घाबरून मागे सरकली. त्यातल्या काही मुलांनी खोडकर मुलांना मागे हटवलं.
‘‘अरे, त्या बिचाऱ्यांना का मारताय? मागे व्हा. जाऊ द्या त्यांना.’’ मुलं मागे सरकून निघून गेली.
‘‘सगळीच माणसं वाईट नसतात.’’ अत्तू मनातच म्हणाला. त्याने फत्तूला उठवलं. पाणी पाजलं.
फत्तूला थोडी हुशारी आली. अत्तूने घडय़ाळाकडे पाहिलं.
‘‘चल ऊठ, आपल्याला निघायला हवं.’’ फत्तूला अजून गाव पहायचा होता. तो हट्ट करत होता. पण अत्तूने त्याला ओढतच उडायला भाग पाडलं. दोघं पुन्हा एकदा सूर मारत, पाठशिवणी खेळत उडू लागले. आता जंगल जवळ येत होतं आणि दिवस मावळत होता.
अत्तूने घाई केली. तो घडय़ाळातली वाळू संपण्याआधी तळ्यात येऊन पोचला. फत्तू मागेच होता. वाळू संपली आणि फत्तू मासा होऊन तळ्याकाठी येऊन पडला. मासा बनला. पाण्याविना तडफडू लागला. अत्तूने ओरडून सांगितलं, ‘‘प्रयत्न कर. तळ्याकडे उडी घे. तुला जमेल. ये लवकर. जवळ आहेस तू.’’ अत्तूच्या डोळ्यांत पाणी येऊ लागलं.
फत्तूने शेवटचा प्रयत्न केला आणि जोरात उडी घेतली. ती सरळ तळ्यातच. अत्तूला खूप आनंद झाला. त्याने फत्तूला मिठीच मारली. दोघांनी अम्मीला व विशफिशला सगळी हकिगत सांगितली. फत्तूने पुन्हा चूक करणार नाही असं कबूल केलं. नंतर त्यांनी आपलं पाण्यातलं घर बांधलं. आणि पुन:पुन्हा ते डोंगरावर आणि गावात जातच राहिले.
farukskazi82@gmail.com