हातात खाऊ दिल्यावर ‘एवढाच?’ असं म्हणायची अनेक लहान मुलांना सवय असते. आणि मुठीत खाऊ भरभरून घेतल्यावर बरणीत हात अडकलेल्या राजूची गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत आहे.
हा ‘एवढा?’ किंवा ‘एवढंच?’ हे झालं स्वत:ला जास्त मिळावं म्हणून स्वार्थापायी म्हटलं जाणारं. आज मात्र आपण वेगळ्या ‘एवढंच?’ बद्दल बोलणार आहोत. बघा हं, शाळेतून घरी आल्यावर आई विचारते, ‘अभ्यास आहे ना? करून घे.’ त्यावर तुम्ही म्हणता, ‘अगदी ‘एवढाच’ तर आहे, करेन नंतर’ म्हणता म्हणता रात्र होते आणि रात्री सुरुवात केल्यावर तो ‘एवढाच?’ अभ्यास काळोखातल्या सावलीसारखा मोठ्ठा होतो आणि तुम्ही रडकुंडीला येता. गालातल्या गालात हसू नका, सांगा बरं, असं होतं की नाही? तीच गोष्ट सुटीतल्या गृहपाठाची किंवा एखाद्या प्रकल्पाची किंवा एखाद्या पाठांतराची; जेव्हा तो तुम्हाला सांगितला जातो तेव्हा वाटतं ‘एवढंच?’ पण जर उशिराने कामाला सुरुवात केली तर त्याचा अक्राळविक्राळ राक्षस होतो. तेव्हा काम ‘एवढंच’ म्हणून पुढे न ढकलता ‘एवढंच तर आहे,’ म्हणत लगेच कामाला लागणं इष्ट.
अजून संपलं नाहीए बरं का! काही वेळा काय होतं की, कुणी तरी तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवत असतं, काही महत्त्वाच्या कामातली तुमची भूमिका समजावून सांगितली जात असते त्या वेळी तुम्ही अनेकदा मनात किंवा कधी कधी मोठय़ाने म्हणता ‘एवढंच?’ आणि समोरच्याला जे काही सांगायचंय ते नीट ऐकून तरी घेत नाही किंवा त्याचा फारसा विचार करत नाही. त्यामुळे हातातली संधी निसटून जाऊ शकते बरं का! अशा वेळी कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं तर ते महत्त्वाचं असतं, असा विचार करायचा. नाटक सिनेमात नाही का एखादा छोटीशी भूमिका निभावणारा कलाकारही लाखमोलाचं काम करून जातो, तसंच आहे. कामाची लांबी किंवा महत्त्व याचा विचार करत मनात आलेलं ‘एवढंच?’ हे खडय़ासारखं बाजूला करत कामाचा आनंद लुटायचा, तो नक्कीच ‘एव२२२२ढा२२२’ मोठ्ठा असेल.
joshimeghana231@yahoo.in