श्रीनिवास बाळकृष्ण
तुझं आवडतं खेळणं कुठलं? दरवाजे उघडणारी गाडी की डोळे मिचकवणारी बाहुली? ते हरवलंय का कधी? थोडय़ा वेळासाठी तरी? मोठे लोक मोबाइल सापडत नसल्यावर जसा घरभर गोंधळ घालतात तसा तूही घातला आहेस का? खेळणी तशी स्वत:हून कुठे जातच नाहीत म्हणा, पण इथल्या गोष्टीत एका छोटय़ा मुलीचं अस्वल (टेडीबेअर) मात्र हरवलं आहे. इमारतीतल्या प्रत्येक खोलीत जाऊन ती त्याबद्दल काळजीने विचारणा करतेय. तिला तिचं जिवलग खेळणं मिळालं का? ते मिळेपर्यंत काय अनुभव आले? कोण कोण भेटलं?.. ते पुस्तक पाहताना कळेलच.
काओरी ताकाहाशी या तरुण जापनीज् चित्रलेखिकेचे हे ‘नॉक नॉक, व्हेअर इज माय बेअर’ हे बघत राहावं असं पुस्तक छापलंय मात्र भारतीय ‘तारा पब्लिकेशन’ने. या पुस्तकातील चित्रशैली फार वेगळी म्हणावी अशी नाही. कथेतही फार काही घडत नाही, पण या पुस्तकाची रचना-मांडणी आणि छपाई पाहता पोटलीबाबाला हे पुस्तक म्हणजे खेळणंच वाटलंय. आजूबाजूला उघडणाऱ्या पानांच्या पुस्तकाची सवय असणाऱ्या आपल्या डोळय़ांसमोर ही पाचमजली जापनीज् इमारत अश्शी उभी राहते. प्रत्येक मजल्यावर नेते. तिथल्या वेगवेगळय़ा खोल्या दाखवते, माणसं, त्यांचं वागणं दाखवते- काही काल्पनिक खोल्यांसकट! आणि कथेशेवटी पायऱ्यांवरून आपणही सरसर खाली उतरतो.
हे यूटय़ूबवर ‘तारा’च्या वेबसाइटवर पाहून आनंद मानता येईलच, पण हाताने इमारत उलगडण्याचा आनंद काही औरच. नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे थोडं महाग आहे, पण भावंडांमध्ये, मित्रांमध्ये, शाळेसाठी एक असे पुस्तक ऑर्डर करून मागवता येईल. तोवर अशी काही उलगडणारी पुस्तककल्पना सुचतेय का तुला?
shriba29@gmail.com