चिनू नावाचा एक मुलगा होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूकच होती. त्याचे वडील भाजी विकायचे. चिनू हुशार होता. एके दिवशी तो त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष एका काटलेल्या पतंगाकडे गेलं. चिनू धावण्यातही पटाईत होता. तो क्रिकेट अर्धवट सोडून पतंगाच्या मागे धावला आणि तो पतंग चिनूला मिळालाही. त्या पतंगावर ड्रॅगनचं चित्र होतं. चिनू धावतच त्याच्या बाबांकडे गेला. त्याचे बाबा भाजी विकत होते. त्याने बाबांना तो काटलेला पतंग आपल्याला कसा मिळाला याची सगळी गोष्ट सांगितली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. त्याने तो पतंग भाजीच्या गाडीच्या खाली असलेल्या जागेत ठेवला. थोड्या वेळाने त्यांच्या गाडीवर एक बाई भाजी विकत घेण्यासाठी आल्या. तिच्या मागोमाग एक लहान मुलगा आला. तो त्या बाईंना रडवेल्या सुरात म्हणाला, ‘‘आई, माझी पतंग एका मुलानं काटली.’’ त्यावर आई म्हणाली, ‘‘तुझ्या बाबांनी पाच पतंग आणले आहेत. त्यातली एक घे.’’
चिनू ते सगळं ऐकत होता. चिनू त्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘‘माझ्याकडे एक पतंग आहे, बघ बरं तो तुझाच आहे का?’’
तो पतंग पाहताच मुलगा म्हणाला, ‘‘हा पतंग माझाच आहे.’’ पण त्याला आश्चर्य वाटलं, चिनूला मिळालेला हा पतंग तो आपल्याला का देत आहे. त्याने तो पतंग चिनूकडेच ठेवायला सांगितला. त्या दिवसापासून ते दोघे चांगले मित्र झाले.
धनश्री अतुल चौधरी,
इयत्ता- सहावी, सुभेदारवाडा, कल्याण</p>