एका रोपवाटिकेमध्ये (नर्सरी) खूप सारी फर्नची रोपे ठेवली होती. त्यातल्या एका छोटय़ा रोपाला वाटायचे की, नर्सरीत राहण्यापेक्षा कोणाच्या तरी घरी जावे. घरामध्ये, माणसांच्यात राहायला खूप मजा येईल. पण मोठी झाडे त्याला सांगत की, ‘‘आपली खरी जागा जमिनीतच आहे, माणसांच्या घरात नाही. आपण इथेच सुखात आणि आनंदात राहू.’’ छोटय़ा रोपाला ते अजिबात पटायचे नाही.
एके दिवशी दोन लहान मुले आपल्या आईबरोबर त्या रोपवाटिकेत आली आणि छोटय़ा रोपाला आपल्या घरी घेऊन गेली. ते रोप त्यांनी एका कुंडीत लावले. जसे दिवस गेले तसे ते रोप चांगले उंच झाले. मग नाताळच्या वेळी मुलांनी त्याला आपल्या दिवाणखान्यात नेले. त्यावर दिव्याच्या माळा, रंगीत रिबिनी आणि कागदी फुले लाऊन त्याला सजवून नटवून टाकले. त्याच्याजवळ वेगवेगळ्या भेटवस्तू ठेवल्या. सर्वानी सजवलेल्या झाडाचे खूप कौतुक केले. त्याच्याबरोबर फोटो काढले आणि त्याच्याशेजारी उभे राहून गाणी म्हटली. छोटे रोप आता ‘ख्रिसमस ट्री’ झाले होते. आपल्या नव्या रूपावर खूश होऊन त्याने आनंदाने शीळ घातली.
जानेवारी महिना संपेपर्यंत ते नटवलेले ‘ख्रिसमस ट्री’ म्हणजे दिवाणखान्यातले मुख्य आकर्षण होते. नंतर हळूहळू त्यावरची सजावट काढली गेली आणि त्याला तळघरात खिडकीशेजारी नेऊन ठेवले. आजूबाजूला कोणी माणसे नाहीत, झाडे नाहीत, खिडकीतून बाहेर बघितले तर फक्त पांढराशुभ्र बर्फ! झाडाला फार वाईट वाटले. त्याला खूप एकटे वाटायला लागले. नर्सरीतल्या मोठय़ा झाडांची आठवण येऊन रडू यायला लागले. त्याच्या मनात आले की, मोठी झाडे आपल्याला सांगत होती तेच बरोबर होते. दिवस काही संपता संपेनात. झाड अगदी कंटाळून गेले.
हळूहळू बर्फ वितळून बाहेर सूर्यप्रकाश दिसायला लागला. मुलांची आई तळघरात बागकामाचे सामान घ्यायला गेली. तिला बघून खिडकी जवळ ठेवलेले ख्रिसमस ट्री खूश झाले व तिच्याकडे बघून खुद्कन हसले. ते आता आणखीनच उंच झाले होते. आईने ख्रिसमस ट्रीला उचलून बागेत नेले आणि मोठय़ा कुंडीत लावले. मंद वारा आणि मोकळ्या वातावरणात नेल्यावर ख्रिसमस ट्री अगदी आनंदून गेले. तळघरात त्याला कित्येक दिवसांत अशी मोकळी हवा आणि उजेड दिसला नव्हता.
मोठय़ा कुंडीत ख्रिसमस ट्रीला आपले हातपाय हलवायलाही खूप जागा मिळाली. त्याने वाऱ्याकडे आणि सूर्यकिरणांकडे बघून मस्त शीळ घातली. त्याच्या असे लक्षात आले की, ह्या घरातली माणसे आपली खूप काळजी घेतात. आपल्याला बर्फाचा आणि गार वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आपल्याला तळघरात ठेवले होते. नाहीतर बाहेरच्या बर्फात आणि बोचऱ्या थंडीत आपला काही निभाव लागला नसता.
त्यानंतर दर वर्षी नाताळच्या वेळी त्या ख्रिसमस ट्रीला दिवाणखान्यात आणून सजवले जाई व नंतर बाहेरच्या गारव्याचा त्रास होऊ नये म्हणून बर्फ जाईपर्यंत ते तळघरात ठेवले जाई. ख्रिसमस ट्री त्या घरात अगदी खुशीत होते. घरातले सगळे त्याची आपल्या मुलांसारखीच काळजी घेत होते. आपली खरी जागा ह्या घरात आणि घरातल्या माणसांच्यातच आहे, अशी खात्री पटल्यामुळे त्याने आनंदाने परत एकदा शीळ घातली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा