प्राची मोकाशी

ख्रिसमस आणि नवीन वर्षांचे दिवस असल्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्याला लागून असलेलं ‘पेस्ट्रीलँड’ दुकान मस्त सजलं होतं. दुकानाच्या एका कोपऱ्यात दिव्यांनी सजवलेले मोठे ख्रिसमस ट्री ख्रिसमसचा सण आल्याची चाहूल देत होते. दुकानभर टांगलेले लहान-मोठे रंगीबेरंगी चमकणारे स्टार-कंदील, दुकानाच्या काचांवर लावलेले सांताक्लॉज-रेनडीयरचे स्टीकर्स दुकानाची शोभा वाढवत होते. ‘मेरी ख्रिसमस’, ‘हॅप्पी न्यू इयर’च्या कटआऊट्सनी अजूनच रंगत आणली होती. त्यातच ब्लॅक फॉरेस्ट-व्हॅनिला-पाइनॅपल-मॅंगो-किवी-स्ट्रॉबेरी केक्स-पेस्ट्रीजच्या रंगांनी आणि सँडविच-बर्गर-पिझ्झाच्या सुगंधांनी दुकानाच्या सजावटीला आणखीनच उठाव आणला होता.

सध्या शाळेला ख्रिसमसनिमित्त सुटी असल्यामुळे आरव त्याच्या बाबांना मदत करायला दररोज दुकानावर येत होता. एरव्ही पीटरदादा आणि दिलीपकाका बाबांना मदतीला असायचेच. पण या वर्षी पीटरदादा ख्रिसमससाठी त्याच्या गावी गेला होता, आणि तसंही आरवला दुकानावर यायला खूप आवडायचं. त्यात ख्रिसमसचा सण म्हणजे सोने-पे-सुहागा! त्याला ते सगळं वातावरणच मुळी खूप आवडायचं. त्यामुळे ख्रिसमसच्या आदल्या दिवशीच आरवने स्वत:हून अख्खं दुकान सजवलं होतं. अर्थात दिलीपकाका होता त्याच्या मदतीला! पण सजावटीची संपूर्ण आयडिया आरवची होती.

..दुपारची वेळ होती. पेस्ट्रीलँडमध्ये तूर्तास कुणी गिऱ्हाईक नव्हतं. त्यामुळे आरवचे बाबा काही काम करण्यासाठी थोडा वेळ दुकानाबाहेर पडले. दिलीपकाकाही पटकन जेवून घ्यायला म्हणून दुकानाच्या मागच्या खोलीत गेला. त्यामुळे थोडा वेळ दुकानाची जबाबदारी आरववर होती. आरवने एक मोठा ‘चीझ पिझ्झा’ गरम केला आणि तो दुकानाच्या काउंटरवर बसून पिझ्झा खाऊ लागला.

खाता-खाता तो मुख्य रस्त्यालगतच्या सिग्नलच्या दिशेने पाहत होता. दुकानासमोरचा तो मुख्य रस्ता वाहनांनी नेहमी गजबजलेला असायचा. त्यामुळे तो सिग्नलही खूप मोठा होता- तीन ते चार मिनिटांचा! गेले दोन-तीन दिवस आरवला त्या सिग्नलला एक लहान मुलगा प्रत्येक गाडीपुढे पैसे मागताना दिसत होता.

डिसेंबरच्या बोचऱ्या थंडीतही त्या मुलाच्या अंगावर धड कपडाही नव्हता. त्याचे कपडे पार फाटून गेले होते. त्याही परिस्थितीत तो नुसताच हात पुढे पसरून पैसे मागत नव्हता. त्या मुलाची पैसे मागण्याची तऱ्हा एकदम अजब होती. त्याच्या डोक्यावर एक लोकरीची टोपी होती- जिला एक लांबलचक लोकरीची जाड दोरी होती. दोरीच्या दुसऱ्या बाजूला त्याने एक दगड बांधला होता. प्रत्येक गाडीपाशी जाऊन तो मुलगा आपल्या डोक्याला हिसका देत ती दोरी डोक्याभोवती बराच वेळ गरागरा फिरवायचा. त्यामुळे तो दगडही डोक्याभोवती फिरायचा. दगडाचं फिरणं थांबलं की तो गाडीवाल्यांकडून पैसे मागत होता. कुणी गाडीवाले त्याला पैसे द्यायचे, कुणी दुर्लक्ष करायचे तर कुणी हाकलून लावायचे. मग पुढच्या गाडीकडे जाऊन तो पुन्हा तसंच करायचा. सिग्नल सुरू झाला की तो पुन्हा फुटपाथवर जाऊन वाटसरूंना त्याचं हे कर्तब दाखवायचा. त्याचा हा क्रम दिवसभर सुरू होता.

आरवचं दुकानात बसल्या बसल्या सारखं त्या मुलाकडेच लक्ष जात होतं. तो मुलगा साधारण आरवच्याच वयाचा असावा, दहा-बारा वर्षांचा! त्या मुलाचं असं करणं पाहून माझं डोकं इतकं गरगरतंय, तर दिवसभर असं करण्याने त्याचं काय होत असेल? या विचाराने आरव अगदी अस्वस्थ झाला.

तिथेच फुटपाथच्या एका बाजूला एक बाई तिच्या तान्ह्य बाळाला तिच्या फाटक्या साडीच्या पदराखाली घेऊन बसलेली होती. बराच वेळ ते बाळ झोपलेलंच असायचं. एका बाजूला गुलाबाचे गुच्छ तयार करून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना ती ते विकत घेण्यासाठी पुकारत होती. ख्रिसमस म्हणून कालपासून तिने सांताक्लॉजच्या टोप्या आणि मास्कही विकायला ठेवले होते. बहुधा ती त्या सिग्नलवाल्या मुलाची आई असावी, असं आरवला वाटलं.

त्या बाईच्या पायाजवळ आज एका रद्दी कागदात थोडा भात उघडा ठेवलेला आरवला दिसला. इतक्यात जोरात वारा आला आणि त्यातलं थोडं अन्न जमिनीवर विखुरलं. ती आई तिच्या बाळाला जमेल तसं उराशी धरत उरलंसुरलं अन्न वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागली. ते पाहून तो मुलगाही त्याचं सिग्नलवर सुरू असलेलं काम टाकून तिथे धावला, पण तोपर्यंत सगळं अन्न मातीमोल झालं होतं. ते दृश्य पाहून आरव एकदम शहारला. आता त्याला त्याचा पिझ्झा गळ्याखाली उतरेना.

तो तडक काउंटरवरून उठला आणि दुकानांत तयार असलेले तीन-चार सँडविच आणि पॅटीस ओव्हनमध्ये त्याने गरम केले. एक बिस्किटांचा पुडा, थोडे कुकीज् आणि दोन पेस्ट्रीज् त्याने घेतल्या. न विसरता दोन मोठय़ा पाण्याच्या बाटल्याही घेतल्या. हे सगळं एका कागदी पिशवीत त्याने व्यवस्थित बांधलं. दिलीपकाका जेवून बाहेर आल्यावर आरवने पटकन सगळं काकाला सांगितलं. मग तो त्या मुलापाशी गेला आणि ती पिशवी त्याला देऊ केली.

आधी तर तो मुलगा आरवकडे नुसता पाहतच राहिला. मग भानावर येत त्याने ती पिशवी आरवकडून चाचरत घेतली. तेव्हा त्याच्या हाताला काहीतरी गरम लागलं. त्याने ती उघडून पाहिली. पिशवीतले सगळे जिन्नस पाहून त्याच्या डोळ्यांत एकदम पाणी तरळलं. त्याने कृतज्ञतेने आरवकडे पाहिलं. त्या मुलाचा तो चेहरा पाहून आरव इतका अस्वस्थ झाला की काहीच न बोलता तो दुकानाच्या दिशेने वळला.

दुकानात शिरताच आरवने त्याचे डोळे पुसले. तोपर्यंत बाबाही दुकानावर आले होते. त्यांना सगळं दिलीपकाकाकडून आधीच समजलं होतं. बाबांनी आरवला शांत केलं, त्याची कौतुकाने पाठ थोपटली. मग दिलीपकाकाबरोबर ‘शेअर’ करत दोघांनी आरवचा तो उरलेला पिझ्झा संपवला..

संध्याकाळी ‘पेस्ट्रीलँड’ गिऱ्हाईकांनी अगदी गजबजलेलं होतं. दिलीपकाकाच्या घरून नेमका काहीतरी ‘इमर्जन्सी’ फोन आल्यामुळे त्याला अचानक घरी जावं लागलं होतं. त्यामुळे आरव आणि त्याचे बाबा कामात अगदी गढून गेले होते. आरव सगळ्या गिऱ्हाईकांच्या ऑर्डर पटापट सव्‍‌र्ह करत होता. एका बाजूला पार्सलच्या ऑर्डर बांधत होता. बाबा काउंटवर बिलिंग करत होते, नवीन ऑर्डर स्वीकारत होते.

या सगळ्या गडबडीतही आरव अधूनमधून दुकानच्या काचेतून मुख्य रस्त्याच्या पलीकडल्या फुटपाथकडे बघत होता. बाबांना आरवची ही बेचनी जाणवली, पण गिऱ्हाईकांची सारखी ये-जा असल्यामुळे त्या दोघांना एकमेकांशी निवांतपणे बोलायला वेळही मिळाला नाही.

‘‘आरव, मी मघापासून पाहतोय, खूप बेचन आहेस!’’ शेवटचं गिऱ्हाईक गेल्यानंतर दुकानाची आवराआवर करताना बाबांनी विचारलं.

‘‘बाबा, तो मुलगा आणि त्याची आई संध्याकाळपासून दिसले नाहीत. त्यांचं सामानही नाहीये.’’

‘‘बहुतेक त्यांना पोलिसांनी हटकलं असावं तिथून. किंवा नव्या कामाच्या शोधात स्वत:च कुठे गेले असतील निघून!’’ बाबा उसासा देत म्हणाले आणि पुन्हा दुकानाची आवराआवर करण्यात गुंतले.

‘‘बाबा, सेलिब्रेशन संपलं की हे डेकोरेशन वगैरे सगळं अगदी ओकंबोकं वाटतं नं? आपण ख्रिसमस, थर्टी-फर्स्ट, न्यू-ईयर वगैरेचे सेलिब्रेशन्स करतो, पण त्या मुलाला आणि त्याच्या आईला या नवीन वर्षांचं काय महत्त्व हो? त्यांना तर रोजचे दोन घास व्यवस्थित जेवायलाही मिळत नाहीत.’’

‘‘खरंय तुझं बेटा!’’ मग दोघे थोडावेळ काहीच बोलले नाहीत. बाबा आवरत राहिले. आरव त्यांना मदत करत राहिला. ‘‘बाबा, तुम्हाला आठवतंय? मला लहानपणी वाटायचं की खराखुरा सांताक्लॉज असतो..’’ टेबलावर पडलेली सांताक्लॉजची एक टोपी डोक्यावर घालत आरव एकदम म्हणाला.

‘‘पण सांताक्लॉज खरा असतोच. कोण म्हणालं नसतो? तो तुझ्यात आहे, माझ्यातही आहे.’’

‘‘म्हणजे?’’ बाबांचं ते वाक्य ऐकून आरव थोडा बावचळला.

‘‘ज्याला दुसऱ्याविषयी कणव वाटते, जो एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो, एखाद्या दुर्बल व्यक्तीला आश्रय देतो. जो कुणाला आनंद देतो किंवा दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानतो तोच तर असतो सांताक्लॉज! सांताक्लॉज ही एक सुंदर कल्पना आहे, जी माणसाला परस्परांमध्ये प्रेम करायला शिकवते. आज तू त्या मुलाला आणि त्याच्या आईला नि:स्वार्थी भावाने मदत केलीस तेव्हा त्यांच्या नकळत तू त्यांच्यासाठी त्यांचा सांताक्लॉजच बनला होतास. बेटा, सांताक्लॉज हा ज्याचा त्याचा विश्वास आहे.’’ असं म्हणत बाबांनी दुकानाचे दिवे घालवले.

बाबा दुकानाचं शटर बंद करणार एवढय़ात दुकानाच्या पायरीवरच्या कोपऱ्यात आरावला काहीतरी चमकताना दिसलं. अंधारात नीट दिसत नव्हतं म्हणून आरवने खाली वाकून पाहिलं आणि तो थक्क झाला. एका चमचमीत कागदात व्यवस्थित बांधलेली दोन गुलाबाची फुलं होती आणि बाजूलाच एका दगडाखाली ठेवला होता सांताक्लॉजचा मास्क..

mokashiprachi@gmail.com

Story img Loader