शुभांगी चेतन

shubhachetan@gmail.com

तुम्हाला पोळी लाटायला आवडते ना? म्हणजे, निदान लहान असताना तरी नक्कीच आवडते. आता तुम्ही विचाराल, हा काय प्रश्न आहे का?

पण हो, ही एक गंमत आहे. जी तुम्ही आणि मी एकत्र मिळून करणार आहोत. खरं तर स्वयंपाकघर हा तुमचा कुतूहलाचा विषय असतो. त्यातलं पोळी पाट, लाटणं, डब्यातल्या विविध डाळी यांबद्दलचे अनेक प्रश्न लहान असताना सतत त्रास देतात. म्हणजे अजूनही तुम्ही लहानच आहात. पण आता तुम्हाला जे वाटतं ते मांडण्यासाठी तुमच्याजवळ शब्द असतात, तसंच इतरही माध्यमं असतात.

तर आज आपण स्वयंपाकघर आणि चित्रातलं साहित्य या दोघांना एकत्र घेऊन एक गंमत करणार आहोत. त्यासाठी घरातल्या पोळ्या झाल्या की लाटणं ताब्यात घ्यायचं. कुठल्याही रंगाचा- जरा बऱ्यापैकी मोठा एक कागद, तुमच्या आवडत्या रंगाचा क्ले, रंगीत खडू, मूग-मसूर- तूरडाळ.. कपाळावर आठी नको, सांगते काय करायचंय ते!

तुमच्याकडे असलेल्या कागदावर क्लेचा गोळा ठेवून तो लाटण्याने लाटायचा. त्याचा कोणताही आकार येऊ दे. ती क्लेची पोळी फार पातळही होऊ द्यायची नाही आणि जाडही होऊ द्यायची नाही. त्यावर मधे मधे तुमच्याजवळ असलेल्या डाळी पेरायच्या- त्याही दिसायला हव्यात अशा. बाजूला जो कागद उरेल तो तुम्हाला हवा तसा तुम्ही रंगवा. तुम्हीच बघा ते कसं दिसतंय ते. मी याला माझं ‘क्लेचं बेट’ असं नाव दिलंय. तुमच्या चित्राला काय नाव द्यायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. नाव असलंच पाहिजे असंही काही नाही. प्रत्येक वेळी कुठे आनंदाला नाव देत बसायचं! गंमत म्हणजे लाटणं घेतलं म्हणून कुणाचाच ओरडा मिळणार नाही. फक्त आपलं काम झालं की पुढच्या पोळीसाठी ते स्वत:च स्वच्छ करून ठेवायचं.

क्लेपासून ही अशी विविध बेटं तुम्हाला तयार करता येतील- जशी या छायाचित्रात आहेत. प्रत्येक जण वेगळा, तसंच त्याचं बेटही वेगळं.

Story img Loader