पांढऱ्या पडद्यावर रंगीत प्रकाशझोतांचे मिश्रण कसे होते ते आपण मागील लेखात पाहिले. पिक्चर टय़ुब असलेल्या रंगीत टीव्हीमध्ये याच तत्त्वाचा उपयोग केलेला आहे. (छायाचित्र १ पाहा)
जलरंग (Water Colours), तलरंग (Oil Paints), पोस्टर कलर्स, छपाईचे रंग (Printing Colours) इ. रंगद्रव्यांचे मिश्रण हे वजाबाकी पद्धतीचे मिश्रण (Subtractive Mixing) होते. ही संकल्पना फार सोपी आहे.
आपण जेव्हा असे म्हणतो की, एखाद्या मुलाचा शर्ट लाल रंगाचा आहे तेव्हा प्रत्यक्षात काय घडत असते? त्या शर्टवर पांढरा प्रकाश पडला तर त्यातील प्रामुख्याने लाल रंगाच्या प्रकाश लहरी परावर्तित (Reflection) होतात व बाकी सर्व रंगांच्या प्रकाश लहरी प्रामुख्याने शोषून (Absorption) घेतल्या जातात. हाच लाल शर्ट हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या प्रकाशात कसा दिसेल ते प्रत्यक्ष बघणे फारच मजेशीर आहे. प्रयोग करून पाहा! पण हा प्रयोग तुम्हाला संपूर्ण अंधाऱ्या खोलीत करावा लागेल. रंगीत प्रकाशझोत मिळविण्यासाठी रंगीत दिवे किंवा रंगीत L.E.D. वापरा, अथवा पांढरा प्रकाश देणाऱ्या दिव्यांसमोर रंगीत गाळण्या (Colour Filters) वापरा. काही रस्त्यांवर रात्री प्रकाश देण्यासाठी सोडियम व्हेपर लँप्स लावलेले असतात. त्यांच्या पिवळसर प्रकाशात गाडय़ांचे व कपडय़ांचे रंग कसे दिसतात त्याचे नीट निरीक्षण करा. प्रत्यक्ष असलेल्या रंगांपेक्षा भलतेच वेगळे रंग दिसतात. रंगद्रव्यांच्या मिश्रणात आणि प्रकाशझोतांच्या मिश्रणात प्रचंड फरक आहे. एकातले प्राथमिक रंग (Primary Colours) हे दुसऱ्यातले दुय्यम रंग (Secondary Colours) असतात. (छायाचित्र क्र. १ व २ पाहा.)
लहानपणी शाळेत जलरंगांनी रंगवताना हिरवा रंग संपला की पिवळा व निळा रंग योग्य प्रमाणात एकजीव करून हिरवा रंग बनवता येतो, हे शिकलो. पण त्यामागचे शास्त्रीय कारण नीट समजले नव्हते. आता हे समजतंय की दोन्ही रंग पांढऱ्या प्रकाशातील हिरवा भाग काही प्रमाणात परावíतत करू शकतात.
शुभ्र पांढऱ्या पडद्यावरून सर्वच रंगांच्या प्रकाश लहरी प्रामुख्याने परावर्तित होतात. चित्रपटगृहातील पांढरा पडदा चांगल्या दर्जाचा असेल तर चित्रपट पाहण्यात जास्त आनंद मिळतो, कारण चित्र सुस्पष्ट दिसते. काळ्या रंगाचे पदार्थ/ कपडे पांढऱ्या प्रकाशातील जवळजवळ सर्वच रंगांच्या लहरी शोषून घेतात. तसेच अदृश्य उष्णतेच्या अवरक्त लहरी (Infra red) सुद्धा भरपूर प्रमाणात शोषतात, म्हणून कडक उन्हात काळे कपडे वापरले तर जास्तच उष्णता जाणवते. त्यासाठी उष्ण कटिबंधातील लोकांनी उन्हात वावरताना फिकट रंगांचे अथवा पांढरे कपडे वापरणे हितावह असते.
रंगद्रव्यांतले प्राथमिक रंग मोरपिशी (Cyan), किरमिजी (Magenta) आणि पिवळा (Yellow) हे एकत्र केल्यास गदड काळा रंग मिळत नाही. म्हणून छपाई तंत्रामध्ये चार रंग लागतात (चौथा रंग काळा) (छायाचित्र क्र. ३ पाहा) रंगीत वर्तमानपत्राच्या तळाशी जी जागा असते त्या जागेत तुम्हाला हे चार रंगांचे गोल छापलेले आढळतील. पण येथे ही गोष्ट समजावून घ्या की, रंगीत छपाईमध्ये पांढरा रंगच नसतो. ज्या कागदावर छपाई करायची आहे त्याचा रंग शुभ्र पांढरा असेल तर छापील रंगीत चित्र फारच सुंदर दिसते. ज्या भागात कोणताही रंग नाही तो पांढरा असल्याने रंगीत छपाईमध्ये कागदाच्या रंगाला व दर्जाला फार महत्त्व आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा