‘डोळे मिटून मी आता काहीही करणार नाही,’ असं स्पष्ट फर्मान सोडलंय म्हणे तुम्ही. मला कसं समजलं? कसं ते सांगणार नाही. कारण ते आमचं सीक्रेट आहे. पण खरं सांगा हं, अगदी अगदी खरं खरं सांगायचं. डोळे बंद करायचा आता कंटाळा आलाय नं! काही बिघडत नाही. आता आपण एक वेगळीच गंमत करायची. आता आपण डोळे उघडून इकडे तिकडे पाहायचं. अगदी मनसोक्तपणे इकडे तिकडे पाहायचं. काही लिहायचं नाही. वाचायचं नाही. अंक वगरेही वापरायचे नाहीत, फक्त पाहायचं. पाहताना लक्षपूर्वक पाहायचं ते वेगवेगळ्या रंगांकडे आणि डिझाइन्सकडेही. म्हणजे आपण एक हिरवा रंगच विचारात घेऊ बरं का! झाडांच्या सगळया पानांचा हिरवा रंग सारखाच आहे का पहा बरं! काय म्हणताय? तुम्ही हॉलमध्ये बसलाय तिथून झाडं दिसत नाहीयेत. बाहेर जायचा हट्ट करायला लागलात लगेच. नो, नो, नो परमिशन. हॉलमध्ये आजूबाजूला कित्ती ठिकाणी हिरवा रंग आहे. सोफा कव्हरच्या डिझाइनमध्ये आहे. पडद्याच्या डिझाइनमध्ये आहे. टी.व्ही.वरच्या झाडांमध्ये आहे. मालिकांमधल्या लोकांच्या कपडय़ांमध्ये आहे. आता समोर नसलेलाही हिरवा रंग लक्षात येतोय ना! तुमच्या शर्ट किंवा टी-शर्टमधला, स्टोरी बुक मधला, आईच्या ड्रेसचा, आजीच्या साडीचा, बाबाच्या शर्ट वा टी-शर्टवरचा, घरातल्या मार्बलचा. आता एक करता येईल, एकटय़ाने किंवा मित्रांबरोबर दोन्ही प्रकारे हे करू शकता बरं का! ह्या हिरव्या रंगांमधलं सारखेपण किंवा वेगळेपण शोधायचं. कोणकोणत्या वस्तूंचा हिरवा रंग सारखा आहे, कोणकोणत्या वस्तूंमधल्या हिरव्या रंगामध्ये फरक आहे. कोणता गडद, कोणता फिका. कोणत्या काळपटपणाकडे झुकणारा वगरे वगरे..
थांबा हं, मला तिथून काही आवाज येतोय. तुम्हाला हिरवा रंग आवडत नाही. मग तुम्हाला आवडणाऱ्या रंगापासून सुरुवात करा. अगदी कोणत्याही रंगापासून सुरुवात करा आणि रोज एक वेगळा रंग घ्या. मामला खतम!

Story img Loader