माझ्या छोटय़ा वाचकांनो, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच की मला निसर्गाचं खूप वेड आहे. अगदी लहानपणापासूनच निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या शहराच्या भागात राहिल्याने अगदी जवळून निसर्गाची वेगवेगळी रूपं मला न्याहाळता आली. मुंबईत बोरीवलीला असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मोठाच वाटा माझ्या बालपणाच्या आयुष्यात आणि माझ्या जडणघडणीत आहे. सकाळी आजोबांसोबत कधी मॉर्निग वॉकला जायचो, कधी बाबांसोबत सायंकाळी टेकडीवर चढून सूर्यास्त पाहायचो. पावसाळ्यात ओढय़ाकाठी आई-बाबांसोबत पक्षी पाहात तासन्तास बसायचो. पुढे मित्रांसोबत सायकलवरून फिरायला जायचो. कधी पार कान्हेरीच्या गुंफांपर्यंत सायकल रपेट करून तिथे फिरून यायचो. साहजिकच हे जंगल, तिथल्या प्राण्यापक्ष्यांची मला भुरळ पडली.
एका पहाटे असाच सायकलवरून रपेट मारायला बाहेर पडलो. सायकलला छोटी विजेरी लावून रस्ता दिसेल अशी सोय केली होती. गांधी टेकडीच्या पायथ्याशी अंधाऱ्या रस्त्यावरून सायकल चालवत असताना एका बिबळ्याने रस्ता ओलांडला. रस्त्याच्या डाव्या हाताला असलेल्या भिंतीला पडलेल्या भगदाडातून तो वेगाने आला आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या टेकडीच्या जंगलात दिसेनासा झाला. विजेरीच्या छोटय़ाशा प्रकाशातही त्याच्या अंगावरील नक्षी, डोळ्यातील चमक आणि विजेसारखी चपळता मनात भरली. काही क्षणातच ती आकृती एका सावलीसारखी आजूबाजूच्या काळोखात मिसळून गेली. तो बिबळ्या दिसेनासा झाला तरी काही क्षण मी सायकलसह एका जागीच खिळून गेलो होतो. प्रचंड भीती वाटली होती हे आठवतंय.
त्यानंतर पुन्हा एकदा पावसाळ्याच्या पहाटेच्या किर्र काळोखात एक बिबळ्या झाडाच्या फांदीवर उंच बसून खालचं सारं पाहत असल्याचं पाहिलं होतं. तेव्हाही सायकल होतीच सोबत, मात्र एका वन कर्मचाऱ्याच्या सोबतीने धीर आला होता. त्याने पेटवलेल्या शेकोटीच्या सोबतीने आणि त्याच्या संरक्षणाकरता बांधलेल्या लोखंडी केबिनमधून सकाळी सूर्य वर येईतोवर त्या बिबळ्याला पाहत बसलो होतो. सूर्योदयानंतरच्या पहिल्या उबदार सूर्यप्रकाशात त्या सुरेख प्राण्याची कांती लखलखताना पाहून मी थक्क झालो होतो. या वेळी बिबळ्याची भीती वाटण्याऐवजी त्याविषयी एक अनामिक आकर्षणच वाटलं.
पुढे मग ताडोबा, गीर आणि बोरिवलीलाही बिबळ्या अनेकदा पाहिला. अगदी डोळ्यांत डोळे घालून पाहिला. भीती वाटतेच, मात्र ते अप्रतिम सुरेख जनावर आपल्यासमोर असण्याची एक भुरळ पडतेच हे नाकारता येत नाही. एक प्रकारची भूल पडते आणि मी जागीच खिळून त्या तल्लख आणि चपळ प्राण्याला डोळे भरून पाहत राहतो.
ही भूल, वाघराविषयी हे अनामिक आकर्षण एका पुस्तकात वाचायला मिळालं. अगदी मला जस्सं वाटतं तस्सं आणि अगदी चपखल शब्दांत वाघराच्या, त्याच्या जंगलाच्या आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या एका गडकरी कुटुंबाची ही गोष्ट वाचली आणि त्या दिवसापासून या चिमुकल्या कादंबरीच्या प्रेमातच मी पडलो आहे. सातवी-आठवीत असताना गो. नी. दांडेकरांनी लिहिलेल्या ललित निबंधाचा एक भाग आम्हाला अभ्यासाकरता होता. मला तो भावला, म्हणून मग वाचनालयातून त्यांच्या पुस्तकांचा शोध घेतला आणि ‘वाघरू’ हाती पडली.
बाबूदा, वहिनी, यसुदी आणि हानूवती हे एक चौकोनी कुटुंब. राजगडावर राहणारं. या कुटुंबातील प्रत्येकजण त्या रहाळावर आणि राजगडावर, भोवतालच्या निसर्गावर मनमुराद प्रेम करणारा आहे. कथानक पुढे सरलं आणि त्यातील नवीन पात्रं म्हणजे एक ‘वाघरू’! बाबूदाने पाळलेलं, चिडून, न राहवून, परिस्थितीवश परत रानात सोडून दिलेलं. ही २०-२५ वर्षांपूर्वींची याद जागी होते, त्या वाघराच्या रहाळात पुन्हा दाखल होण्यानं! आणि मग पुढे सुरू होतं नाटय़, अनेक आंदोलनं.. त्या वाघराला मारण्याचं नाटय़.. आणि दु:खाने पिळवटून निघणाऱ्या बाबूदा आणि त्याच्या कुटुंबाच्या मनाची अनेक आंदोलनं.
या कादंबरीच्या गोष्टीने, त्यातल्या निसर्गाच्या वर्णनाने, राजगडाच्या अतिशय सुरेख अशा वर्णनाने आणि अनेक बारकाईने लिहिलेल्या छोटय़ा छोटय़ा प्रसंगांनी मला इतकी भूल पाडली, की ही छोटी कादंबरी मी अधाशासारखी वाचून काढली. गृहपाठ, अभ्यास साऱ्याचा विसर पडला. या कादंबरीचा माझ्यावर इतका पगडा होता की, खूप वर्षांनंतर महाविद्यालयात असताना मराठी साहित्य विषयाच्या प्रकल्पाकरता याच कादंबरीचं रसग्रहण मी केलं होतं. या कादंबरीचा मला भावलेला पैलू म्हणजे- या गोष्टीत निसर्ग आणि वाघरू हीदेखील पात्रं आहेत. निसर्ग किंवा वाघरूफक्त परिणामांकरता, निसर्गवर्णनाकरता येत नाहीत. त्यांना एक प्रकारची व्यक्तिमत्त्व असल्यासारखी ती गोष्टीत गुंफली आहेत. आपल्या आयुष्यातही निसर्ग अविभाज्य भाग नसतो का? पाऊस पडला तर पाणी मिळणार. शेती पिकली तर अन्न. जंगलं सुरक्षित राहिली तर नदी-नाले पाणी पुरवणार. पक्षी-कीटक असले तर परागीभवन होणार आणि फळं, धान्य पिकणार. निसर्गाला आपण फारच गृहीत धरतो. जणू आपल्या सेवेकरताच निसर्गाची निर्मिती झाली आहे. आपण आपल्या अवतीभवतीच्या निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत, ही बाब ‘वाघरू’च्या प्रत्येक वाचनात मनावर ठसत जाते. त्यामुळेच या गोष्टीतल्या वाघरूमुळे खऱ्या वाघरासोबतची आणि प्रत्यक्ष पाहिलेल्या वाघरामुळे या गोष्टीतल्या वाघराशी माझी मैत्री अतूट होत गेली. ही कादंबरी वाचून तुम्हाला काय गवसलं हे मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
हे पुस्तक कुणासाठी? उत्तम गोष्ट आवडणाऱ्या साऱ्या वाचकांकरता.
पुस्तक : वाघरू
लेखक : गोपाळ नीळकण्ठ दाण्डेकर
प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन, मृण्मयी प्रकाशन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा