प्रिय बाई,
शि.सा.न.वि.वि.
बाई, तुम्हाला आठवतंय का, त्या दिवशी मी शाळाभर फुलपाखरासारखी भिरभिर फिरत होते. कारण, आता त्या छोटय़ा कौलारू शाळेतून मी शहरातल्या मोठय़ा अनेक मजली शाळेत जाणार होते. माझं चिमुकलं विश्व विस्तारणार होतं. जुनी शाळा सोडण्याची चुटपुट आणि नवीन शाळेची ओढ अशी माझी ओढाताण चालली होती. पण बाई, तुम्ही मला जवळ बोलावलंत आणि केसांतून हात फिरवत म्हणालात, ‘बेटा तुझं वय जसंजसं वाढतंय तसं तुझं जग विस्तारत जाणार आहे आणि तेच योग्य आहे. त्यामुळेच तुझी ज्ञानकक्षा विस्तारणार आहे.’
ही ज्ञानकक्षा विस्तारण्याची ओढच मला नवीन जगात बळकट स्थान देऊ शकली. पण बाई, आजच्या भाषेत सांगायचं I missed you, missed you very या नवीन शाळेत काय नाही, आपल्या त्या शाळेत नसलेलं सारं काही आहे. अगदी सारं काही. इथे ई-लर्निग आहे, प्रोजेक्टर्स, सीडी प्लेअर्सची लयलूट आहे. कॉम्प्युटर, इंटरनेट अॅक्सेस या काही अपूर्वाईच्या गोष्टी उरल्या नाहीएत. पण बाई, खरं सांगू का इथे काहीतरी कमी आहे. कमी आहे ती पाठीवरून फिरणाऱ्या प्रेमळ हातांची, कमी आहे ती डोळे पुसणाऱ्या हळुवार बोटांची, घाबरून मिठी मारल्यावर जवळ घेणाऱ्या आपुलकीची, आईला उशीर झाल्यावर पाठीवर असणाऱ्या धीराच्या हाताची, आईबरोबर घरी निघाल्यावर टाटा करतानाच्या प्रेमळ डोळ्यांची..
बाई, तुम्हाला आठवतंय, एकदा पावसाळ्यात जोराची वीज कडाडली. मला वाटतं तेव्हा आम्ही पहिली-दुसरीत असू. त्या आवाजाला घाबरून अगदी सगळा म्हणजे सगळा वर्ग तुमच्याकडे धावला आणि तुम्ही कोणालाही न ओरडता चक्क साऱ्यांना जवळ घेऊन शाळा सुटेपर्यंत एका जागी बसला होतात. प्रत्येकाला वाटत होतं की मी बाईंच्या जवळ आहे, हीच तर तुमची कमाल होती. दुसऱ्या दिवशी तुम्ही आम्हाला वीज कशी चमकते, कडकडाट कसा होतो, आपल्या शाळेत विद्युतरोधक कसा बसवला आहे, त्यामुळे आपण विजेला का घाबरायचं नाही, हे सारं इतकं तपशीलवार सांगितलं होतं की मीच काय आमच्या वर्गातला कुणीही ते कधीच विसरू शकणार नाही. बाई, आज आम्हाला what is lightening असं search केलं की कॉम्प्युटरवर सारी माहिती मिळेल, पण.. पण.. आम्ही घाबरून थरथरत असताना प्रत्येकाला जवळ घेणारा तो ओलावा, कुठेतरी हरवलाय. नाही नाही तो हरवला नाही, तो तुमच्याजवळ आहे आणि आम्ही तुमच्यापासून दूर गेलोय.
बाई, स्ट्रेस मॅनेजमेंट, अॅंगर मॅनेजमेंट, व्हॅल्यू एज्युकेशन यांचं शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या शिबिरांमध्ये किंवा संस्कार वर्गामध्ये धावाधाव करणारे माझे फ्रेंड्स बघितले की, मला तुमची जोरदार आठवण येते. कधीही तुमच्याकडे कुणाबद्दलची कोणतीही तक्रार घेऊन गेलो की तुमचा पहिला प्रश्न असायचा- समोरचा काय म्हणाला वा म्हणाली, समोरच्याला काय वाटलं असेल याचा तर आधी विचार करून पाहा, म्हणजे आपोआपच भांडण मिटेल तुमचं. आणि खरंच तसं व्हायचं बाई.
केव्हा केव्हा आम्ही रागावून रुसून फुरंगटून बसायचो. बोलायचोच नाही. ओठ घट्ट मिटून घ्यायचो. अशा वेळी प्रमाने ओंजारून गोंजारून तुम्ही बोलतं करायचात. अगदी ऐकलं नाही तर प्रसंग टपली मारून म्हणायचात, ‘ए वेडे बोलून तर टाक. मोकळं वाटेल. आणि खरंच बोलून टाकल्यावर खूप मोकळं वाटायचं आणि हसायलाही यायचं. हळूहळू त्यातूनच आम्ही शहाणे झालो. गप्प राहण्यापेक्षा बोलण्याने प्रश्न सुटतात हे समजलं.
प्रत्येक वेळी आपलं नातं असं गुडीगुडी होतं असं नाही. कधी रागावलेलं, कधी धुसपुसणारं, कधी शंकेखोर तर कधी चिडलेलंही असायचं. पण तुमच्या चेहऱ्यावरच्या हलक्या स्मितातून ती कटुता नकळतच दूर व्हायची आणि उरायची फक्त आणि फक्त आपुलकी!
सध्याची एक मजा शेअर करायची आहे. मी सीडीज्, इंटरनेट वापरून एखादी नवीन संकल्पना शिकते, त्यावरचे प्रश्न सोडवते तेव्हा माझा कॉम्प्युटर कोरडेपणाने लाल किंवा हिरवा बल्ब दाखवतो आणि उत्तर बरोबर वा चूक ते मला समजतं. वाटल्यास तो कधीकधी म्हणतो- र्रिटाय, एवढंच. पण अशा प्रत्येक वेळी मला तुम्ही आठवता. ज्यावेळी मला एखादी संकल्पना समजायची नाही तेव्हा ती समजावी म्हणून तुम्ही तुमचं कौशल्य अगदी पणाला लावायचात. मला वजाबाकी येत नव्हती तेव्हा तुम्ही कित्ती कित्ती प्रकार वापरले होते.. पानं, फुलं, पक्ष्यांपासून शाळेच्या आजूबाजूला पार्क केलेल्या गाडय़ांच्या नंबरप्लेटवरचे आकडेही तुम्ही सोडले नव्हते. खरंच बाई, आज मी टेक्नोसॅव्ही झालेय, ज्ञानाच्या महासागरात पोहोतेय पण काहीतरी राहून जातंय. फार विचार केला, पण काय चुकतंय ते समजतच नव्हतं. पण आज अचानक शोध लागला, इथे कमी आहे ती स्वत:हून सहस्रपटींनी
ज्ञानी पिढी तयार होण्यासाठी तळमळणाऱ्या हृदयाची.
ते हृदय तुमच्यापाशीच आहे बाई.. आणि
म्हणून उद्याच्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!
कळावे,
आपलीच
सुवर्णा महाबळ – suvarna71@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा