शाळा आता सुरळीत सुरू झाल्यात आणि काही कॉमन तक्रारी तेवढय़ा पुन्हा पुन्हा ऐकू येऊ  लागल्यात. ‘काकू, जरा लँग्वेजिसचा प्रॉब्लेम होतोय,’असं कोणी म्हणतंय. तर कोणाच्या मते, सोशल सायन्सेस फारच कठीण असतं. गणित सायन्सबद्दल नाकं मुरडणारे तर भरपूरच. मग काय होतं की, जे नावडतं ते बाजूला पडतं आणि बाजूला पडतं म्हणून आवडत नाही. यावरच आज थोडंसं बोलू.
नावडत्या विषयाला बाजूला पाडायचं नाही हे पहिलं तत्त्व. नावडत्या विषयासाठी प्राइम टाइम जास्त वापरायचा हे अजून एक. त्या विषयांसाठी रोज वेळापत्रकात वेळ ठेवायचाच आणि बरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या त्या विषयाची भाषा. थांबा, थांबा असे बावचळून जाऊ  नका. शिक्षणाचं माध्यम आणि त्या त्या विषयाची भाषा यात गल्लत करू नका. माध्यम कोणतंही असलं तरी जर तुम्ही पाठय़पुस्तकं डोळसपणे वाचली तर तुमच्या लक्षात येईल, की प्रत्येक विषयात विशिष्ट संज्ञा, संकल्पना असतात आणि त्या संज्ञा, संकल्पना एकदा का आपण अंगवळणी पाडून घेतल्या की तो अवघड विषय कदाचित सोप्पाही होऊन जाऊ  शकतो. हो, जरा धीर धरा, थोडासा आळस बाजूला सारा, टाळाटाळ करणंही टाळा आणि आपल्या इयत्तेचं आणि मागच्या इयत्तांची पाठय़पुस्तकं नजरेखालून घाला. त्या पाठय़पुस्तकात या सगळ्या संज्ञा व्यवस्थित रीतीने स्पष्ट केलेल्या असतात. थोडा संयम पाळून, काही वेळा मोठय़ांची मदत घेऊन एकदा त्या संज्ञा स्पष्ट करून घ्या. संज्ञा आणि संकल्पना स्पष्ट झाल्या, की अवघड विषय सोप्पाही होऊन जाईल बरं का, अगदी आयुष्यभरासाठी!
मेघना जोशी – joshimeghana.23@gmail.com

Story img Loader