काय मग, खाता खाताही अनेक गोष्टींची माहिती करून घेता येते हे लक्षात आलंय ना तुमच्या! म्हणजे बघा, मागच्यावेळी पाहिल्याप्रमाणे पहिल्यांदा पदार्थातील मुख्य घटकांचा वनस्पतीज आणि प्राणीज वगरे विचार केला असेल, तर मग अगदी थोडय़ा थोडय़ा प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या घटकांपर्यंत पोहोचला असाल. एक गंमत सांगू का, त्यातूनच आपल्या एका छोटय़ा दोस्ताने प्रश्न विचारलाय, ‘मीठ कोणत्या गटात मोडतं बरं?’ तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील किंवा पडत असतील तर ते निसंकोचपणे विचारा बरं का! घरात कुणालाही विचारा. आसपासच्या वडीलधाऱ्यांना विचारा, नाही तर मग आम्हाला विचारा.
बरं, आता असं करून पाहायला हरकत नाही, की वनस्पतीज पदार्थ ओळखता आले की मग त्यांच्यातले बारकावे शोधायचे. म्हणजे बघा हं! गहू, तांदूळ, मूग, मटकी, मोहरी, बटाटे, कांदे, आलं, लसूण हे आणि असे अनेक.. अनेक वनस्पतीज पदार्थच; पण प्रत्येक पदार्थ किती वेगळा आणि स्वतंत्र अस्तित्व असलेला. त्यांची रचना किती भिन्न, चव, रंग, रूप, आकार यांमध्ये कित्ती कित्ती विविधता. पण हे सगळेच्या सगळे वनस्पतीज. आहे की नाही गंमत! हीच गंमत प्राणीज पदार्थाच्या बाबतीत. दूध, अंडी, मासे, शिंपले, खेकडे, चिकन, मटण वगरे वगरे सारं सारं प्राणीज, पण तेही कित्ती वेगळं वेगळं. मग ह्या सगळ्या एकतेत विविधता शोधायचा प्रयत्न करून तर पाहा, बघा कित्ती मज्जा येईल ती! ही सारी विविधता तुम्हाला एकटय़ाला नाहीच शोधता येणार. त्यासाठी सुट्टीत जमलेल्या आपल्या भावंडांबरोबर, मित्रांसोबत चर्चा करा.

Story img Loader