प्राची मोकाशी
मीना घरात आली तेव्हा तिची लेक राधा ‘काळी ४, पांढरी ५’ असं स्वत:शीच पुटपुटत वहीत कसल्या तरी नोंदी करत होती. घराबाहेर लाऊड स्पीकरवरून ‘फुल व्हॉल्यूम’वर ‘ढाक-चिक-ढाक-चिक’ गाणी सुरू होती. पण तो आवाज राधेला जराही डिस्टर्ब करत नव्हता.
‘‘राधे, काय बडबडतेयस स्वत:शीच?’’
‘‘सरांनी शिकवलेल्या रागाच्या नोटेशन लिहितेय!’’
‘‘पेटीशिवाय?’’ या डी. जे.संपन्न वस्तीत हे क्लासिकल संगीताचं फूल कुठून उमललं असं मीनाला एकदम वाटून गेलं.
‘‘आई, पेटी काय? ‘संवादिनी’ किंवा ‘हार्मोनियम’ तरी म्हण!’’
राधा हार्मोनियम सुरेख वाजवायची. सरोजिनी मराठी मीडियम शाळेत ती सातवीत शिकत होती. तिच्यातला संगीताचा उपजत गुण शाळेतल्या संगीत शिकवणाऱ्या समेळ सरांनी राधा पाचवीत असतानाच हेरला आणि तिला हार्मोनियम शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तेव्हापासून गेली दोन र्वष राधा समेळ सरांच्या क्लासला हार्मोनियम शिकायला जात होती. यंदाच्या गुरूपौर्णिमेला क्लासच्या कार्यक्रमात तिने ‘यमन’ रागातील एक ‘चीज’ स्वतंत्रपणे वाजवली होती.
घरात हार्मोनियम नसल्यामुळे क्लास संपल्यानंतरही राधा हार्मोनियमवर संध्याकाळी उशिरापर्यंत क्लासमध्ये सराव करत बसायची. त्यामुळे बऱ्याचदा तिला घरी यायला उशीर व्हायचा. शाळा, अभ्यास आणि गाण्याचा क्लास यांचा ताळमेळ सांभाळण्याची राधाची धडपड तिच्या आईला जाणवत असे. राधाचं सातत्य आणि लगाव बघून मीनाला राधासाठी छानशी हार्मोनियम विकत घ्यायची होती. समेळ सरांबरोबर दिवेकर म्युझिकल्स या वाद्यांच्या दुकानात जाऊन तिने हार्मोनियम बघूनही ठेवली होती. पण आपल्याला कितपत परवडेल याची मीनाला खात्री नव्हती. त्यामुळे राधाला ती कधीच याबद्दल बोलली नाही. हार्मोनियम आणून तिला राधाला ‘सरप्राईज’ द्यायचं होतं.
मीना आणि राधा दीड खोल्यांच्या घरात राहायच्या. एवढंच त्यांचं जग! एकमेकींना त्या दोघीच होत्या. मीना राधाच्याच शाळेच्या बालवाडीमध्ये मावशीचं काम करायची. महिन्याच्या पगारातून ती हार्मोनियमसाठी पैसे साठवत होती. पण अचानक कुठला खर्च निघाला की हार्मोनियम घ्यायला पैसे अपुरे पडायचे. गेल्या महिन्यात राधाचा वाढदिवस झाला तेव्हाही मीना राधासाठी हार्मोनियम घेऊ शकली नव्हती. आता दिवाळी तोंडावर आली होती. यावेळी तरी जमायला हवं असं मीनाला सारखं वाटत होतं.
शाळेतल्या कामाच्या जोडीने मीना वर्षभर भाजण्या, पिठं, मसाले बनवून विकायची. त्याचबरोबर दिवाळीला चिवडा, चकल्या, शंकरपाळे हे फराळाचे पदार्थ तिची स्पेशालिटी होती. त्यांच्या विक्रीतूनही ती थोडे थोडे पैसे साठवत होती. आज शाळेतून येताना मीना भरपूर पिशव्या घेऊन आली.
‘‘एवढं काय आणलंस?’’ राधाने तिच्याकडून पिशव्या घेत विचारलं.
‘‘मसाल्यांचं सामान!’’ बालवाडीच्या आवारामध्ये दिवाळीच्या आदल्या आठवडय़ात प्रदर्शन भरणार आहे. शाळेला ५० र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाशकंदील, ग्रीटिंग कार्ड्स विक्रीसाठी प्रदर्शनात मांडणार आहेत. मुख्य म्हणजे मावशींना तिथे स्टॉल लावण्याची संधी मिळणार आहे. मी नावही नोंदवून आलीय!’’
‘‘एवढी धावपळ कशासाठी?’’
‘‘दिवाळीत आपल्याला फ्रीज घ्यायचाय नं?’’ विषय बदलत मीना तिथून सटकली.
राधाला मीनाची खटपट नवीन नव्हती. एरवीसुद्धा सकाळची शाळा आणि घरी आल्यावर पदार्थाच्या ऑर्डर्स पूर्ण करताना मीनाला दिवस पुरत नसे. त्यात आता प्रदर्शनाच्या पदार्थाची भर पडली होती. तशी तयार पदार्थ वजन करून पॅक करणं, लेबलं लावणं, नोंदी करणं वगैरे कामांत राधाची तिला खूप मदत व्हायची. त्यामुळे प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीच पदार्थाचे पॅकेट्स ‘रेडी’ होते. प्रदर्शनाच्या दिवशी मीनाच्या स्टॉलला छान प्रतिसाद मिळाला. अनेकांनी तिला आगाऊ ऑर्डर्स दिल्या. दिवसभरात भरपूर विक्री झाली. मीना सुखावली. राधासाठी हार्मोनियम घेण्याच्या आशेचे दिवे तिच्या मनात पुन्हा तेवू लागले.
वसुबारसच्या संध्याकाळी राधा क्लासवरून घरी आली तेव्हा अंधारलं होतं. घराच्या दारात आकाशकंदील लावण्यात मीना मग्न होती.
‘‘सुरेखामावशीच्या स्टॉलवरचा आकाशकंदील नं?’’ – इति राधा. मीना हसली.
‘‘खुश दिसतेस!’’ राधाने आईच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपला. मीनाने बटण ऑन केलं, पण कंदिलातला बल्ब लागेना.
‘‘‘लूज कनेक्शन’ असेल!’’ मीना पुन्हा खटपट करू लागली.
‘‘आई, दिवाळी आली! नवीन फ्रीज आणायला कधी जायचं?’’
‘‘बघू.’’ मीनाचं जुजबी उत्तर. एवढय़ात राधाचं लक्ष घरातल्या खुर्चीकडे गेलं.
‘‘हार्मोनियम!’’ ती जवळपास ओरडलीच.. आणि धावत खुर्चीपाशी गेली! काळ्या कव्हरच्या बॅगच्या आकारावरून राधाने लगेच ओळखलं. तिने हार्मोनियम अलगद बाहेर काढली आणि हळुवारपणे तिच्यावरून हात फिरवला.
‘‘सरप्राईज! कशी आहे?’’ म्हणत मीनाही घरात आली.
‘‘एक नंबर! म्हणून इतके दिवस धावपळ सुरू होती तर! मला वाटलं, फ्रीजसाठी! ही आयडिया होती तर..!’’
‘‘खूप दिवसांपासूनची इच्छा होती माझी- तुला ‘संवादिनी’ घेण्याची!’’ मीनाने डोळे मिचकावले.
‘‘हे दिवाळीचं एकदम बेस्ट ‘सरप्राईज’ आहे.’’ राधाने आईला घट्ट मिठी मारली.
‘‘वाजव नं काहीतरी!’’
‘‘काहीतरी कशाला? शाळेला ५० र्वष पूर्ण झाल्याच्या ‘सेलिब्रेशन’चा भाग म्हणून आपल्या शाळेच्या ऑडिटोरियममध्ये यंदा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम होणार आहे. काही सर आणि बाई मिळून हा कार्यक्रम बसवताहेत. त्यात समेळ सर संपूर्ण गाणं वाजवण्याची संधी देणार आहेत मला! तेच वाजवते..’’
‘‘पठ्ठे! बोलली नाहीस एकदाही!’’
‘‘सरप्राईज!’’ राधा म्हणाली. तिने मग हार्मोनियमला नमस्कार केला आणि वाजवू लागली,
‘मन मंदिरा तेजाने, उजळून घेई साधाका..
नी नी नी सासासा नी नी नी सासासा, नीनी सासा रेरेसासा नी धप…’
इतक्यात आकाशकंदिलाचा बल्ब लागला आणि दोघींचं जग उजळून निघालं. हार्मोनियमच्या सूरमयी स्वरांनी ते तेजोमय झालं..
mokashiprachi@gmail.com