विद्या डेंगळे
सकाळी माझ्या पपांच्या हातात पेपर पडला की त्यांच्या डोक्याला आठय़ा पडतात. कधीकधी ते ‘हे राजकारणी लोक म्हणजे..’ असं म्हणून पेपर बाजूला सारतात. फक्त भारतीय क्रिकेटची खूशखबर असली की मात्र सबंध पेपर आनंदाने वाचतात. माझी मम्मा मात्र मोबाइलवर पक्षी-प्राणी इत्यादींचे व्हिडीओ बघत मजेत असते.
पपा त्या दिवशी सकाळी दिल्लीत बराच काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाविषयी कळकळीने बोलत होते. मी जेवणाच्या टेबलापासून उठलो आणि जबरदस्त भुंकत बाहेर पळालो. बाहेरचं काम आटोपून घरातल्या बिस्किटाच्या डब्याचा आवाज ऐकून मी पुन्हा धावत घरात आलो.
‘‘ब्रँडो, तू इतक्या मोठय़ानं भुंकतोस ना, तूही जा शेतकऱ्यांबरोबर, त्यांना मदत होईल तुझी. इथे तू भुंकलास की इथले सगळे तुला शिव्या घालतात. तिथे शेतकऱ्यांबरोबर बसलास तर आवाज दूर दूपर्यंत तरी जाईल आणि त्यांच्या मागण्या कदाचित पूर्ण होतील!’’ मम्मा म्हणाली.
हे ऐकलं आणि मी विचार करू लागलो. ‘आम्हा श्वानांच्याही मागण्या आहेत, असा आवाज उठवता आला तर होतील पूर्ण!’ असा विचार मनात आला आणि त्या दिवशी मी त्या विचारानं चक्रावलो. त्यात भर म्हणून मम्मानं मला एक व्हिडीओ दाखवला. मला नीटसं काही कळलं नाही, पण एक श्वान अनेक डब्यांवर बसलेला दिसला आणि एक मुलगी ढमढम वाजवत बसलेली दिसली. मला वाटलं, असंच काही तरी केलं तर आम्हा श्वानांच्या मागण्या पूर्ण होतील. आणि मी कामाला लागलो. मी जेनीला हाताशी घेऊन रस्त्यावरच्या सर्व श्वानांना गोळा केलं. नुकत्याच कापलेल्या झाडाच्या बुंध्यावर मी चढून उभा राहिलो. त्या डब्यावर चढलेल्या श्वानाची आठवण झाली. मी कोणीतरी खूप मोठा असल्यासारखं वाटू लागलं मला. इतक्यात बंडू तोंडात एक पत्र्याचं डबडं घेऊन आला. बंडू खूपच हुशार श्वान! सबंध दिवस रस्त्यावर भटकत रहात दिसेल त्या पिशवीत तोंड घालणे हेच त्याचं काम. त्यानं एक एक करत २/३ मोठी डबडी आणली.
जवळच्या झाडावरून कावळे कुतूहलाने खाली पाहत होते. त्यांनी खाली टाकलेल्या काडय़ांमुळे डबडी वाजतात हे कळलं. गल्लीतील मुले जमा झाली. मग काय मज्जाच मज्जा! लगेच बरीच डबडी गोळा झाली आणि वाजू लागली. मी भुंकू लागलो. मुलांनी आणि आम्ही श्वान मंडळींनी मिळून भुंकून आणि डबडी वाजवून भरपूर आवाज केला. आवाज नाही केला तर आम्हाला काय हवं ते कळणारच नाही लोकांना!
आवाजामुळे हैराण होऊन सबंध गल्लीतून काठय़ा घेऊन आपापल्या घरातून माणसं बाहेर आली.
‘‘ या श्वानांनी नुसता उच्छाद मांडलाय. उचला आणि नदीत बुडवून टाका यांना.’’ देशपांडे काका म्हणाले.
‘‘हो ना. देशपांडे तुमचं अगदी बरोबर आहे.’’ इतरांनी पुस्ती जोडली.
ते ऐकून मम्मा आणि टीना आंटी भडकल्या. ‘‘तुम्ही सगळे असेच आहात त्यांना काही तरी सांगायचं असेल ते तरी आधी ऐकून घ्या.’’ दोघी एकाच सुरात म्हणाल्या. झाडावरून पोपटांचा कर्कश्श आवाज चालूच होता. त्यात काव काव, चर चर असे अनेक आवाज मिसळून गेले. पक्ष्यांनीही आमच्या या आंदोलनात रस घेऊन आपापल्या परीने पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला.
मी झाडाच्या कापलेल्या बुंध्यावर बसून सिंहासनावर बसल्यासारखा इकडे तिकडे बघत होतो. आंदोलन मीच सुरू केलं होतं तरी आमच्या मागण्या कशा मांडायच्या तेच मला समजत नव्हतं. मागण्या बाजूलाच राहिल्या आणि श्वान विरुद्ध माणसं असंच युद्ध सुरू झालं.
इतक्यात Red Star ची श्वानांना मदत करणारी गाडी तिथे पोहोचली आणि माणसांमधलं भांडण वाढलं.
गाडी थांबली आणि दोन माणसं त्यातून उतरली. बंडू आणि जेनी रस्त्यावरचे श्वान होते, त्यामुळे त्यांनी त्यांची गाडी ओळखली. जेवण मिळायचं ना त्यांना त्यांचाकडून! एका मिनिटात रस्त्यावरचे सगळे श्वान त्यांच्याभोवती जमा झाले. मी भराभर सगळे डबे एकावर एक रचून घेतले आणि त्यावर पुढचे दोन पाय ठेवून उभा राहिलो. त्याशिवाय आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत अशी माझी, तो व्हिडीओ पाहिल्यापासून समजूत होती.
मागणी- १. आम्ही रात्री खूप भुंकतो म्हणून आमच्यावर दगडफेक होते ती थांबवावी.
२. गल्लीत सर्व श्वानांसाठी किमान दोन-तीन ठिकाणी जेवणाच्या ताटल्या ठेवाव्यात. अन्न रस्त्यावर टाकून देऊ नये.
३. आम्हाला काही शारीरिक व्याधी झाल्यास उपचार करावेत. ‘‘शी घाणेरडे श्वान नुसते,’’ असं म्हणून आम्हाला झटकू नये.
आम्ही काय म्हणतोय ते Red Star वाल्यांना समजत होतं.
चौथी मागणी सांगायच्या आत आमच्या गल्लीत श्वानप्रेमी विरुद्ध श्वान द्वेष्टे अशी हमरातुमरी रंगली. आम्हाला तिथेच सोडून आमच्या मागण्या पूर्ण न ऐकता Red Star वालेही माणसांच्या भांडणात सामील झाले.
तेवढय़ात झाडावरून कावळ्यांच्या तोंडातून पडलेल्या हाडासाठी सगळे श्वान पळाले. माणसं भांडतच राहिली. मीही गुपचूप घरात जाऊन बसलो.
टीना आंटी आणि मम्मा बडबडत होत्या, ‘‘सगळे नुसतं स्वत:पुरतं पाहतात. प्राण्यांविषयी दयामाया म्हणून नाही यांना. ‘‘Let’s have some tea’’ असं म्हणत त्या घरात गेल्या. ‘‘हे सगळं आमच्या ब्रँडोमुळे हो. त्यानं आवाज उठवला म्हणून आता हे Red Star वाले काहीतरी या श्वानांसाठी करतील असं वाटतय.’’ मम्मा चहाचे घुटके घेत म्हणाली.
मीही मान जमिनीवर ठेवून साळसूदपणे ते सर्व ऐकून घेतलं. थोडय़ाच वेळात आमच्या मागण्या काय होत्या तेही मी विसरलो.
vidyadengle@gmail.com