माझ्या छोटय़ा मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे की नाही कल्पना नाही, मात्र तुम्ही जेव्हा आम्हा मोठय़ांशी बोलता तेव्हा आम्हाला फार मजा वाटते. तीन-चार ते अगदी पंधरा-सोळा वय वर्षांचे तुम्ही जेव्हा ‘माझ्या लहानपणी ना..’ अशी सुरुवात करता तेव्हा आम्हाला खूपच धम्माल येते. तुमच्यासोबतच आम्ही लहान होतो, आणि तुम्ही लहानग्यांनी तुमच्या चिमुकल्या लहानपणाविषयी लाघवीपणे सांगितलेल्या गोष्टी ऐकायला, त्या गोष्टी सांगणाऱ्या तुमचा श्रोता व्हायला आम्हा मोठय़ांना फारच आवडतं. आम्हा मोठय़ांमधले काही तसे मोठे होतच नाहीत, त्यांना तर तुमच्या या गमतीजमतीने भरलेल्या आयुष्याची फारच मजा वाटते, आम्ही मग तुमचे मित्र-मैत्रिणी होतो.
तुमच्यासारखाच हे माझे लेख वाचणारा माझा एक मित्र आहे. तो दोन-तीन महिने वयाचा असल्यापासून आमची गट्टी आहे. ‘हा लेख लिहिलेला श्रीपाद आहे तो माझा मित्र आहे,’ शाळेत जाऊन असा भाव खायला त्याला मनापासून आवडत असलं तरी माझ्याविषयी त्याची एक ठाम समजूत आहे- ‘तू शाळेत कुठे जातो? तुला काही कळत नाही.’
तुम्हाला एक सांगतो, या मित्राशी फोनवर बोलतानाच मला हा साक्षात्कार झाला, की त्याच्या बाबाने त्याच्याकरिता आणलेली नवी कोरी लाल रंगाची रेल्वेगाडी मला फोनवरूनही दिसू शकते. बोलताही येत नाही त्या वयापासून आता पाचवी-सहावीच्या यत्तेपर्यंतही या माझ्या मित्राला फोनवरून बोलताना मला पलीकडचं दिसतं असं मनापासून वाटतं.
पुढे हा माझा दोस्त बालवाडीत गेला. अक्षरओळखीच्या तोंडी परीक्षेत बाईंनी त्याला सुरुवातीला ‘ब’, ‘क’, ‘अ’ अशी अक्षरं विचारली. त्याची हुशारी आणि चटपटीतपणा एव्हाना ओळखीचा झालेल्या बाईंनी त्याला ‘झ’ हे अक्षर काढून ओळखायला सांगितलं. आमच्या या पिंटय़ाला ते काही ओळखता आलं नाही. आपली हार मान्य न करता मोठय़ा आत्मविश्वासाने तो बोबडय़ाने म्हणाला, ‘बाई, तुमचं अश्शर नीट नाईए. नीट गिडवा. मग मला पट्टन येईल.’ पुढे पहिली-दुसरीत असतानाही त्याने एका परीक्षेत दात या शब्दाचं अनेकवचन कवळी असं लिहिलं होतं आणि आईने त्याबद्दल रागावल्यावर मोठय़ा रागाने त्याने आईची तक्रार माझ्याजवळ केली होती.
बालपणाची आणि तुमच्यासारख्या छोटय़ा दोस्तांची जादूच अशी आहे, की त्यातून अगदी भलेभलेही सुटलेले नाहीत. पु.ल. देशपांडय़ांपासून ते विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, दुर्गाबाई भागवत यांसारख्या मराठीतल्या दिग्गज साहित्यिकांनी खास लहान मुलांकरिता पुस्तकं लिहिली. आपल्या आजूबाजूच्या छोटय़ा दोस्तांसोबतच्या आठवणी आणि अनुभवांना आपल्या शब्दांत उतरवून अजरामर करून टाकलं. पुलंचा दिनू, दुर्गाबाईंनी त्यांच्या नातीवर लिहिलेला ललितलेख अशा अनेक साहित्यकृतींमधून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत असता.
गेल्या दिवाळीत असंच एक धम्माल पुस्तक हाती पडलं. दोन दिवसांत मी ते वाचूनही काढलं. या पुस्तकात एका माँटू नावाच्या चिमुकल्याची गोष्ट आहे.. छोटय़ा छोटय़ा, अगदी एक-दोन पानांच्या पिटुकल्या प्रकरणांतून, एकेका किश्श्यातून या माँटूच्या लाघवी जगातला आपला प्रवास होतो. तुमच्यातल्या थोडय़ा मोठय़ा दोस्तांना हे वाचायला आवडेल, त्यांना आपल्या लहानपणाच्या दिवसांत डोकावायला मिळेल. लहानग्यांना मात्र माँटूच्या रूपाने एक छान सवंगडी मिळेल. त्यांना या गोष्टी वाचून दाखवताना मोठय़ांना त्यांच्या चिमुकल्यांच्या अनेक अनुभवांची आठवण झाल्यावाचून राहाणार नाही.
हे पुस्तक तुम्हा छोटय़ा दोस्तांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेलं नाही. आता तुमच्याच गोष्टी तुम्हाला काय सांगायच्या नं? पण तरी देखील हे पुस्तक तुम्हाला रंजक आणि आनंददायी वाटेल हे नक्की. हे पुस्तक अगदी सोप्या शब्दांत, छोटय़ा छोटय़ा वाक्यांत, बोली भाषेत आहे. लेखकाच्या मोठेपणाची कल्पनाही येत नाही. शिवाय प्रत्येक छोटय़ा प्रकरणात अतिशय सुबक, बोलकी आणि चित्तवेधक रेखाचित्रे आहेत. या चित्रांतून साकारलेला माँटू तर इतका गोड आहे की त्याची तुलना फक्त तुमच्या आवडत्या चिंटू किंवा डेनिस द मेनस किंवा केविन अॅण्ड हॉब्स्मधल्या केविन आणि त्याच्या वाघोबाशीच होऊ शकते.
संदेश अर्थात या पुस्तकाचा लेखक आणि माँटूचा मित्र या दोघांनी इमारतीतल्या जिन्याच्या पायऱ्यांवर बसून केलेला ट्रेनचा प्रवास असो, माँटूने भिंतीवरच्या डागाळलेल्या रंगाकडे बोट दाखवत त्या ठिकाणी कल्पनेने खोललेली रेल्वेच्या डब्यातली खिडकी असो, आणि संदेशने त्या खिडकीतून पाहिलेल्या अनेकविध गोष्टी असोत.. त्याला तोड नाही. चिमुकल्या कल्पनाशक्तीची अचाट उडी, त्यातली नितांतसुंदर निरागसता, अपार कुतूहल आणि सहजसोपेपणा वेड लावतो. या प्रवासात आपण केव्हा सामील होतो आणि हा प्रवास फारच लवकर संपला म्हणून कसे खट्टू होतो हे आपल्याला देखील समजत नाही. आणि पुढे कोणती माँटूकली गंमत वाचायला मिळणार या उत्सुकतेने पुढच्या पानाकडे वळतो.
मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही वाचाच! ही एक आनंदाची कुपी आहे. एक गुपित आहे. जसजसं मोठं होत जातो तसतसं आपण शिकतो. मात्र, त्यांत बाहेरून शिकलेल्या गोष्टी असतात आणि बऱ्याचदा त्या आपल्याला कोतं करतात. मुलगा असल्यामुळे मुलींसारखा रडत नाही. मुलगी असल्याने मुलांसारखी आपल्या हक्कांकरिता न भांडता उगी राहायला शिकते. थोडक्यात काय, तुम्ही स्वच्छंद, आनंददायी, सहज, निरागस मुलं गंभीर, अहंकारी, संकुचित मोठी माणसं होता. आपल्यातल्या या माँटुकल्या दिवसांना जपत-जोपासतच मोठं होण्यातली गंमत तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल, ती चुकवू नका.
हे पुस्तक कुणासाठी? मोठं होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येक छोटय़ा दोस्तासाठी.
पुस्तक : माँटुकले दिवस
लेखक : संदेश कुलकर्णी
मनोविकास प्रकाशन
श्रीपाद- ideas@ascharya.co.in
पुस्तकांशी मैत्री : स्वप्नांची खरी दुनिया..
बालपणाची आणि तुमच्यासारख्या छोटय़ा दोस्तांची जादूच अशी आहे, की त्यातून अगदी भलेभलेही सुटलेले नाहीत.
आणखी वाचा
First published on: 08-05-2016 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dream world is the real world