पांडवांच्या वनवासाच्या काळातली ही गोष्ट! राजा धृतराष्ट्र हस्तिनापुरावर राज्य करीत होता. त्यामुळे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याच्याच हातात राज्यकारभार होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. याच काळात महर्षि दुर्वास एकदा अचानकपणे कौरवांच्या दरबारात आले. ते जरी आगंतुकपणे आले होते तरी दुर्योधनानं त्यांचा यथास्थित आदरसत्कार केला. त्यांची स्नानसंध्या, भोजन, निद्रा यासाठी उत्तमोत्तम अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे दुर्वास मुनी एकदम तृप्त झाले आणि संतुष्टतेने दुर्योधनाला म्हणाले, ‘‘मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुला पाहिजे तो वर माग.’’ यावर दुर्योधन मनातल्या मनात आनंदून गेला. पांडवांना तोंडघशी पाडण्यासाठी या संधीचा उपयोग करायचा ठरवून तो खोटय़ा नम्रतेनं म्हणाला, ‘‘मुनिवर, मी यथाशक्ती आपला आदरसत्कार केला. त्यामुळे तुम्ही संतुष्ट झालात ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहेच. आणि त्यामुळे माझ्या पुण्यात भर पडेल हे विशेष महत्त्वाचं! असंच पुण्य माझे बंधू पांडव यांनाही मिळावं, अशी माझी तीव्र इच्छा आहे. आपण या पुढील मुक्काम वनात राहणाऱ्या माझ्या पांडव बंधूकडे करावा व आपल्या शिष्यांसहित सर्वानी एकवेळच्या भोजनाचा पांडवांकडेही लाभ घ्यावा, एवढीच माझी इच्छा कृपया पूर्ण करा.’’ ‘तथास्तु’ दुर्वास म्हणाले. दुर्योधनाला मनातल्या मनात असुरी आनंद झाला. वनवासातले दरिद्री पांडव काही एवढय़ा लोकांची भोजन आणि आदरातिथ्याची व्यवस्था करू शकणार नाहीत आणि त्यांना दुर्वासांच्या ख्यातनाम रागाचा असा काही फटका बसेल, की पांडवांचे गर्वहरण होईलच. दुर्योधन मनात मांडे खात होता.
दुसऱ्या दिवशी दुर्वास ऋषी त्यांच्या शिष्यगणांसह पांडवांच्या पर्णकुटीत पोहोचेपर्यंत दुपारची भोजनाची वेळ टळून गेली होती. ते पोहोचता क्षणीच द्रौपदीला म्हणाले, ‘‘मुली, आधीच भोजनाची वेळ टळून गेलीय. आम्ही नदीवरून स्नानसंध्या करून येतो तोपर्यंत तू भोजनाचा प्रबंध करून ठेव.’’ एवढे बोलून ते शिष्यगणांसह नदीवर गेलेही. द्रौपदी काही बोलूच शकली नाही, पण ती पुरती गर्भगळीत झाली होती. कारण त्यांच्या पर्णकुटीत धान्याचा कणही शिल्लक नव्हता. अशा वेळी शिष्यांसह आलेल्या दुर्वासांची भोजनव्यवस्था कशी करावी या काळजीत ती पडली. शेवटी तिने भगवान श्रीकृष्णाचा आर्तपणे धावा केला. या संकटातून बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त श्रीकृष्णच आपल्याला मदत करू शकतो, हे तिला माहीत होतं. आणि काय आश्चर्य, चक्क भगवान तिथे प्रकट झाले आणि द्रौपदीकडे त्यांनी भोजनाचीच मागणी केली. ती ऐकून हतबल झालेल्या द्रौपदीने त्यांना वास्तव परिस्थिती कथन केली. ते ऐकून कृष्ण म्हणाले, ‘‘जे काही घरात असेल ते आण’’ द्रौपदीने घरभर पाहिले. पण तिला काहीच सापडले नाही. एका थाळीला भाजीचे एक छोटेसे पान चिकटलेले तिला दिसले. तेच तिने कृष्णाला खायला दिले. कृष्णाने ते खाल्ले आणि त्याचे पोट भरून तो तृप्त झाला. एवढा तृप्त झाला की, तृप्तीने एक ढेकर दिला. त्याचक्षणी स्नानासाठी गेलेल्या दुर्वास व त्यांच्या शिष्यगणांनाही पोट तुडुंब भरल्याची जाणीव झाली व ते ढेकर देऊ लागले. त्यामुळे पांडवांकडे परत येण्याचा बेत रहित करून ते पुढच्या प्रवासास निघाले. द्रौपदीने कृष्णपरमात्म्याच्या साहाय्याने संकटावर मात केली.
आजही एखादी गृहिणी घरात साधनसामग्रीची कमतरता असताना पै-पाहुण्यांचे हसतमुखाने आदरातिथ्य करून त्यांना इष्ट भोजनाने तृप्त करते; तेव्हा तिच्याकडे द्रौपदीची थाळी आहे, असे म्हटले जाते.
वाक्प्रचारांच्या गोष्टी : द्रौपदीची थाळी
पांडवांच्या वनवासाच्या काळातली ही गोष्ट! राजा धृतराष्ट्र हस्तिनापुरावर राज्य करीत होता. त्यामुळे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याच्याच हातात राज्यकारभार होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

First published on: 18-11-2012 at 05:00 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Droupadis plate