मित्रांनो, आत्ताच शाळा सुरू झाल्यात. नवं वर्ष, नवी पुस्तकं, नवा अभ्यास.. सारं काही नवंनवं. हे सगळं नवं असताना फार मजा येते नाही का! पण नव्याचे रंग नऊ दिवस असं होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. हे असं मुख्यत: घडतं ते अभ्यासाच्या बाबतीत. सगळं नवं असताना अभ्यासाचा जोरदार उत्साह असतो, पण नंतर हळूहळू तो कसा कोण जाणे, कमी कमी होत जातो आणि परीक्षेच्या वेळेला पुन्हा एकदा उफाळून येतो. यावर्षी असं होणार नाही यासाठी तुम्ही आतापासूनच सतर्क राहायला हवं. आणि या सतर्कतेसाठीच आज आपण एक छोटीशी टीप पाहणार आहोत.
फार मोठ्ठं काही मी सांगणार नाहीए हे तुम्हाला आजवरच्या या मालिकेतील लेखांवरून कळलं असेलच; पण जे काही सांगणार आहे ते सातत्याने करायची गरज आहे एव्हढंच! अनेकदा काय होतं, तुम्ही एकदम वर्षांचं अभ्यासाचं वेळापत्रक बनवता. ‘तेरडय़ाचे रंग तीन दिवस’ याप्रमाणे काही दिवस त्याचं सचोटीने पालन करता आणि असं काही ना काही घडतं म्हणजे- वाढदिवस, एखादा कार्यक्रम यांसारखं काही किंवा आजारपण वगैरेसारखं काही.. हे जे काही घडतं ते तुमच्या वेळापत्रकात खो घालतं आणि वेळापत्रक जे कोलमडतं ते कोलमडतंच. काही वेळा महिना किंवा आठवडय़ासाठी आखलेल्या वेळापत्रकाचीही अशीच वाट लागते. म्हणून काय करायचं, फक्त उद्याचं वेळापत्रक आज बनवायचं. आणि हे बनवताना आपली अभ्यासपद्धती, आपला प्राइम टाइम साऱ्याचा विचार करायचा. काही ना काही कारणाने एखाद्या दिवशी ते पाळता नाही आलं तर सोडून द्या; उद्या परत नवीन वेळापत्रक करायचं तर आहेच! आणि रोज तुम्ही त्यात वैविध्य आणू शकत असल्याने कंटाळा येण्याचा प्रश्नच नाही. काय, बरोबर आहे ना! आणि एक गंमत सांगू का, हे काही फक्त छोटय़ांसाठीच नाहीए, मोठय़ांसाठीही उपयोगी आहे. आई-बाबा, दादा-ताईही हे करून पाहतीलच. चला तर, उद्यासाठी आज तय्यार व्हा!
मेघना जोशी joshimeghana.23@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा