बरं, मी तुझ्याशी बोलत्येय. ऐकतोस ना? अंऽ आणि काय रे, बाहेरून आलास, बूट एकीकडे आणि मोजे तिसरीकडे हे चालणार नाही. गेले दोन दिवस सांगून तुझे तेच वागणे. आज तुला शिक्षा.’
इतक्यात अंबरची आजी जिन्यावरून खाली येताना म्हणाली, ‘अरे अंबर, आज तुझ्या आवडीचे बटाटेवडे केलेत, सारं तयार आहे. गरम गरम तळून देते.’
‘आई, आज अंबरला बटाटेवडे मिळणार नाहीत. त्याला शिक्षा आहे आजही.’
‘अगं सुमित्रा, पण त्याला आवडतात म्हणून तर ना बटाटेवडे..’
‘तरी आज त्याला मिळणार नाहीत. आता आजोबांकडे जायची भुणभुण सुरू करील. बाबांना आवडेल असे बेशिस्त वागणे? त्यामुळे योग्य वेळी शिक्षा हाच रामबाण उपाय आहे.’
यावर आजी तरी काय बोलणार, पण या शिक्षेचा चांगला परिणाम झाला. दुसऱ्या दिवसापासून अंबर शहाण्यासारखा वागू लागला.
‘अगं सुमित्रा, हल्ली पालक शिक्षक सभेत मुलांना शिक्षा करू नका सांगतात.’
‘सांगू देत. अंबर शहाणा व्हायला अशा छोटय़ा शिक्षेचा उगाच बाऊ करू नका. योग्य वेळी शिक्षा न झाल्याने आपण त्याचे क्षणोक्षणी परिणाम भोगतोय ना जीवनात? आई-बापांचे मुलांवर प्रेम असते. अघोरी शिक्षा नाही करत ते. एखादा व्यसनी, अविचारी पालक करीत असेल अशी शिक्षा, पण तो अपवाद असतो. योग्य ती शिक्षा मुलाला योग्य वेळी द्यायलाच हवी आई.
आजी मात्र खट्टू झाल्या. अंबरची गाडी दोन दिवसांवर रुळावर आली. त्या दिवशी अंबर शाळेतून आला आणि कोकणातून आजोबांचा फोन आला. अंबरने फोन घेतला.
‘आजोबा, मी येतो वेळणेश्वरला’.
‘त्यासाठी तर हा फोन. यंदा एक जमाडी-जम्मत आहे तुझ्यासाठी.’
‘सांगा ना.’
‘आता नाही बाबाऽ. इथे आल्यावरच कळेल.’
‘आजोबा एक विचारायचंय. माझा मित्र राकेशलाही यायचंय..’
‘मग घेऊन ये त्याला.’ आजोबांचा होकार ऐकल्यावर अंबर खूश झाला. दोघे खूप चांगले मित्र होते.’
आईने राकेश आणि अंबरला एस.टीत बसवून दिले. सायंकाळी पाचला आजोबा स्टँडवर हजर.
‘आजोबाऽ, इथे रिक्षा आहेत ना?’
‘आहेत, पण आपण चालत जाऊ. दोन मिनिटांवर घर आहे आणि तुमच्याकडे तर छोटी एकेक बॅग. चला उचला सामान.’
राकेशला काही बॅग उचलता येईना. शेवटी आजोबांनी एका बाजूला धरले व तिघांची स्वारी घरी आली. आजोबांनी राकेशकडे पाहिले. अंबरच्याच वयाचा तर राकेश. काय हे पाप्याचं पितर! त्यांनी अंबरकडे पाहिले. छान उंची, उत्तम तब्येत त्यामुळे अंबर किती सतेज दिसत होता.
राकेशने दोन पिशव्या काढून आजोबांच्या हातात दिल्या. वा ‘वा’ हा खाऊ का? आजोबांनी दोन्ही पिशव्या कोनाडय़ात ठेवून दिल्या. आजीने छान गोडाचा शिरा केला होता. अंबरने लिंबाच्या लोणच्याबरोबर शिरा भरपूर खाल्ला. राकेशने मात्र तोंड वेडेवाकडे करीत खाल्ले.’
‘अरे तुला आवडत नाही.’
‘त्याचे काय आहे आजोबा. आमच्या घरी पारूबाई आहे ना ती छान न्युडल्स करून मला देते. मलापण येतात. मला भूक लागल्येय. मी करू का?’
आजोबांना नाही म्हणवले नाही. राकेशने न्युडल्स केल्या आणि खाल्ल्या. रात्री राकेश फार जेवलाच नाही. मुलं झोपून गेली.
सकाळी सहा वाजता आजोबांनी उठवले. राकेश काही पटकन उठेना. शेवटी उठला.
‘चला वेळोबाच्या देवळात. तिथे मुले रोज सूर्यनमस्कार घालतात?’
अंबरला हे सारं सरावाचं होतं. राकेशने कसे-बसे चार नमस्कार घातले आणि तचो फाऽफू करीत बसला. आजोबांनी ठरविले पाहुणा आलेल्या राकेशला फार शिक्षा नको. पाहू या नंतर.
आजोबा राकेशला ‘सारं खावं, भाजी, कोशिंबीर, आमटी-भात, दोन तरी पोळ्या. असं सारं खायला लाग. मग पाहा जादू.’
आजोबा असा उपदेश करायला लागले की, राकेश जांभया देत झोपी जायचा. राकेश, अंबर दोघेही झोपले. आजोबाही झोपले. राकेश काहीतरी बडबडत कुशीवर वळला. आजोबा म्हणाले, ‘स्वारी स्वप्न पाहत्येय बहुधा’. पुढचा निळा पडदा सरकत होता. फ्रीजमधून मुळा बाहेर आला आणि त्याने दाणकन राकेशला टप्पू मारली. मुळा म्हणाला, ‘काय रे राकेश मी, माझा भाऊ गाजर तुला एवढे कारे नको? आईने गाजराची कोशिंबीर केली. माझी कोशिंबीर केली तर तू पानात टाकून देतो. जातो आम्ही बाबा. मुळा आणि गाजर हातात हात घालून गेली. राकेशला धुरकट दिसू लागले. कुठून तरी आवाज आला. आम्हाला दूर लोटल्यावर असंच होणार. इतक्यात शेवग्याची शेंग दाणकन राकेशच्या पाठीत बसली. झोपेतच ‘ओय ओय’ करीत तो कुशीवर वळला. शेजारी आजोबा हसले. ‘स्वारी स्वप्नात रंगली वाटतं.’ इतक्यात टोमॅटो, बटाटे, बीट आले आणि राकेशच्या पाठीवर सटासट आपटू लागले. फ्रीजमधून शेपू, चवळई, लाल माठ, करडई, पालकदादा ही मंडळी आली, राकेशकडे पाहात रागारागाने निघून गेली. आमच्याशी वैर केल्याने तुझ्या हातापायाच्या काडय़ा झाल्यात. हे कोण बोलतंय? तुझी ताई बघ सारं खाते. कबड्डीची कॅप्टन आहे ती!
राकेशच्या पायातले जणू त्राणच गेले. त्याच्या समोरच्या आरशात त्याने पाहिले. हातापायाच्या काडय़ा, डोळ्याने धुरकट दिसतंय. पोटाचा नगारा. झोपेत त्याला दरदरून घाम फुटला. तो ओरडू लागला.
आता मी सारं खाईन, वांगी खाईन, घेवडा खाईन. साऱ्या भाज्या खाईन.
आजोबांनी हलवून राकेशला उठविले. राकेश झोपेतून जागा झाला.
‘अरे राकेश स्वप्न पडलं का तुला?’
‘स्वप्न! स्वप्नच होते. आजोबा या फ्रीजमधले सारे माझ्यापुढे आले. मला शिक्षा झाली. मला धुरकट दिसू लागले आणि काय काय! पण किती भ्यायलो मी. आजोबा मी आता सारं खाईन. मला न्युडल्स नको. पास्ता नको.’
‘राकेश, एखाद्या वेळी या गोष्टी खायला हरकत नाही. पण फार क्वचित, हे पूर्ण अन्न नव्हे.’
‘आजोबा पूर्ण अन्न म्हणजे काय?’
आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नग्रहणाला यज्ञ म्हणतात. भूक लागणे म्हणजेच अग्नी प्रदीप्त होतो, आपल्या ऋषीमुनींनी आपल्या जेवणाची उत्तम पद्धत सांगितलीय. ताजं अन्न महत्त्वाचं. वरणभात, तूप, लिंबू, दोन भाज्या, रुचीला चटणी, कोथिंबीर, दही, दूध पोळी किंवा भाकरी असे रोज जेवले की डॉक्टरकडे जावं लागत नाही. प्रत्येक देशात वेगवेगळी पिके, फळे, येतात, पण प्रत्येक देशातील माणूस आपल्या आरोग्यासाठी योग्य आहार घेतो. राकेशला सारं पटलं होतं. सकाळ झाली. राकेशच म्हणाला- ‘आजोबा चला वेळोबाच्या मंदिरात. मी आजपासून सूर्यनमस्कार घालणार आहे.’
आजोबा खुशीनं हसले.
सुट्टी संपल्यावर राकेश आणि अंबर पुण्याला आले. राकेशच्या आई-बाबांना राकेशला पाहून आनंद झाला. ‘राकेश आंबे भरपूर चापलेले दिसतात’.
बाबा आंबे चापले. आजोबांनी आम्हाला वेळू म्हणजे बांबूपासून छान वस्तू शिकविल्या. आता मी दरवर्षी जाणार वेळणेश्वरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा