मागे आपलं ठरल्याप्रमाणे मस्तपकी चाललंय ना? वेगवेगळे आवाज ऐकू आले की नाही? हो, हो.. एवढा दंगा करू नका. आवाज ऐकू आले हे समजलं मला. त्यांच्यामधला फरकही लक्षात यायला लागला आहे ना आता बऱ्यापकी?  आणि आपल्या आसपास कित्येक असे आवाज असतात, की जे आपल्या लक्षातही येत नाहीत पटकन, हेही लक्षात आलं असेलच. आता आपण त्यापुढली पायरी सुरू करू. परत वही-पेन वगरे सुरुवात झाली तुमची. अरे यार, एवढं कसं लक्षात ठेवत नाही तुम्ही? सध्या सुट्टी आहे की नाही तुम्हाला.. तशीच वही, पेन, दप्तर आणि वॉटरबॅगलाही सुट्टी! त्यामुळे ते शोधू नकाच मुळी!
..तर आता पुन्हा मागच्यासारखंच करायचं. डोळे घट्ट, पण अलगद मिटायचे. पुन्हा आवाज टिपायला लागायचं. कसले कसले आवाज येतायत की नाही. मोबाइल, गाडय़ा, वेगवेगळी मशिन्स, टीव्ही, मायक्रोवेव्ह, फ्रिज.. फ्रिजचाही केवढा आवाज असतो, समजलं की नाही? बरोबरच माणसांच्या बोलण्याचे, कबुतर, कावळा, चिमणी, गायीगुरं वगरेंचे आवाजच आवाज लक्षात यायला लागलेत ना. काय म्हणता? तुम्हाला यापेक्षाही अधिक आवाज ऐकू आलेयत. अरे, तुम्ही आहातच ना हुशार. मग येणारच तुम्हाला. आता काय करायचं? त्या आलेल्या आवाजांपकी माणसांच्या आणि पक्षी-प्राण्यांच्या म्हणजे थोडक्यात, सजीवांच्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे ते आवाज मनापासून ऐकायचे. त्या आवाजावरून आता ती व्यक्ती किंवा तो पक्षी-प्राणी यांचा मूड लक्षात येईल तुमच्या. म्हणजे एखाद्या हाकेतली आपुलकी, समजावण्यातली माया, एखादी गोष्ट शेअर करण्यातला आनंद, ओरडण्यातला राग, भांडणातली चीड, सांगितलं जाणारं दु:ख, कोणा एका व्यक्तीबाबतची कणव, चिडल्यावर होणारा संताप संताप, अगतिकतेतून येणारी निराशा, मनस्तापातून होणारा त्रागा इ. इ. मूड टिपता येतील तुम्हाला. एखाद्या मूडला तुम्हाला नाव नाही देता येणार कदाचित, पण त्या व्यक्तीच्या भावना नक्की अनुभवू शकाल. ही सुरुवात करताना घरातल्या आई-आजीपासून करा. घरातल्यांचा मूड चटकन लक्षात येतो की नाही? मग हळूहळू घराबाहेर कान द्या. म्हणजे बघा हं, आईचा आवाज ऐकूनच आता आइस्क्रीमची फर्माईश करायची की नाही हे ठरवता येईल तुम्हाला. ओरडा खाण्यापेक्षा हे बरं की नाही? तेच प्राण्यांबाबत. कावळा, मांजर, कुत्रा, गायीगुरं यांचे भूक लागल्यावरचे, मित्रांना बोलावतानाचे, खाणं मिळाल्यावरचे, मागणी करतानाचे असे अनेक आवाज तुम्हाला वेगवेगळे करता येतील. मग काय, केलीय ना सुरुवात लगेचच..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा