मित्रांनो, तुम्हाला कार्टून्स बघायला आवडतात ना? त्यातील पात्रं, त्यांचे विशिष्ट आवाज, त्यांच्यातील संवाद आणि त्यांची गोष्ट तुमच्या पक्की लक्षात राहते, हो की नाही? जर तुम्हाला विज्ञानातल्या वेगवेगळ्या संकल्पना अशाच कार्टूनच्या माध्यमातून बघायला आणि शिकायला मिळाल्या तर?
http://www.makemegenius.com ह्या साइटवर विज्ञानातील विविध संकल्पना अतिशय मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितल्या आहेत. ही साइट मुख्यत्वे ५ ते १२ वयोगटासाठी बनवलेली असली तरी त्यातील व्हिडीओ सर्वानाच आवडतील असे आहेत.  शाळेत प्रवेश घेतल्यापासून विज्ञान हा विषय आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिकण्यास सुरुवात करतो. बालवाडीपासूनच सजीवांचे अवयव, वनस्पतींचे भाग आपण शिकायला सुरुवात केलेली असते. सजीव-निर्जीव, पदार्थाच्या अवस्था इथपासून साधी यंत्रे, मूलद्रव्ये, अणू इत्यादी तसेच संयुग-मिश्रण म्हणजे काय?, न्यूटनचे गतीचे नियम इत्यादी बरेच काही आपल्याला शिकवले जाते. हे शिकत असताना काहींना या विषयाची गोडी लागून विषय आवडीचा बनून जातो. तर काहींना तो अवघड वाटून मनात भीती निर्माण होते. ह्या साइटवरील व्हिडीओ बघून या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर ज्यांच्या मनात भीती आहे ती नक्की पळून जाईल अशी खात्री वाटते. ह्या साइटवर १५० पेक्षाही अधिक व्हिडीओ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. तसेच त्यातील बरेचसे व्हिडीओ हिंदी भाषेतही उपलब्ध आहेत. व्हिडीओमध्ये समजावून सांगितलेल्या संकल्पनांवर आधारित विज्ञान तसेच सामान्य ज्ञानावर ३५ पेक्षा अधिक प्रश्नमंजूषा आहेत. फुटबॉलचा बॉल कसा बनतो, साखर कारखान्यात साखर कशी तयार होते यांसारख्या गोष्टी जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला या साइटवर मिळू शकतात. तसेच मुलांना सहजपणे करता येणारे प्रयोग, प्रोजेक्टदेखील उपलब्ध आहेत. मनोरंजनातून विज्ञान शिकवणारी ही साइट आहे, असं म्हणायला हरकत नाही.                               

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा