आजकाल बाजारात रेअर-अर्थ मॅग्नेट्स म्हणजेच निओडायमियम मॅग्नेट्स हे अत्यंत प्रबळ असे लोहचुंबक विविध आकारांत उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करून एक गमतीदार प्रयोग येथे देत आहे.
साहित्य – १) कॅडबरी जेम्सचा (किंवा तत्सम) गोल रिकामा चेंडू ज्याचा व्यास सुमारे ७ सें.मी. असतो व तो सहजपणे दोन भागांत सुटा करता येतो.
२) आयताकृती काटछेदाचा अ‍ॅल्युमिनियमचा पोकळ पाइप (दोन नग) २४ ७ १२ ७ १६५ मि.मि. आणि २४ ७ १२ ७ ३३० मि.मि.
३) ५ मि.मी. जाडीचा थर्माकोल सुमारे ३०० ७ ३०० मि.मी.
४) दंडगोलाकार प्रबळ लोहचुंबक १३ मि.मी. व्यास आणि १० मि.मी. लांबी (२ नग)
५) पांढरा सनमायका चिकटवलेला लाकडी बोर्ड (जो सामान्यत: िभतीवरील इलेक्ट्रिक फिटिंगसाठी वापरतात) २०० ७ १४५ ७ ५० मि.मी.
६) नायलॉनचा मजबूत धागा. (३० सें.मी.)
७) लाकडी पट्टी (४ नग) २१ ७ १० ७ ६० मि.मी.
८) लाकडी गोल ठोकळा. १०० मि.मी. व्यास आणि १५ मि.मी. जाडी.
९) नट, बोल्ट, स्क्रू, मेटल राइट अँगल इ.
कृती – १) प्रथम एका लाकडी पट्टीला (२१ ७ १० ७ ६० मि.मी.) एका टोकापासून सुमारे १३ मि.मी. अंतर सोडून १३ मि.मी. व्यासाचे आरपार भोक पाडा. (आकृती १) या भोकात एक प्रबळ लोहचुंबक घट्ट बसवून दोन्ही बाजूंनी सेलोटेप लावा. नंतर ही पट्टी आयताकृती पोकळ अ‍ॅल्युमिनियम पाइपमध्ये घट्ट बसवा.
२) या पाइपला दुसरा अ‍ॅल्युमिनियम पाइप काटकोनात जोडा व हा काटकोन लाकडी बोर्डाच्या एका कडेला घट्ट बसवा. (आकृती २ व छायाचित्र पाहा.) यासाठी नट-बोल्ट, स्क्रू, मेटल राइट अँगल, लाकडी पट्टय़ा इ. साहित्य वापरा. लाकडी पट्टी अ‍ॅल्युमिनियम पाइपच्या आत घट्ट बसविणे थोडे कठीण जाते. यासाठी जाणकारांचे मार्गदर्शन घ्या.
३) गोल चेंडूच्या एका अर्धगोल भागात एक प्रबळ लोहचुंबक सेलोटेपचा उपयोग करून घट्ट चिकटवा. (आकृती ३ पहा.) चुंबक अशा प्रकारे ठेवा की वरच्या पाइपमधील चुंबक व चेंडूतील चुंबक यामध्ये आकर्षण बल असेल. यासाठी त्यांचे विजातीय ध्रुव समोरासमोर असणे आवश्यक आहे.
४) दुसऱ्या अर्धगोलाच्या मध्यभागी एक बारीक भोक पाडून त्यातून नायलॉनचा धागा बाहेर काढा. धाग्याच्या आतील टोकाला मजबूत जाड गाठ मारून तो धागा खेचूनही बाहेर निघून जाणार नाही अशी व्यवस्था करा.
५) प्रबळ चुंबक चेंडूच्या आतमध्ये जागचा हलू नये यासाठी संपूर्ण चेंडू एखाद्या हलक्या, पण घन पदार्थाने पूर्ण भरणे आवश्यक आहे. यासाठी थर्माकोलच्या विविध व्यासांच्या ५ मि.मि. जाडीच्या चकत्या दोन्ही अर्धगोलांत घट्ट बसवा आणि मग दोन अर्धगोल एकमेकांना घट्ट चिकटवा.
६) एका गोल लाकडी ठोकळ्याच्या मध्यभागी आरपार लहानसे भोक पाडा. (१ मि.मी. व्यास) ठोकळ्याच्या खालच्या बाजूला भोक थोडे मोठे करून एक छोटासा खड्डा तयार करून ठेवा. आता भोकातून नायलॉनच्या धाग्याचे टोक घालून खाली गाठ मारा. धाग्याची लांबी अशा प्रकारे ठेवा की, चेंडू त्या ठोकळ्याच्या वजनामुळे व चुंबकांमधील आकर्षण बलामुळे हवेत तरंगत राहील.
झाले तुमचे मजेशीर खेळणे तयार!
तरंगणारा चेंडू व वरचा पाइप यामध्ये सुमारे २० मि.मी. अंतर निश्चित करता आले तर तुमचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.
आता दोन चुंबकांच्या मधील जागेतून एक-एक करून पुढील वस्तू आर-पार घालून पाहा.
१) जाड कागद  २) जाड पुठ्ठा  ३) सनमायका ४) प्लायवूड  ५) बेकेलाइट शिट  ६) सीडी ७) सपाट आरसा  ८) अ-चुंबकीय धातूंचे जाड पत्रे उदा. तांबे, पितळ, जस्त, अ‍ॅल्युमिनियम इ. तुमच्या निरीक्षणांची जाणकारांशी चर्चा करा.

Story img Loader