मराठीच्या पायल तांबेबाई वर्गात आल्या आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना विचारलं, ‘‘बागेची आवड कोणाकोणाला आहे?’’

हे ऐकून आम्ही उठून उभे राहिलो आणि हातही वर केला. बाईंनी आम्हा सगळ्यांना आपल्या शाळेच्या गच्चीवर बाग फुलवण्याची कल्पना मांडली आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर गच्चीवर गेलो. त्यांच्यासोबत मैत्रेयी केळकरबाई होत्याच. त्यांना फुलझाडांविषयी खूपच माहिती असते. त्याविषयी त्या आम्हाला वर्गात सांगतही असतात. गच्चीवर गेल्यावर बघतो तर काय, शाळेच्या गच्चीवरचे पत्रे काढले होते, त्यामुळे खूपसा सूर्यप्रकाश येत होता. बाई म्हणाल्या, ‘‘इतका चांगला सूर्यप्रकाश वाया का घालवायचा? मी तुम्हाला कचऱ्यापासून खत तयार करायला शिकवीन. आपण इथे छान बाग फुलवू.’’ आम्हीही आनंदाने बाईंना होकार दिला. पण आम्ही विचारात पडलो, कचऱ्यापासून खत कसं काय तयार करायचं आणि त्यापासून बाग कशी फुलवायची? ओल्या कचऱ्यात झाडं लावली तर ती मरतात. आम्हाला तर सगळं काम जून महिन्यातच सुरू करायचं होतं. मग आम्ही विचार केला, अजून पाऊस पडायला तर सुरुवात झालेली नाही, तोपर्यंत शाळेतल्या मैदानावरचा पालापाचोळा गोळा करू. तो वाळलेला पानांचा सगळा कचरा कुंडीत भरू, माती, खत घालू आणि त्यात भाज्या लावू. आम्ही साधारण ७५ वाळलेला कचरा कुंड्यांमध्ये भरला आणि वर थोडीशी माती आणि कोकोपीट टाकलं.

पायलबाई आम्हाला कम्प्युटर शिकवणाऱ्या नीलम कात्रेबाईंकडे घेऊन गेल्या. त्यांनी इंटरनेटवरून देशी बिया कशा मागायच्या ते दाखवलं. अगदी कमी पैशांत आम्हाला बिया मिळाल्या. त्यात लाल भोपळा, कारली, दोडकी, दुधी भोपळा यांच्या बिया होत्या.

विज्ञानाच्या शिक्षिका प्रियंका तळेकरबाईंनी आम्हाला बी कसं रुजत घालायचं ते शिकवलं. आम्ही अगदी तसंच केलं. बी छान रुजलंही. सुरुवातीला दोन पानं आली. मला तर ‘प्रगटली दोन पानं, जशी हात ती जोडून’ या बहिणाबाईंच्या कवितेतील ओळीच आठवल्या.

गच्चीवर कारल्याचा, दुधी भोपळ्याचा वेल होता, त्यांना आधार हवा होता. आम्ही शाळेच्या भोवती असलेले बांबू आणि एक शाळेत पडलेली जाळी गच्चीवर घेऊन आलो आणि ते बांबू उभे करून त्यावर जाळी लावली. जाळीवर वेल पसरला. चाळीस दिवसांनंतर आम्हाला एक-दोन कारली, घोसाळी लागली होती. केळकरबाईंच्या मदतीनं खताचीसुद्धा माहिती करून घेतली होतीच. झाडांना खत कसं आणि कधी घालायचं, याची सगळी माहिती त्यांच्याकडून घेतली. खत दिल्यावर मोठी घोसाळी यायला लागली. त्याची खूप मज्जा वाटली. मग हॅन्ड पॉलिनेशन करायला शिकलो. आता आम्ही सगळे घरून कचरा घेऊन येतो. शिक्षकही आणतात. तो कचरा कंपोस्ट बीनमध्ये टाकतो आणि कचरा आणणाऱ्या सगळ्यांना आम्ही शाळेच्या बागेतली भाजी देतो. स्वत:च लावलेली, वाढवलेली भाजी तोडायला आणि वाटायला खूप मज्जा येते. आता आम्ही आमचे विज्ञानाचे काही धडेही शाळेच्या गच्चीवर बसून शिकतो. आमच्या शाळेची बाग छोटी आहे, पण सुंदर आहे. आमची बाग बघायला तुम्ही नक्की या!

– सई पाटील गायकवाड, सान्वी साळसकर, तेज जानी, त्वेशा पटेल, पर्व कुबाडिया, विदिता, विहान पांचाल, नक्ष देवडा, झनक भानुशाली.

Story img Loader