आत्तापर्यंत आपण महासागर आणि त्याच्या वेगवेगळ्या जादूई पैलूंविषयी माहिती घेतली; आजच्या लेखात मात्र मी तुम्हाला महासागराच्या पोटात घडणाऱ्या जादूविषयी सांगणार आहे. याच विस्मयकारक जादूमुळे वाळूचा चिमुकला कण मौल्यवान मोती बनतो. तुम्हाला ठाऊक आहे हे मोती कसे बनतात?
ग्रीकांना असं वाटायचं की, जेव्हा समुद्रात वीज पडते तेव्हा हे पाणीदार, तजेलदार मोती तयार होतात. काही संस्कृतींमध्ये हा समज आहे की, शिंपले पऱ्यांचे अश्रू झेलण्याकरिता समुद्राच्या पाण्यावर येतात आणि त्या अश्रूंचे मोती होतात. काही जण या मोत्यांना चक्क पित्ताचे खडे समजत!
रेडी या शास्त्रज्ञाने १६७१ मध्ये असा दावा केला की वाळूच्या कणांपासून मोती बनतात; बऱ्याच वर्षांच्या निरीक्षण आणि संशोधनाअंती आज आपल्याला हे ठाऊक झालं आहे की शिंपल्याचं कवच उघडं असताना कोणताही बाहेरचा कण आत गेला की मोती बनतो. शिंपल्याचं शरीर प्रथम हा बाहेरचा कण शरीराबाहेर काढण्याचाच प्रयत्न करते; मात्र ते शक्य होत नाही तेव्हा शिंपल्यामधला प्राणी शिंपल्याच्या कवचाच्या आतल्या भागातून चकचकीत दिसणारा स्राव- नेइका – स्रवतो. या स्रावामुळेच शिंपल्याच्या आतला पृष्ठभाग गुळगुळीत, तुकतुकीत दिसतो. तर या नेइका स्रावाचे अनेक पापुद्रे या शिंपल्यामध्ये शिरलेल्या कणावर बसून त्यांपासून मोती तयार होतो. अगदी शास्त्रीय भाषेत सांगायचं तर काँकिओलिन नावाच्या जैवपदार्थाने एकत्र बांधलेला एरागोनाइट कॅल्शिअम काबरेनेटचे एक रूप- म्हणजे मोती होय.
आपला असाही समज असतो की, मोती बनवणाऱ्या शिंपल्यांतच ते तयार होतात, मात्र अनेक प्रजातींचे शिंपले, गोगलगाई, अगदी शंखांमध्येही मोती तयार होतात. मोत्यांचा उपयोग फक्त शोभेकरिता आणि दागिन्यांमध्येच नाही तर आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो.
शब्दांकन : श्रीपाद
ऋषिकेश चव्हाण rushikesh@wctindia.org