अलकनंदा पाध्ये alaknanda263@yahoo.com

श्रियाताईचा हात धरून जय शाळेच्या बसमध्ये चढला. बसल्याबरोबर त्याने पँटच्या दोन्ही खिशात हात घालून आईने दिलेले पैसे तपासून पाहिले. कधी एकदा शाळेत जातो असे त्याला झाले होते. काल बाईंनी शाळा सुटताना दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज अर्धा दिवस शाळा असल्याचे सांगितले होते. तसेच सगळ्यांनी वह्य-पुस्तकांऐवजी एक कापडी पिशवी आणि १० रुपयांच्या ५ नोटा- म्हणजे ५० रुपये घेऊन यायला सांगितले होते. पण कशाला, ते मात्र सांगितले नव्हते. फक्त एक नवीन अनुभव घ्यायचाय, गंमत करायचीय असे काहीतरी म्हणाल्या होत्या. दप्तर नाही म्हटल्याबरोब्बर जय आधीच खूश झाला. बसमध्ये बसल्यावरही आज काय गंमत असणार याबद्दल श्रियाताईला प्रश्न विचारून त्याने भंडावून सोडले. पण ती हायस्कूलमध्ये असल्याने तिला याबद्दल काहीच सांगता येईना.

गेटमधून आत शिरल्याबरोबर जयला शाळेच्या मदानावर वेगळेच दृश्य दिसले. तिथे बरीचशी टेबले लावलेली होती. त्यावर भाजी मार्केटसारख्या वेगवेगळ्या भाज्या ठेवलेल्या दिसत होत्या. हीच काही तरी गंमत असेल का असा विचार करीत तो वर्गात पोचला. सगळी मुले आपसात त्याबद्दलच बोलत होती. त्याच्या शेजारचा मल्हार, अनन्या.. सर्व जण वेगवेगळे अंदाज बांधत होते. प्रार्थना झाल्यावर बाईंनी हसत हसत सर्वाना आजच्या गमतीबद्दल सांगायला सुरुवात केली.

‘‘आता सर्वानी रांगेने मदानात जायचेय, तिथे गावाहून शेतकरीदादा मुद्दाम तुमच्यासाठी खास त्यांच्या शेतातली ताजी ताजी भाजी घेऊन आलेत. तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही त्यांच्याकडून विकत घ्यायची आणि त्याचे पैसे नीट मोजून त्यांना द्यायचे. भाजी घेताना नीट हिशेब तुमचा तुम्हाला करायचा आहे हं.. रोज तुमच्याकडे आई-बाबा कुणी तरी भाजी आणतात ना, आज तुम्ही हे काम करायचे, हिशेबही तुम्हीच करायचा आणि.. आई-बाबांना सरप्राइज द्यायचे. कशी आहे आयडिया.’’ जय आणि वर्गातल्या सर्वानाच आयडिया खूपच मस्त वाटली.

सर्व जण आपल्या पिशव्या खांद्याला अडकवून रांग लावून बाईंच्या मागोमाग मदानात पोचले. जयने पुन्हा एकदा त्याचे खिसे तपासून पाहिले. आईने त्याच्या एका खिशात ३० रुपये आणि एका खिशात २० रुपये ठेवायला दिले होते. तिथे गेल्यावर सगळी मुले वेगवेगळ्या टेबलांशी जाऊन भाज्या बघू लागली. तिथल्या टेबलांवर बटाटे, टोमॅटो, काकडी, गाजर, फ्लॉवर, कोबी अशा भाज्या ठेवल्या होत्या. एका टेबलावर हिरव्या पालेभाज्याही दिसत होत्या. जयला बटाटय़ाची भाजी प्रिय म्हणून त्याने आधी बटाटे घ्यायचे ठरवले. त्याला आठवले, आई भाजी घेताना ‘कसे किलो?’ असे काही तरी विचारते. म्हणून त्यानेही ऐटीत तसेच विचारले. त्यावर शेतकरीमामांनी हसत म्हटले, ‘बाळा, तुम्ही लहान पोरं आहात ना म्हणून आज किलो वगैरे नाही हं, पण हुशार दिसतोस. हे बघ इतके बटाटे तुला १० रुपयात मिळतील,’ असं म्हणत त्याच्या पुढय़ात एक वाटा ठेवला. ‘देऊ का सांग,’ असे त्यांनी विचारल्यावर जयने ‘हो’ म्हणत खांद्यावरची पिशवी त्यांच्यापुढे करून त्यात बटाटे भरले. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बाईंनाही जयचा प्रश्न ऐकून हसू आले. पिशवी खांद्याला अडकवून त्याने खिशातील १०ची नोट त्यांना दिली.

बाजूच्या टेबलावर वीरजा आणि अनन्या टोमॅटो घेत होत्या, तर त्याच्यापलीकडच्या टेबलावर मल्हार आणि सौम्या गाजर घेताना दिसले. जयलाही गाजर खूप आवडायचे. आजी तर त्याला गाजरखाऊ ससाच म्हणायची. जयने मग १० रुपयाची गाजरे आणि १० रुपयाचे टोमॅटो घेतले. अशा रीतीने त्याच्या एका खिशातले ३० रुपये संपून गेले. आता दुसऱ्या खिशातल्या २० रुपयात काय घ्यावे अशा विचारात असताना त्याची नजर पालेभाज्यांकडे गेली. कोिथबीर आणि पांढऱ्या मुळ्याशिवाय त्याला कुठलीच भाजी ओळखता आली नाही. आणि खरे तर त्याला त्या भाज्या मनापासून आवडतही नव्हत्या. फक्त आई डब्यासाठी जेव्हा त्या भाज्यांचे पराठे करायची तेवढेच तो खायचा. त्याला टेबलाशी घुटमळताना पाहून तिथल्या मामांनी विचारले, ‘काय देऊ रे तुला बाळा?’ त्यांनी असे प्रेमाने विचारल्यावर काहीच न घेता पुढे कसे जायचे म्हणून कोथिंबिरीची जुडी मागितली. त्याचे ५ रुपये झाले. जयने दुसऱ्या खिशातली १० रुपयाची नोट पुढे केल्यावर त्यांनी विचारले, ‘उरलेल्या ५ रुपयाचा एक मुळा देऊ का?’ त्यावर मान डोलावून जयने दोन्ही भाज्या पिशवीत भरल्या. आता उरलेल्या १० रुपयात काय घ्यावे, अशा विचारात असताना त्याला ईशा केळी घेताना दिसली. जयला केळीही खूप आवडायची म्हणून त्याने तिथे मोर्चा वळवला. ईशाने २० रुपयात घेतलेली केळी दाखवली तेव्हा जय विचारात पडला, कारण त्याच्याकडे तर फक्त १० रुपयेच शिल्लक होते. तसे त्याने ईशाला सांगितल्यावर ‘अरे, मग काय झाले. वेडाच आहेस अगदी. हे बघ हं. मी २० रुपयाला ही चार केळी घेतली ना मग तू त्याच्या हाफ म्हणजे १० रुपयाची दोन केळी घे ना!’ ईशाची कॉमेंट ऐकून जयला खरे तर तिचा एक मिनीट रागच आला, पण ती मॅथ्समध्ये सगळ्यांपेक्षा हुशार आहे, हे त्याने मनाशी कबूल केले.

आता जयचा खिसा रिकामा झाला होता आणि खांद्यावरची भाजीची पिशवी भरून गेली होती. जयने पुन्हा एकदा मनाशी विकत घेतलेल्या भाज्या आणि आईने दिलेल्या ५० रुपयांचा हिशेब करून पाहिला. त्याला एकदम आपण मोठ्ठे झाल्यासारखे वाटले. त्याच्या आजूबाजूला वर्गातली सगळी मित्रमंडळी मोठय़ा माणसांसारखी भाजी घेण्यात गुंतली होती. रंगीबेरंगी भाज्यांच्या ढिगामुळे शाळेचे मदान आज खूप वेगळे- जणू भाजी मंडईसारखेच वाटत होते. इतक्यात ‘चला, सगळ्यांची भाजी घेऊन झाली ना. आता रांग लावून पुन्हा वर्गात चला. तिथे आणखी एक गंमत तुमची वाट पाहतेय. त्यानंतरच घरी सोडणार हं तुम्हाला.’ बाईंनी डोळे मिचकावून सांगितले. तेव्हा आता आणखी काय गंमत असणार, असा विचार करीत सगळे वर्गात गेले. सगळे जण आपण काय काय खरेदी केली ते एकमेकांना सांगत असतानाच शिपाईमामा आणि बाईंनी सर्वाना वरून लालचुटुक जेली घातलेले फ्रुटसॅलडचे कप्स वाटले. ते पाहून तर जय जामच खूश झाला, कारण तो कधीही हॉटेलमध्ये गेला तर हेच मागवायचा. आणि आता तर चक्क शाळेतही हीच मेजवानी मिळाली.

जयची शाळा सुटली, पण श्रियाताईची शाळा अजून सुटली नव्हती म्हणून तिला ही सर्व गंमत त्याला आता लगेच सांगता येणार नव्हती. पण आजच्या दिवस त्याने आईचे भाजीखरेदीचे काम स्वत: केल्यामुळे त्याला खूप भारी वाटत होते.